वरवर पाहिलं तर असं वाटतं की हे काय आहे तर साधं रोप किंवा झाड. पण ऑस्ट्रेलियात आढळणारं जिम्पई जिम्पई नावाचं हे झाड जगातलं सर्वात जीवघेणं झाड आहे. या रोपट्याला किंवा झाडाला स्पर्श झाला तर इतक्या वेदना होतात की आत्महत्या करण्याची इच्छा त्या व्यक्तीला होते. या रोपट्याला Suicide Plant असं संबोधलं जातं.
संशोधक मरिना हर्ले यांना आलेला अनुभव
संशोधक मरिना हर्ले या काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या जंगलात आढळणाऱ्या झाडा-झुडपांवर आणि रोपट्यांवर संशोधन करत होत्या. त्या संशोधक असल्याने त्यांना हे माहित होतं की जंगलातली काही झुडपं किंवा रोपं ही विषारी असू शकतात. त्यामुळेच त्यांनी जंगलात संशोधन करण्यासाठी जात असताना हातात वेल्डिंग ग्लोज तर अंगात बॉडी सूट घातला होता. आपला स्पर्श कुठल्याही रोपाला किंवा झुडुपाला होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली. वेल्डिंग ग्लोज घातले होते आणि त्यांचं संशोधन करत होत्या तरीही त्यांना त्यांचा हा प्रयत्न त्यांना महागात पडला.
त्यांचा स्पर्श जिम्पई जिम्पई या झाडाला झाला. त्यानंतर त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. त्यांचं शरीर लाल पडलं. त्यांच्या शरीराची जी आग होत होती त्यामुळे त्या ओरडत होत्या. जिम्पई जिम्पईमुळे हे सगळं घडलं होतं. यातून त्या बऱ्या झाल्या पण त्यांना दीर्घ काळ रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यानंतर डिस्कव्हरी या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या जिम्पई जिम्पई रोपाला किंवा झाडाला स्पर्श होणं हे वीजेचा झटका लागण्यासारखं किंवा अॅसिडला हात लावण्याइतकं वेदनादायी होत.
जगातलं सर्वात भयंकर झाड
क्वीन्सलँड च्या रेनफॉरेस्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी किंवा लाकडं तोडणाऱ्यांसाठी जिम्पई जिम्पई हे झाड म्हणजे मृत्यूचं दुसरं नाव आहे. या रोपट्याचा किंवा झाडाचा शोध १८६६ मध्ये लागला आहे. या जंगलातून जे घोडे किंवा इतर जनावरं जायची त्यांचा मृत्यू असह्य वेदना होऊन होऊ लागला. त्या जनावारांचा किंवा घोड्यांचा मृत्यू का झाला? याचा सखोल अभ्यास करण्यात आला तेव्हा जिम्पई जिम्पई हे त्यांच्या वाटेत होतं असं लक्षात आलं.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी काय घडलं?
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अनेक लष्करी अधिकाऱ्यांना या झाडाचा स्पर्श झाला. त्यानंतर होणाऱ्या वेदना इतक्या प्रचंड होत्या की अनेक अधिकाऱ्यांनी स्वतःला गोळी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं. जे यातून वाचले त्यांना दीर्घकाळ वेदना सहन कराव्या लागल्या. यानंतरच या रोपट्याचं नाव पडलं सुसाईड प्लांट. यानंतर क्वीन्सलँड पार्क आणि वाईल्डलाइफ यांनी जंगलात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी एक नियमावली तयार केली ज्यामुळे या झाडांच्या संपर्कात येणं कमी होण्यास मदत झाली.
जिम्पई जिम्पई या रोपाचं जीवशास्त्रीय नाव डेंड्रोक्नाइड मोरोइड्स आहे. ऑस्ट्रेलियातल्या उत्तरपूर्व जंगलात ही रोपं, झाडं आढळतात. या झाडांना जिम्पई जिम्पई म्हटलं जातं. याशिवाय सुसाईड प्लांट, जिम्पई स्टिंगर, स्टिंगिंग ब्रश अशी इतर नावंही या झाडांना आहेत. ऑस्ट्रेलियाच नाही तर इंडोनेशियातही ही रोपटी उगवतात. ही रोपं दिसायला एकदम इतर रोपांप्रमाणेच दिसतात. या रोपांच्या पानांचा आकार हृदयासारखा असतो. ही झाडं कमीत कमी तीन फूट आणि जास्तीत जास्त १५ फूट असतात.
किती विषारी असतं हे झाड?
छोटे छोटे काटे असलेल्या या झाडामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं. या झाडाचे काटे टोचले तर शरीरात ते विष सरू लागतं. न्यूरोटॉक्सिन हे ते विष आहे ज्यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर गंभीर परीणाम होतो. अशा अवस्थेत उपचार मिळाले नाहीत तर व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. काटा टोचल्यानंतर अर्धा तास गेला तर वेदनांची तीव्रता वाढते आणि त्या असह्य होऊ लागतात.
या झाडाचे काटे शरीरात अडकलेले असू शकतात कारण ते इतके छोटे असतात की ते डोळ्यांना अनेकदा दिसतही नाहीत. एरवी पायात एखादा काटा मोडला आणि तो काढला तर आपल्याला बरं वाटतं पण या झाडाचं तसं नाही. अनेकदा काटे दिसत नाहीत. ते आपल्या त्वचेतच राहिले तर वेदना खूपच वाढू लागतात.
ही झाडं नष्ट करणं शक्य आहे का?
ही झाडं नष्ट करणं शक्य आहे का? यावरही बरंच संशोधन झालं आहे. मात्र तसं करणं शक्य नाही हे समोर आलं आहे. या झाडाची एकच चांगली गोष्ट आहे की अनेक किडे किंवा पक्षी या झाडाची फळं खातात पण त्यांना काहीही होत नाही.