-हृषिकेश देशपांडे
हिमाचल प्रदेशात ४३.९ टक्के मतांसह काँग्रेसने राज्यातील विधानसभेच्या ६८ पैकी ४० जागा जिंकत बहुमत मिळवले. भाजपला २५ जागा तर ४३ टक्के मते आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये केवळ ३७ हजार मतांचे अंतर आहे. त्यावरून निवडणुकीतील चुरस लक्षात येते. भाजपला आठ जागांवर बंडखोरांनी पराभवाचा धक्का दिला. निकालानंतर काँग्रेसमध्ये नेता निवडीवरून राजकारण रंगले होते. अखेर ५८ वर्षीय सुखविंदर सिंह सुख्खू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. एकीकडे राज्यात थंडीचा कडाका वाढत असताना, सत्तासंघर्षाने वातावरण तापले होते. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंडीच्या खासदार प्रतिभा सिंह, प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंह सुख्खू तसेच माजी प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री ही तीन नावे आघाडीवर होती. त्यात सुख्खू यांनी बाजी मारली पण पक्षश्रेष्ठींनी केलेला हा तह किती काळ टिकणार हा प्रश्न आहे.
वीरभद्र सिंह यांच्या वारसांचे प्रयत्न…
हिमाचलमध्ये काँग्रेस असो वा भाजप दोन्ही पक्षांत टोकाची गटबाजी आहे. आपलाच माणूस पुढे दामटण्याच्या प्रयत्नात हा पक्षांतर्गत संघर्ष शिगेला पोहोचतो. ६६ वर्षीय प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छा व्यक्ती केली होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या त्या पत्नी आहेत. वीरभद्र हे सहा वेळा मुख्यमंत्रीपदी होते. पक्षाने त्यांच्याच नावावर मते मागितली. त्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळावे असा प्रतिभा सिंह यांचा आग्रह. त्यांचे पुत्र व काँग्रेसचे शिमल्यातील आमदार विक्रमादित्य यांनी प्रतिभा यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र वीरभद्र यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे सुख्खू मुख्यमंत्री झाले आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आलेल्या काँग्रेस निरीक्षकांना शुक्रवारी कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता, घोषणाबाजी करण्यात आली. त्यातून पक्षांतर्गत मतभेद उघड झाले. अखेर श्रेष्ठींना निर्णय घ्यावा लागला.
सुखविंदर यांना आमदारांचा पाठिंबा
प्रचार समितीचे अध्यक्ष असलेले ५८ वर्षीय सुखविंदर सिंह सुख्खू हे हमीरपूर जिल्ह्यातील नादौनमधून चार वेळा निवडून आले आहेत. जनाधार असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. विद्यार्थी चळवळीतून ते पुढे आले असून, राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. राज्यात काँग्रेसच्या प्रचाराची धुरा त्यांनीच प्रामुख्याने सांभाळली होती. आताही काँग्रेसच्या निम्म्या आमदारांचा त्यांना पाठिंबा मानला जात आहे. त्यातच त्यांनी अपक्ष म्हणून विजयी झालेल्या तिन्ही आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवल्याचे सांगितले जात आहे. हे त्यांचे व्यक्तिगत यश आहे. प्रतिभा सिंह असो सुखविंदर हे दोघेही राज्याच्या राज्यातील राजकारणात प्रभावी असलेल्या ठाकूर समुदायातून येतात. सामान्यपणे हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री हा मंडी, हमीरपूर, शिमला तसेच कांगडा भागातून येतो. उपमुख्यमंत्री निवडलेले मुकेश अग्निहोत्री हे उना जिल्ह्यातून येतात.
नवे जातीय समीकरण?
मुकेश अग्निहोत्री हे ब्राह्मण आहेत. आतापर्यंत राज्यात शांताकुमार हे एकमेव ब्राह्मण मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले शांताकुमार हे १९७७ व ९२ असे दोन वेळा मुख्यमंत्री होते. ते उना जिल्ह्यातील आहेत. अग्निहोत्री हेदेखील पंजाब सीमेलगतच्या उना जिल्ह्यातील आहेत. त्यांना पाच ते सहा आमदारांचा पाठिंबा होता. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कामगिरी चांगली होती. त्यामुळे आता अग्निहोत्री यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देऊन जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पक्षश्रेष्ठी सावध
भाजप तसेच काँग्रेसच्या जागांमध्ये अंतर बरेच आहे. मात्र इच्छुकांमध्ये टोकाचा संघर्ष होऊन कोणी वेगळा निर्णय घेतल्यास संकट निर्माण होऊ शकते. अर्थात निकालानंतर लगेच काही मोठी राजकीय घडामोड शक्य नाही. पण नाराजी नको म्हणून पक्षश्रेष्ठींनी सावध भूमिका घेतली. चोवीस तासांत आमदारांची दोनदा बैठक झाली. सर्व आमदारांशी चर्चा करूनच मग निर्णय जाहीर झाला आहे. एका पदासाठी अनेक दावेदार असल्याने हा पेच सोडविण्यात काँग्रेसश्रेष्ठींचा कस लागला. मध्य प्रदेश किंवा गोव्यातील प्रकाराने काँग्रेसचे हात पोळले आहेत. त्यामुळे यावेळी श्रेष्ठी सावध होते. आता विक्रमादित्य यांना महत्त्वाचे पद देऊन प्रतिभासिंह यांचा राग पक्षश्रेष्ठींना शांत करावा लागणार आहे अन्यथा आमदार व पक्षश्रेष्ठी यांच्या संघर्ष होऊ शकतो.