प्रशांत महासागरात एप्रिल ते जून या कालावधीत निष्क्रिय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. म्हणजे ला निना किंवा एल निनो स्थिती असणार नाही. या निष्क्रिय स्थितीचा नैर्ऋत्य मोसमी पावसावर काय परिणाम होईल, याचा आढावा .
प्रशांत महासागरात निष्क्रिय स्थिती म्हणजे काय?
प्रशांत महासागरात सध्या अत्यंत कमकुवत अवस्थेत ला निना स्थिती आहे. मुळात जुलै २०२४ पासून ला निना स्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षात डिसेंबर २०२४ मध्ये ला निना सक्रिय झाला. पण, तो कमजोर स्थितीत होता. म्हणजे तापमान सरासरीपेक्षा ०.७ अंश सेल्सिअसने खाली गेले होते. ते ०.९ अंश सेल्सिअस इतके खाली गेले असते तर मजबूत ला निना ठरला असता. आता तेथील तापमान ०.७ वरून ०.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत निष्क्रिय स्थिती निर्माण होईल. म्हणजे ला निना किंवा एल निनोस पोषक अशी कोणतीही स्थिती असणार नाही. त्यानंतर तापमान वाढ होऊन तिथे एल निनो स्थिती निर्माण होईल.
नैर्ऋत्य मोसमी पावसाला फायदेशीर?
प्रशांत महासागरातील ला निना स्थिती नैर्ऋत्य मोसमी पावसाला पोषक असते. ला निना सक्रिय असताना सामान्यपणे भारतीय उपखंडात सरासरी इतका किंवा काहीसा जास्त पाऊस पडतो. एल निनो स्थिती प्रतिकूल असते. एल निनो सक्रिय असताना सामान्यपणे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. यंदा प्रशांत महासागरात निष्क्रिय स्थिती असणार आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहील किंवा सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज बांधला जात आहे. पण, नैर्ऋत्य मोसमी पावसावर ला निना, एल निनोसह अनेक घटकांचा प्रभाव असतो. हवामान विभागाकडून १५ एप्रिल रोजी नैर्ऋत्य मोसमी पावसाबाबत पूर्व आणि मे अखेरीस सुधारित अंदाज जाहीर केला जातो. त्यामुळे हवामान विभागाचा अधिकृत अंदाज जाहीर होईपर्यंत निष्क्रिय स्थितीची नेमका काय परिणाम होईल, हे सांगता येणार नाही.
यंदाचा उन्हाळा तापदायक ठरेल?
हवामान विभागाने एप्रिल, मे आणि जून, या तीन महिन्यांचा हवामान विषयक अंदाज जाहीर केला. एप्रिल, मे आणि जून महिन्यांत कोकणपासून खालील पश्चिम किनारपट्टीचा भाग वगळता उर्वरित देशात किमान, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या झळांची तीव्रता आणि उष्णतेच्या झळांच्या दिवसांत वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत मध्य भारतात सरासरी चार ते सात दिवस उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागतो. यंदा काही भागात दहा ते अकरा दिवस उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. झारखंड, ओदिशामध्ये उन्हाच्या झळांचे दिवस जास्त राहण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली आहे.
मार्च महिना ही सरासरीपेक्षा उष्ण ठरला?
यंदाच्या वर्षातील जानेवारी, फेब्रुवारी हे पहिले दोन महिने सरासरीपेक्षा उष्ण ठरले होते. मार्च महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. मार्चमध्ये किमान तापमान सरासरी १७.७१ अंश सेल्सिअस असते, ते यंदा १८.३२ अंश सेल्सिअस होते. तर कमाल तापमान सरासरी ३१.७० अंश सेल्सिअस असते, ते यंदा ३२.६५ अंश सेल्सिअस होते. मार्च महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. देशात मार्चमध्ये सरासरी २९.९ मिमी पाऊस पडतो. यंदा २०.१ मिमी पाऊस पडला आहे. १९०१ च्या आकडेवारीनुसार २७ व्या तर २००१ पासूनच्या आकडेवरीनुसार १० व्या क्रमाकांच्या कमी पावसाची नोंद झाली आहे. ११५.६ ते २०४.५ मिमी पावसाच्या अति मुसळधार पावसाच्या सहा तर अति पावसाच्या म्हणजे ६४.५ ते ११५.५ मिमी पावसाच्या ६० घटनांची नोंद देशभरात झाली आहे.
dattatray.jadhav@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd