विराट कोहली आणि सुनील गावस्कर ही भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावे. भारतीय क्रिकेटचा इतिहास आणि वर्तमान याबाबत बोलताना या दोघांची नावे पुढे आली नाहीत तरच नवल. या दोघांतही एक साम्य म्हणजे ते आपली मते मांडण्यास कधीही कचरत नाहीत. आता याच स्पष्टवक्त्यांमध्ये एका मुद्द्यावरून मतभेद पाहायला मिळत आहे. तो मुद्दा म्हणजे कोहलीचा ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील स्ट्राईक रेट. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीने अधिक आक्रमक फलंदाजी केली पाहिजे असे मत गावस्कर यांच्यासह अनेकांनी व्यक्त केले आहे. यावर कोहलीनेही परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. ही बाब फारशी न पटल्याने गावस्कर यांनी कोहलीवर टीका केली. यावरून सध्या समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगताना दिसत आहे.
कोहलीवर टीका काय?
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोहली डावाच्या सुरुवातीला खूप वेळ घेतो. तो खेळपट्टीवर टिकला तर धावांचा वेग वाढवू शकतो. मात्र, तो बरेच चेंडू खेळून बाद झाल्यास अन्य फलंदाजांवर दडपण येते अशी कोहलीवर टीका व्हायची. नामांकित समालोचक हर्ष भोगले यांनी ‘कोहली काही वेळा बाद न होण्यासाठी खेळतो. मात्र, काही वेळा तो बाद झाल्यास संघाला फायदा होऊ शकतो. अखेरच्या षटकांत अधिक आक्रमक फलंदाजी करणाऱ्यांना संधी मिळू शकते,’ असे वक्तव्य केले होते. त्याच प्रमाणे माजी कसोटीपटू आणि सध्या समालोचक असणारे संजय मांजरेकर यांनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या आपल्या संभाव्य संघात कोहलीला स्थानही दिले नव्हते. कोहलीने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतकी खेळी केली होती. मात्र, शतक पूर्ण करण्यासाठी त्याने ६७ चेंडू घेतले होते. त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये सर्वांत संथ शतक करण्याच्या मनीष पांडेच्या नकोशा विक्रमाशी त्याने बरोबरी केली होती. यावरूनही कोहलीवर बरीच टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्याने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ४३ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली होती. यावेळी गावस्कर यांनी कोहलीच्या फलंदाजीच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केले होते.
हेही वाचा…केजरीवालांना जामिनामुळे राजकीय नेत्यांच्या सुटकेबाबत वेगळा विचार होणार?
कोहलीकडून काय प्रत्युत्तर?
वारंवार होणारी टीका गप्प बसून ऐकून घेणाऱ्यांपैकी कोहली नाही. ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ४४ चेंडूंत नाबाद ७० धावांची खेळी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर कोहलीने स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले होते. ‘‘लोक माझ्या स्ट्राईक रेटबाबत सतत चर्चा करत असतात. मी फिरकीपटूंविरुद्ध वेगाने धावा करू शकत नाही असे अनेक जण म्हणतात. एका बॉक्समध्ये बसून खेळाडूंविषयी मत व्यक्त करणे सोपे आहे. मात्र, मी माझे काम करत असतो. गेली १५ वर्षे मी माझ्या संघांना सामने जिंकवत आहे. कोणत्या परिस्थितीत कसे खेळायचे हे मला ठाऊक आहे,’’ असे कोहली म्हणाला होता.
या वक्तव्याविषयी गावस्कर काय म्हणाले?
कोहलीने टीकाकारांना दिलेल्या उत्तरानंतर गावस्कर यांच्याकडून कठोर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. ‘‘कोहली जेव्हा ११८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो, तेव्हाच समालोचक त्याच्या शैलीबाबत प्रश्न उपस्थित करतात. मी फारसे सामने पाहत नाही, त्यामुळे अन्य समालोचक त्याच्याविषयी काय म्हणतात हे मला ठाऊक नाही. मात्र, तुम्ही सलामीला येऊन ११८च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि १४-१५व्या षटकात बाद झालात, तर आम्ही तुमची स्तुती करावी का? आताचे सर्व खेळाडू ‘बाहेरून लोक काय म्हणतात त्याने आम्हाला फरक पडत नाही,’ असे सांगतात. अच्छा. असे असेल तर तुम्हाला या लोकांना उत्तर देण्याची गरज का भासते? आम्हीही थोडेफार क्रिकेट खेळलो आहोत. आम्हाला मैदानावर जे दिसते, त्यावर आम्ही भाष्य करतो. आम्ही कोणाच्या हिताचे किंवा विरोधात बोलत नाही,’’ असे गावस्कर म्हणाले. गावस्कर यांच्या या विधानानंतर समाजमाध्यमांवर बरीच नाराजी व्यक्त करण्यात आली. कोहलीच्या स्ट्राईक रेटवर बोलणारे गावस्कर स्वत: बचावात्मक फलंदाजी करायचे असेही काहींकडून म्हटले गेले. गावस्कर किती दिग्गज खेळाडू होते, याचा अनेकांना विसर पडलेला दिसला.
हेही वाचा…पुतिन यांना रशियाच्या पंतप्रधानपदी मिशुस्तिनच का हवेत; कोण आहेत मिखाईल मिशुस्तिन?
स्ट्राईक रेटवरून टीका कितपत रास्त?
कोहलीची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी गणना केली जाते. ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही कोहलीच्याच नावे आहे. १७ हंगामांत मिळून ७००० हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. असे असले, तरी त्याच्या स्ट्राईक रेटबाबत कायमच चर्चा केली जाते. ‘आयपीएल’ कारकीर्दीत कोहलीने आतापर्यंत १३१.६३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. मात्र, गेल्या काही हंगामांत त्याला धावांची गती राखता येत नव्हती. २०२०मध्ये १२१.३५, २०२१मध्ये ११९.४६, २०२२मध्ये ११५.९९, तर २०२३मध्ये १३९.८२च्या स्ट्राईक रेटने तो खेळत होता. परंतु या हंगामात कोहलीने आपल्या शैलीत बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. तो यंदा डावाच्या सुरुवातीपासून आक्रमक शैलीत खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांत ७०.४४च्या सरासरीने आणि १५३.५१च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ६३४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने यंदाच्या हंगामात ३० षटकारही मारले आहेत. त्यामुळे गेल्या काही हंगामांत कोहलीवर झालेली टीका रास्त होती. परंतु, यंदाच्या हंगामात त्याने स्वत:मध्ये केलेल्या बदलाचे कौतुकही झाले पाहिजे. कोहली आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकातही आपला आक्रमक खेळ कायम राखेल अशी आता भारतीय संघाला आणि चाहत्यांना आशा असेल.