नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता सात महिने उलटून गेले आहेत. यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सात महिन्यांपासून अंतराळात अडकल्याने त्यांना चालण्यातही अडचण येत आहे.
सुनीता विल्यम्स यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि अंतराळवीरांच्या शरीरावर अशा विस्तारित अंतराळ प्रवासाच्या शारीरिक नुकसानाबद्दल चर्चा सुरू आहे. या सात महिन्यांपासून त्यांना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे? वाढलेल्या अंतराळ प्रवास मोहिमेचा अंतराळवीरांवर काय परिणाम होतो? वैद्यकीय आव्हानांचा भविष्यातील मोहिमांसाठी अर्थ काय? विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाने अंतराळ प्रवासाविषयी प्रश्न का निर्माण झाले आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : मशिदीसमोर कुराण दहन करणाऱ्या व्यक्तिची गोळ्या घालून हत्या; कोण होते सलवान मोमिका?
सुनीता विल्यम्स यांचे अंतराळातील सात महिने आणि निर्माण झालेले प्रश्न
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले सात महिने व्यतीत केले आहेत. सात महिन्यांपासून अंतराळात अडकल्याने त्या चालणेदेखील विसरल्या आहेत. अलीकडेच विद्यार्थ्यांशी झालेल्या संभाषणात, विल्यम्स यांनी स्पष्ट केले की, त्या अनेक महिन्यांपासून चालू किंवा बसू शकलेल्या नाहीत. चालताना नक्की कसे वाटते हे लक्षात ठेवण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. शून्य गुरुत्वाकर्षणात तरंगत अनेक महिने घालवल्यानंतर विल्यम्स अनेक महिन्यांपासून बसल्या किंवा झोपलेल्या नाहीत. त्या जमिनीवर चालण्याचा अनुभव पुन्हा घेण्यासाठी धडपडत आहेत. स्टारलायनर ही अगदी अल्प मुदतीची मोहीम होते; परंतु त्याचा कालावधी अनेक महिन्यांपर्यंत वाढला आहे.
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बॅरी विल्मोर यांनी, त्यांच्या विद्यमान अंतराळ मोहिमेला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लागणार, अशी शक्यता वर्तवली होती. परंतु, अनपेक्षितपणे या मोहिमेचा काळ वाढतच चालला आहे; ज्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचे वजनही घटले आहे. या अंतराळातील अनपेक्षितपणे वाढत असलेल्या वास्तव्यामुळे विल्यम्स यांना धक्का बसला आहे. पृथ्वीपासून शारीरिकरीत्या त्यांचा संपर्क तुटल्यामुळे विस्तारित अंतराळ प्रवासाविषयी चिंताजनक प्रश्न निर्माण झाले आहेत.
एलॉन मस्क अंतराळवीरांना वाचविण्याच्या ट्रम्प यांच्या मोहिमेत सामील
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क आणि स्पेसएक्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (आयएसएस) दोन अंतराळवीरांना वाचवण्यासाठी तातडीची मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. “अंतराळवीर अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत, त्यांना अक्षरशः अंतराळात सोडले आहे,” असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी पूर्व राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्यावरून त्यांच्यावर टीकाही केली. “एलॉन लवकरच ही परिस्थिती सुरळीत करतील, अशी आशा आहे. ते सर्व सुरक्षित असतील,” असेही ते म्हणाले. आपल्या महत्त्वाकांक्षी अंतराळ उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मस्क यांनी स्पेसएक्स मोहीम हाती घेणार असल्याविषयीची स्पष्टता दिली. “आम्ही त्यांना लवकरात लवकर घरी आणू,” असे आश्वासन मस्क यांनी दिले.
सुनीता विल्यम्स अंतराळात असूनही कुटुंबाच्या संपर्कात कशा?
सुनीता विल्यम्स यांनी सांगितले की, मी फक्त त्यांची काळजी म्हणून आणि आमचे नाते जिवंत ठेवण्यासाठी माझ्या आईशी दररोज बोलते. त्यांची एक लहान मोहीम म्हणजे आता सहनशक्तीची परीक्षा झाली आहे. ही वाढलेली मोहिम केवळ त्यांच्या शारीरिक ताकदीवरच नाही, तर त्यांच्या मानसिक आणि भावनिक लवचिकतेवरही परिणाम करत आहे. या वाढलेल्या अंतराळ संशोधन मोहिमेचा आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल राखण्याचा विल्यम्स यांच्यावर कसा परिणाम झाला आहे आणि भविष्यात अशाच मोहिमांचा सामना करणाऱ्या अंतराळवीरांसाठी याचा काय अर्थ आहे? असे अनेक प्रश्न या मोहिमेतून निर्माण होतात.
बचाव मोहिमेला विलंब का झाला?
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे स्पेसएक्स क्रू-९ ड्रॅगनचा भाग म्हणून फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. आठवडाभरात पृथ्वीवर परत येण्याचे नियोजन केल्यानंतर आता ते सात महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अडकून पडले आहेत. स्टारलायनर स्पेसक्राफ्टशी संबंधित मुख्य सुरक्षा चिंतेमुळे या मोहिमेला विलंब झाला. नासाने त्यांच्या परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले.
हेही वाचा : अर्थसंकल्प ‘लीक’ होतो तेव्हा… इतिहासात असं कधी घडलं होतं?
आता स्पेसएक्स क्रू -१० मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये लाँच केले जाणार असून, त्याद्वारे दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. तोपर्यंत विल्यम्स आणि विल्मोर यांना तेथील मोहीम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आयएसएसवर राहावे लागेल. या मोहिमेचा अनपेक्षित विस्तार पुन्हा एकदा दाखवून देतो की, अंतराळ प्रवास किती क्लिष्ट आहे आणि अंतराळ संशोधनाच्या या सतत बदलणाऱ्या लँडस्केपमध्ये सुरक्षित आणि कार्यक्षम क्रू रोटेशन सुनिश्चित करण्यासाठी सतत येणाऱ्या अडचणीदेखील या मोहिमेमुळे समोर आल्या आहेत.