अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’मध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळात भरारी घेतली आहे. त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्यासह बोइंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून ‘आतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका’मध्ये (आयएसएस) पोहोचले. मात्र ‘आयएसएस’मध्ये मात्र शास्त्रज्ञांना ‘एन्टरोबॅक्टर बुगांडेन्सिस’ नावाचा जिवाणू आढळला आहे. आयएसएसच्या बंद वातावरणात राहून अधिक प्रभावी झालेल्या या जिवाणूची लागण अंतराळवीरांना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ‘स्पेसबग’ म्हणून ओळखल्या जाणारा हा जिवाणू काय आहे, त्याची लागण झाल्यावर काय होऊ शकते, याविषयी…
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात काय घडले?
‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर नुकतेच स्टारलाइनर अंतराळयानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पोहोचले. मात्र या अंतराळवीरांना ‘स्पेस बग’चा धोका निर्माण झाला आहे. हा जिवाणू अंतराळवीर किंवा त्यांच्या क्रू सदस्यांच्या श्वसन प्रणालीला संक्रमित करून आरोग्य समस्या निर्माण करण्यास सक्षम आहे. ‘एन्टरोबॅक्टर बुगांडेन्सिस’ नावाच्या या जिवाणूमुळे श्वास घेण्यास धोका निर्माण होतो आणि प्रसंगी प्राणहानीही होऊ शकते. ‘आयएसएस’च्या बंद वातावरणात हा जिवाणू विकसित झाला आहे आणि तो अधिक शक्तिशाली असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
हेही वाचा >>> विश्लेषण : आपल्याला गहू आयात करावा लागणार?
‘एन्टरोबॅक्टर बुगांडेन्सिस’ म्हणजे काय?
‘एन्टरोबॅक्टर बुगांडेन्सिस’ हा एक जीवाणू असून ‘आयएसएस’मध्ये तो आढळला आहे. ‘आयएसएस’च्या बंद वातावरणामुळे हा जिवाणू अधिक शक्तिशाली झाला असून त्यामुळे तिथे पोहोचलेल्या अंतराळवीर आणि क्रू सदस्यांना त्याची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘एन्टरोबॅक्टर बुगांडेन्सिस’ हा बहु-औषध प्रतिरोधक जिवाणू आहे. बहु-औषध प्रतिरोधक असल्याने त्याला अनेकदा सुपरबग म्हणतात. हा जिवाणू श्वसन प्रणालीला संक्रमित करतो. या जिवाणूंचे नासासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पृथ्वीवर आढळणाऱ्या जिवाणूंपेक्षा हे जिवाणू पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यांच्यावर औषधांचा कोणताही परिणाम होत नाही, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
‘जिवाणू रोखण्यासाठी काय करणार?
सहसा नासाला अंतराळातील कचरा आणि मायक्रोमेटिओराइट्सची चिंता असते. मात्र सह-प्रवासी म्हणून वाहून नेलेले जिवाणू आणि ‘आयएसएस’वर विकसित झालेले जिवाणू यांनी चिंतेत मोठी भर घातली आहे. ‘आयएसएस’वर आढळलेल्या ई. बुगांडेन्सिस या जिवाणूच्या प्रजातींचा अभ्यास करण्यात आला आहे, असे नासाने सांगितले. ई. बुगांडेन्सिसच्या १३ प्रजाती असून एक जिवाणू बहु-औषध प्रतिरोधक म्हणून कुप्रसिद्ध आहे. या जिवाणूला ‘आयएसएस’पासून वेगळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संशोधकांच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, आयएसएसवरील जिवाणूचे उत्परिवर्तन झाले आणि ते त्यांच्या पृथ्वीच्या समकक्षांच्या तुलनेत आनुवंशिक आणि कार्यत्मकदृष्ट्या वेगळे झाले. हे उत्परिवर्तित जिवाणू आयएसएसमध्ये टिकून राहण्यास सक्षम हाेते. ई. बुगांडेन्सिस इतर अनेक सूक्ष्मजिवांसह अस्तित्वात होते.
‘आयएसएस’वरील जिवाणूचा शाेध कोणी लावला?
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या प्रमुख डॉ. कस्तुरी व्यंकटेश्वर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने ‘आयएसएस’वरील सुपरबग शोधून काढला आहे. नासामध्ये सामील होण्यापूर्वी चेन्नईच्या अन्नामलाई विद्यापीठात त्यांनी मरिन मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास केला. २०२३ मध्ये त्यांनी ‘कलामिएला पियर्सोनी’ नावाचा एक बहु-औषध प्रतिरोधक जिवाणू शोधून काढला होता. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले होते. ई. बुगांडेन्सिसवर अधिक संशोधन नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी आणि चेन्नईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मद्रास यांनी संयुक्तपणे केले आहे. डॉ. कस्तुरी व्यंकटेश्वर यांच्यासह वाधवाणी स्कूल ऑफ डेटा सायन्सचे प्रा. कार्तिक रमन, आयआयटी-मद्रासमधील प्रत्यय सेनगुप्ता, शोभन कार्तिक, नितीन कुमार सिंह यांनी केले. ‘जेपीएल-नासा’ आणि ‘मायक्रोबायोम’ या वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये याविषयीचे संशोधन प्रकाशित झाले आहे.
हेही वाचा >>> दक्षिण चिनी समुद्रात बेट बांधून व्हिएतनाम वाढवतोय ताकद; चीनची भूमिका काय?
शास्त्रज्ञांचे मत काय?
‘एन्टरोबॅक्टर बुगांडेन्सिस’ जिवाणूबाबत डॉ. कस्तुरी व्यंकटेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसएवरील अंतराळवीरांचे जीवन सुलभ नसते. त्यांना आरोग्याविषयी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पृथ्वीवर असतानाच्या प्रतिकारशक्तीपेक्षा त्यांची अंतराळात प्रतिकारशक्ती खूप कमी होते. तिथे आढळून आलेला विषाणू हा त्यांच्या जिवाला धोका निर्माण करू शकतो. काही सौम्य सूक्ष्मजीव प्रतिकूल परिस्थितीत ई. बुगांडेन्सिस जिवाणूशी जुळवून घेण्यास आणि टिकून राहण्यास कशी मदत करतात यावर आमचे संशोधन सुरू आहे. अंतराळवीरांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी ते उपयुक्त ठरेल.
sandeep.nalawade@expressindia.com