Sunita Williams and Butch Wilmore return to Earth : भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे पाण्यात उतरले. अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतण्यासाठी अंतराळवीरांना जवळपास १७ तासांचा वेळ लागला. सध्या दोन्ही अंतराळवीरांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे. दरम्यान, अंतराळवीरांना घेऊन येणारं ड्रॅगन कॅप्सूल जमिनीवर न लँडिंग करता, पाण्यातच का उतरलं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

स्प्लॅशडाऊन म्हणजे काय?

स्प्लॅशडाऊन म्हणजे पॅराशूटच्या मदतीनं अंतराळयान सुरक्षितपणे पाण्यात उतरवणं. अंतराळवीरांना अंतराळातून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीवर परतताना अंतराळयानाचा वेग खूपच जास्त असतो. लँडिगच्या आधी हा वेग कमी करणं गरजेचं असतं. जेव्हा एखादं अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतं, तेव्हा हवेच्या कणांशी घर्षण झाल्यामुळे यानाभोवती मोठी उष्णता निर्माण होते. ज्यामुळे आग लागण्याचा मोठा धोका असतो, असं नॉर्थ डकोटा विद्यापीठातील अंतराळ अभ्यासाचे सहायक प्राध्यापक मार्कोस फर्नांडिस टॉस यांनी सांगितलं आहे. नासाच्या मते, अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना अंतराळवीरांना खिडकीबाहेर आगीची भिंत दिसते.

आणखी वाचा : Aurangzeb Tomb: औरंगजेबाची कबर कायदेशीरपणे हटवायची असेल तर… कायदा काय सांगतो?

अंतराळयानाला आग लागण्याचा धोका

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ज्या स्पेसएक्स कॅप्सूलमधून पृथ्वीवर परत येत होते, त्याचा वेग खूपच जास्त होता. त्यामुळे सुरक्षित लँडिग करण्यासाठी या कॅप्सूलचा वेग कमी करणं गरजेचं होतं. पृथ्वीच्या वातावरणात हे कॅप्सूल प्रवेश करताना हवेच्या कणांमुळे मोठं घर्षणही निर्माण होण्याची शक्यता होती. त्यातच कॅप्सूलभोवतीचं तापमान १,५०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा धोकाही निर्माण झाला होता. आगीसारखी भयानक घटना घडू शकते, अशी भीतीही नासाच्या वैज्ञानिकांना होती. त्यामुळे जमिनीऐवजी या कॅप्सूलला पॅराशूटच्या आधारे फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ पाण्यात उतरवण्यात आलं, असं मार्कोस फर्नांडिस यांनी सांगितलं.

स्प्लॅशडाऊन का आवश्यक?

स्प्लॅशडाऊन प्रक्रियेत अंतराळयानाचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूटचा वापर केला जातो. अंतराळयानाचं लँडिंग स्थिर आणि सुरक्षित करण्यासाठी त्यात आधीच अनेक पॅराशूट बसवण्यात आलेले असतात. जेव्हा अंतराळवीरांना घेऊन आलेलं ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या जवळ येतं, तेव्हा त्यातील पॅराशूट उघडण्यात येतात. त्यामुळे अंतराळयानाचा वेग झपाट्यानं कमी होण्यास मदत होते. अंतराळयान लँडिग करताना आदळणार नाही याची दक्षता घेतली जाते. कारण- तसं झाल्यास मोठा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यातच बऱ्याच ठिकाणची जमीन खडकाळ आणि टणक असल्यानं अंतराळयानाला लँडिंगसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. पृथ्वीचा पृष्ठभाग ७० टक्के पाण्यानं व्यापलेला असल्यानं अंतराळयान कोणत्याही ठिकाणी उतरवलं जाऊ शकतं. त्यामुळेच जमिनीऐवजी ते पाण्यात उतरवण्यास प्राधान्य दिलं जातं, असंही फर्नांडिस यांनी सांगितलं आहे.

पाण्यातही अंतराळयान उतरवणं धोकादायक?

दरम्यान, काही माजी अंतराळवीरांच्या मते, अंतराळयान जमिनीऐवजी पाण्यात उतरवणं धोकादायक ठरू शकतं. कारण- जमिनीवर उतरताना जरी खडतर परिस्थिती असली तरी अंतराळवीर अंतराळयानातून बाहेर पडू शकतात; पण पाण्यात उतरताना यानात बिघाड झाला, तर अंतराळवीरांना पाण्यात जास्त काळ तग धरता येत नाही. त्यातच अंतराळयान पाण्यात बुडालं, तर अंतराळवीरांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. २००३ मध्ये सोयुझ अंतराळयान त्याच्या नियोजित केलेल्या जागेवर उतरणार होतं; परंतु ऐन वेळी उद्भवलेल्या तांत्रिक कारणांमुळे ते २०० मैल (३२२ किमी) अंतरावर उतवण्यात आलं. हा खूपच मोठा धोका होता, असं मतही नासाच्या माजी वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी या अनुभवाची तुलना विमानवाहू जहाजाशी केली आहे.

हेही वाचा : What is Human Coronavirus : ह्युमन करोना व्हायरस काय आहे? त्याची लागण कशी होते? मृत्यूचा धोका किती?

सुनीता विल्यम्स अंतराळस्थानकात कशा अडकल्या?

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी ५ जून २०२४ रोजी परीक्षण यान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. तिथे आठ दिवस अभ्यास केल्यानंतर ते पृथ्वीकडे परतणार होतं; मात्र, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच व्यतीत करावे लागले. खरं तर कोणत्याही अंतराळ मोहिमेत मोठी जोखीम असते. त्यात दोन्ही अंतराळवीर अंतराळात अडकून पडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी वाटणं अगदीच स्वाभाविक होतं. त्यांना परत आणण्यासाठी नासा कोणकोणते प्रयत्न करतंय याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर परत येतील, असं माध्यमांना सांगितलं होतं.

सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास कसा होता?

सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या खासगी अंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीनं मोहीम आखली होती. स्पेसएक्सच्या अवकाशयानानं १४ मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केलं. अंतराळवीरांचा पृथ्वीकडे परत येण्याचा प्रवास अत्यंत नियोजित आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल होता. १८ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सर्व अंतराळवीर व त्यांच्याबरोबर गेलेले कर्मचारी क्रू-९ या अवकाशयानात बसले. त्याआधी त्यांनी यानाची यांत्रिक व सुरक्षा तपासणी केली. त्यानंतर यानानं उड्डाण केलं आणि पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरू केला. सुरुवातीला या यानाचा वेग प्रतितास २७,००० किलोमीटरपेक्षा जास्त होता. आयएसएसच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी तितका वेग आवश्यक होता. त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत परतण्यासाठी यानानं योग्य कोन व मार्ग निश्चित केला. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी १७ तास लागले. सरतेशेवटी आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूपपणे परतले आहेत.

Story img Loader