Blue Moon 2024 ब्लू मून असं ऐकलं की, काहीतरी आश्चर्यकारक किंवा दुर्मीळ, असामान्य घटना आहे असं वाटत. परंतु आकाशात ब्लू मून दिसणे ही खगोलशास्त्रीयदृष्ट्या दुर्मिळ घटना नाही. परंतु, ब्लू मून आणि सुपरमून एकाच वेळी असणं ही मात्र सामान्य घटना नाही. अशा प्रकारे त्यांचं एकाच वेळी असणं आता यापुढे थेट २०३७ साली जानेवारी महिन्यात असेल. त्यामुळे आजचा दिवस नक्कीच विशेष आहे. सलग दुसऱ्या वर्षी रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेच्या दिवशी (१९ ऑगस्ट) ‘सुपर ब्लू मून’ दिसणार आहे. म्हणूनच ही एक अद्भुत खगोलशास्त्रीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी ब्लू मून आणि सुपर मून दिसणार असल्याने एक वेगळाच योग जुळून आला आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, ‘अनेक परंपरांमध्ये चंद्राला प्रमाण मानून तयार केलेली दिनदर्शिका वापरली जाते. त्यातील महिन्यांना चांद्रमास म्हणतात. या पारंपरिक दिनदर्शिकेनुसार पौर्णिमा ही महिन्याच्या मध्यवर्ती दिनी किंवा जवळपास येते. ही पौर्णिमा चिनी ड्रॅगन वर्षाच्या सातव्या महिन्याच्या मध्यभागी, इस्लामिक कॅलेंडरमध्ये सफार आणि हिब्रू कॅलेंडरमध्ये एव्ह आहे. Av (एव्ह) हे Tu B’Av शी संबंधित आहे, आधुनिक इस्रायलमध्ये या दिवशी व्हॅलेंटाईन डे सारखीच सुट्टी असते’. हा विशेष चंद्रोदय १९ ऑगस्ट रोजी दिल्लीत संध्याकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी, मुंबईत थोड्या फरकाने आणि कोलकात्यात सुमारे एक तास आधी होईल.
अधिक वाचा: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी कधी फुटणार? काँक्रिटीकरणही फसल्याची कारणे कोणती?
सुपर मून म्हणजे काय?
पृथ्वीभोवती चंद्राची कक्षा वर्तुळाकार नाही; ती लंबवर्तुळाकार आहे. चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी २७.३ दिवस लागतात. परंतु, अमावस्येच्या कालखंडात २९ .५ दिवस लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना, पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही सूर्याभोवती फिरत असतात. त्यामुळे पृथ्वी प्रदक्षिणेच्या सुरुवातीस दरवर्षी चंद्र उजळण्यास नेहमीच अधिक कालावधी लागतो. अमावस्या हा चंद्र न दिसण्याचा मोठा कालावधी असतो त्यावेळेस चंद्राचा उजळलेल्या भाग आपल्या पलीकडच्या बाजूस असतो.
चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या बिंदूला पेरीजी म्हणतात आणि सर्वात दूर असलेल्या बिंदूला अपोजी म्हणतात. जेव्हा चंद्र त्याच्या पेरीजीमधून जात असतो किंवा त्याच्या जवळ असतो तेव्हा पौर्णिमेला सुपरमून अनुभवता येतो. (अमावस्येच्या बाबतीतही असेच घडते, फक्त ते दिसत नाही). (पृथ्वीवरून दिसताना) जेव्हा चंद्र सूर्याच्या थेट विरुद्ध असतो तेव्हा पौर्णिमेच्या वेळेस तो संपूर्ण दिवस उजळून निघतो. पौर्णिमेच्या दिवशी आकाशात एक तेजस्वी वर्तुळ दिसते. सूर्यास्ताबरोबर चंद्राचा उदय होतो आणि अस्त सूर्योदयाच्या आसपास होतो. सुपर मूनच्या वेळेस चंद्र फक्त पौर्णिमेलाच नाही तर पौर्णिमेच्या आदल्या रात्री आणि नंतरच्या रात्रीही ‘पूर्ण उजळलेला’ दिसतो.
ब्लू मून म्हणजे काय?
ब्लू मून ही आश्चर्यकारक किंवा दुर्मीळ, असामान्य घटना समजली जाते, ब्लू मून ही खगोलीयदृष्ट्या तितकी दुर्मीळ घटना नाही. ब्लू मूनच्या दोन व्याख्या आहेत.
१. जेव्हा पौर्णिमा एका महिन्यात दोनदा येते, तेव्हा त्यास ब्लू मून म्हणतात. अमावस्या ते अमावस्या हे चक्र पूर्ण होण्याकरिता २९.५ दिवस लागतात. एक वेळ अशी येते जेव्हा पौर्णिमा एका महिन्याच्या सुरुवातीला येते आणि आणखी एक पूर्ण चक्र पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवस बाकी असतात त्यावेळेस त्याच महिन्यात दुसऱ्यांदा येते त्यास ब्लू मून म्हणतात. म्हणेज असा महिना, ज्यामध्ये १ किंवा २ तारखेला पौर्णिमा असते आणि त्यानंतर ३० किंवा ३१ तारखेला पुन्हा पुढच्या महिन्याची पौर्णिमा येते. नासाच्या म्हणण्यानुसार असे दर दोन किंवा तीन वर्षांनी होते. त्यावेळी ब्लू मून अनुभवता येतो.
२.आणखी एक मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाणारे स्पष्टीकरण ते खगोलशास्त्रीय बाबींवर अवलंबून आहे, ज्याची व्याख्या संक्रांती आणि विषुव किंवा संपात दिनाच्या (दिवस व रात्र समसमान असलेला दिवस) दरम्यानचा कालावधी म्हणून केली जाते. सध्याचा खगोलशास्त्रीय उन्हाळा २१ जून रोजी उन्हाळ्याच्या संक्रांतीसह सुरू झाला आणि २२ सप्टेंबर रोजी शरद ऋतूतील विषुव/ संपात दिनासह समाप्त होईल. १९३७ साली मेन फार्मर्स पंचांगाने चार पौर्णिमेच्या त्रैमासिक हंगामातील तिसरा पूर्ण चंद्र म्हणून ब्लू मून हा शब्दप्रयोग परिभाषित केला होता. ऑगस्टचा सुपर ब्लू मून या वर्षातील सुपर मूनच्या सलग चार दर्शनांपैकी पहिला आहे, त्यानंतर १८ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर आणि १५ नोव्हेंबर रोजीही तो दिसणार आहे.
अधिक वाचा: भारतात मंकीपॉक्सची साथ कधी आली होती? यंदा या विषाणूचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे का?
सुपर ब्लू मून प्रत्यक्षात निळा दिसेल का?
नाही. काहीवेळा, हवेतील धूर किंवा धूळ लाल तरंगलांबीचा प्रकाश पसरवतात, परिणामी चंद्र काही ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक निळा दिसू शकतो. पण याचा “ब्लू मून” नावाशी काहीही संबंध नाही. खरं तर क्षितिजाजवळ असताना चंद्र अधिक पिवळा किंवा नारिंगी रंगाचा दिसतो. कारण ते वातावरणातून दीर्घकाळ प्रवास करून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. तर प्रत्यक्षात निळा प्रकाश अधिक विखुरतो आणि नारिंगी रंगच नजरेला अधिक जाणवतो. शिवाय अलीकडे प्रदूषणामुळे नारिंगी किंवा लाल रंगच अधिक दिसतो, असे नासाने या बाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.
सुपर मून आकाराने मोठा दिसतो का?
नासाने दिलेल्या माहितीनुसार, पेरीजी (सुपर मून) येथे पौर्णिमा हा अपोजीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा (ज्याला “मायक्रो मून” म्हणतात) १४ % मोठा आणि ३०% जास्त उजळ असतो . पुढे, सर्व पौर्णिमांपैकी सुमारे २५ टक्के सुपर मून आहेत, परंतु केवळ ३ टक्के पौर्णिमा या ब्लू मून असतात. सुपर ब्लू मूनमधला काळ खूपच अनियमित असतो – तो २० वर्षांचा असू शकतो, परंतु सर्वसाधारणपणे,१० वर्षे सरासरी असते. आकारातील फरक बहुतेक लोकांच्या लक्षात येण्याची शक्यता नाही. चंद्र काहीसा उजळ दिसू शकतो,— परंतु तुम्ही फरक ओळखू शकलात की नाही हे तथाकथित ‘Moon illusion’ आणि तुमच्या स्थानावर किती ढगाळ किंवा प्रदूषित आहे यासारख्या घटकांवर अवलंबून असेल.
© IE Online Media Services (P) Ltd