तमिळनाडूतील राजकारणात चित्रपट कलावंत केंद्रस्थानी आहेत. एमजीआर, जयललिता या कलाकारांनी राजकारणात अफाट यश मिळवले. पुढे विजयकांत, कमल हासन यांनीही प्रयत्न करून पाहिला. आता ४९ वर्षीय विजय या लोकप्रिय अभिनेत्याने तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाची स्थापना केली. विलूपुरी जिल्ह्यातील विक्रवंडी येथे विशाल सभेद्वारे या पक्षाची घोषणा करण्यात आली. तमिळनाडू, आंध्र प्रदेशसह दक्षिणेतील कानाकोपऱ्यातून विजय यांचे चाहते यासाठी आले होते. विशेष म्हणजे यात सत्तर टक्के विशीतील होते. विजय यांचा हा टीव्हीके पक्ष लगेच मोठी मजल मारेल असे नाही. मात्र तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्या निधनानंतर द्रमुकला पर्याय ठरेल अशा प्रबळ पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे. कारण जयललिता यांचा पश्चात अण्णा द्रमुकमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाईल असे लोकप्रिय नेतृत्व नाही. त्या दृष्टीने विजय यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जाते.
अस्मितेचे राजकारण
राज्यात अस्मितेचे राजकारण टोकाचे आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष असो वा काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना राज्यातील द्रमुक किंवा अण्णा द्रमुकला बरोबर घेतल्याशिवाय यश मिळत नाही. गेली सहा दशके एक तर द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची सत्ता आहे. भाजपला राज्यात अद्याप फारसे पाय रोवता आलेले नाहीत. तर १९६७ नंतर पुन्हा राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. सध्या काँग्रेसची द्रमुकबरोबर आघाडी आहे. तर भाजपने लोकसभेला छोट्या पक्षांना बरोबर घेत स्वबळाची चाचपणी केली. त्यांना मतांची टक्केवारी दोन आकडी जरूर झाली. मात्र जागा मिळाल्या नाहीत. थोडक्यात राष्ट्रीय पक्ष हे तमिळनाडूत दुय्यम भूमिकेत आहेत. त्यामुळे विजय यांनी राजकारणात पदार्पण केल्यावर अप्रत्यक्षपणे द्रमुकला लक्ष्य करत, मुख्य लढाई कोणाशी आहे हे सूचित केले.
धर्मनिरपेक्षतेशी बांधीलकी
सामाजिक न्याय तसेच धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधीलकी असल्याचे स्पष्ट करत, पेरियार व के. कामराज हे आदर्श असल्याचे विजय यांनी नमूद केले. जनविरोधी सरकारला तुम्ही द्रविडियन प्रारूप कसे म्हणू शकता, असा सवाल करत राज्यातील द्रमुक सरकारवर टीका केली. तुम्हाला विरोध करणाऱ्यांना एक रंगात रंगवून मोकळे होता असे थेट हल्ला द्रमुकवर केला. त्यामुळे विजय यांनी एक प्रकारे अण्णा द्रमुकच्या समर्थकांनाही साद घातली असेच म्हटले पाहिजे. गेली दोन विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते काहीसे निराश आहे. पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाच्या संघर्षात अण्णा द्रमुकमध्ये फूट पडली. आता त्यांना विजय यांच्या रूपात नवा पर्याय उपलब्ध आहे. देशात दुही पसरवणाऱ्या तसेच कुटुंबाच्या नावाखाली राजकारण करून द्रमुक पारूप पुढे करणाऱ्यांशी लढा देऊ असे विजय यांनी जाहीर केले. एम. जी. रामचंद्रन व एन. टी. रामाराव यांचा त्यांनी उल्लेख केला. या दोन्ही कलावतांना तमिळनाडू व आंध्रच्या राजकारणात अफाट यश मिळाले. आजच्या जनतेच्या मनावर त्यांचे गारूड आहे. हे सारे संदर्भ देत, जन्माने सारे समान असल्याचा आमच्या पक्षाचा मूळ विचार असल्याचे त्यांनी विशद केले.
पन्नाशीत राजकारणात
विजय हे पन्नाशीत असल्याने तरुणांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. १९७० च्या दशकात एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) हे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. विजय यांचे चाहते एमजीआर यांच्याशी त्यांची तुलना करत आहेत. एमजीआर यांनी आपल्या चित्रपटातील लोकप्रियतेच्या जोरावर सत्ता मिळवली होती. विक्रवंडी येथील सभेसाठी साठ हजार खुर्च्या होत्या, भव्य कटआऊट, एखाद्या चित्रपटाच्या प्रीमियरसारखी वातावरण निर्मिती असे असे सारे भव्य-दिव्य होते. या कार्यक्रमासाठी ५० कोटींचा खर्च केल्याची चर्चा आहे. तमिळ अस्मितेवर भर या कार्यक्रमात देण्यात आला. पक्षाच्या गीतामध्ये राज्याची गौरवगाथा होती. राज्यातील पारंपरिक राजकारणात नवमतदार तसेच तरुण मतदारांना नेतृत्व भावेल असेच प्रयत्न या निमित्ताने करण्यात आले.
पक्षापुढील आव्हाने
तमिळनाडूत अभिनेत्यांनी पक्ष काढण्याचे प्रयोग नवे नाहीत. विजयकांत यांनी देसिया मुरुपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) हा पक्ष स्थापन करून दणक्यात सुरुवात केली होती. अगदी विधानसभेत विरोधी पक्षाचा दर्जाही मिळवला होता. मात्र कामगिरीत त्यांना सातत्य राखता आले नाही. कमलहासन यांचा मक्कम निधी मय्यम हा पक्ष भरारी घेऊ शकला नाही. त्यामुळे विजय यांनी सुरुवात जरी जोरदार केली असली तरी, तमिळनाडूसारख्या मोठ्या राज्यात पक्षाची संघटनात्मक रचना उभारण्याचे आव्हान असेल. दक्षिणेत चित्रपट कलावंतांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. मात्र त्याला राजकीय दिशा देण्यासाठी किंवा पाठिंबा कायम राखण्यासाठी पक्षाची सुनियोजित संघटना उभारणे व त्याद्वारे नियमित कार्यक्रम कार्यकर्त्यांना देणे गरजेचे असते. विजय यांना यामध्ये कितपत यश येईल यावरच त्यांची वाटचाल अवलंबून असेल. तमिळनाडूत सध्या द्रमुकचा प्रभाव आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ७१ व्या वर्षी पुत्र उदयनिधी यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवले आहे. द्रमुकमध्ये नव्या पिढीकडे वारसा हस्तांतरित होत आहे. अर्थात स्टॅलिन हे सक्रिय राहतीलच पण विजय यांची तुलना उदयनिधी यांच्याशी केली जाईल. ४७ वर्षीय उदयनिधी हे चित्रपट निर्मिती क्षेत्रात होते. राज्यात आगामी काळात या दोघांमध्ये सामना होईल. तमिळनाडूत साधारणपणे २०२६ च्या मे महिन्यात पुढील विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे दीड वर्षांचा कालावधी त्यांच्याकडे विजय यांच्याकडे तयारीसाठी आहे.
hrishikesh.deshpande@expressindia.com