संतोष प्रधान
जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुक पक्षात नेतृत्वावरून सुरू झालेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री इडापल्ली पलानीस्वामी यांच्याकडे पक्षाची सूत्रे कायम ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला. हा आदेश म्हणजे दुसरे माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांना मोठा धक्का समजला जातो. सुमारे पाच दशकांपूर्वी स्थापन झालेल्या अण्णा द्रमुकचे नेतृत्व एम. जी. रामचंद्रन (एमजीआर), जयललिता यांच्यासारख्या चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय दिग्गजांनी केले. आता पक्षाची सूत्रे पलानीस्वामी यांच्याकडे आली आहेत. नेतृत्वाचा करिश्मा कायम राखून पक्षाला पुन्हा राजकीय यश मिळवून देण्याचे मोठे आव्हान पलानीस्वामी यांच्यापुढे असेल. तसेच असंतुष्ट नेत्यांमुळे पक्षात फूट पडण्याचीही शक्यता आहे. त्यातून पक्षाला सावरावे लागेल.
अण्णा द्रमुक पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोणता आदेश दिला?
जयललिता यांच्या पश्चात पक्षात दोन सत्ताकेंद्रे तयार झाली. पलानीस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद तर पन्नीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविण्यात आली. यातून पक्षात गुंतागुंत वाढली होती. विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकने सत्ता गमाविल्यानंतर पक्षात दोन सत्ताकेंद्रे असता कामा नये, असा विचार पुढे आला. पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांच्यातील वादात पक्षाची सूत्रे कोणाकडे जाणार हा प्रश्न निर्माण झाला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत पलानीस्वामी यांची अंतरिम सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तर पक्षविरोधी कारवायांवरून पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. म्हणजेच पक्षाची सारी सूत्रे पलानीस्वामी यांनी हाती घेतली. या बैठकीला पन्नीरसेल्वम गटाने मद्रास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
उच्च न्यायालयाने पलानीस्वामी यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या विरोधात पन्नीरसेल्वम गटाने विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या जुलैमध्ये झालेली पक्षाची बैठक अधिकृत ठरविण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल कायम केला. परिणामी पलानीस्वामी यांच्याकडे पक्षाची सारी सूत्रे जाणार आहेत. लवकरच त्यांची पक्षाच्या पूर्णवेळ सरचिटणीसपदी नियुक्ती केली जाईल.
पलानीस्वामी लोकप्रिय आहेत का?
अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन किंवा जयललित यांच्यासारखा करिश्मा पलानीस्वामी यांना नाही. परंतु चांगली प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. जवळपास साडेतीन वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविताना त्यांनी वाद निर्माण केला नाही वा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुक किंवा अण्णा द्रमुकला सत्ता मिळते तेव्हा पाशवी बहुमत मिळते, असे अनुभवास आले आहे. पण गेल्या निवडणुकीत राज्यात सत्ताबदल झाला आणि स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक सत्तेत आला. पण २३४ सदस्यीय विधानसभेत द्रमुकला १३३ तर अण्णा द्रमुकला ६६ जागा मिळाल्या. म्हणजेच अण्णा द्रमुक पक्ष पूर्णपणे भुईसपाट झाला नाही. याचे श्रेय पलानीस्वामी यांना दिले जाते. त्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम तमिळनाडूत अण्णा द्रमुकला चांगल्या जागा मिळाल्या होत्या.
विश्लेषण : दक्षिण चीन समुद्राकडे लक्ष
अण्णा द्रमुकचे भवितव्य काय?
जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुकची जागा घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांच्यात समझोता घडवून आणला. भाजपला तमिळनाडूत हातपाय पसरायचे आहेत. अण्णा द्रमुक कमकुवत होणे हे भाजपसाठी आवश्यक आहे. अण्णा द्रमुकला मानणारा मोठा वर्ग आहे. तमिळनाडूचे राजकारण हे जात व्यवस्थेवर आधारित अधिक आहे. स्टॅलिन सरकार सत्तेत येऊन आता दोन वर्षे पूर्ण होतील. आगामी लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला आपली ताकद दाखवून द्यावी लागेल. भाजपशी हातमिळवणी केल्याने अल्पसंख्याक मते गमवावी लागल्याची भावना पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. यामुळेच सर्व जाती वर्गाना एकत्र करून अण्णा द्रमुकला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असेल. सध्या तरी अण्णा द्रमुक एकमद कमकुवत होईल अशी तरी चिन्हे दिसत नाहीत.