अन्वय सावंत
‘आम्ही आमचा सर्वांत संतुलित आणि सर्वोत्तम संघ निवडला आहे. या संघाबाबत मी आनंदी आहे.’ आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर झाल्यानंतर अशी प्रतिक्रिया कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. मायदेशात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी १५ सदस्यीय प्राथमिक संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. संघात बदल करायचा झाल्यास २८ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी ‘आयसीसी’कडून देण्यात आला आहे. मात्र, खेळाडूंना दुखापती न झाल्यास हाच अंतिम संघ समजावा, असे रोहितने स्पष्ट केले आहे.
विश्वचषकाच्या संघात एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडणारा सूर्यकुमार यादव आणि तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह असलेला केएल राहुल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी संघात एकही ऑफ किंवा लेग-स्पिनर नाही. त्यामुळे हा संघ खरेच संतुलित आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा – विश्लेषण : मराठा आरक्षणाचा वाद मिटणार की पेटणार?
राहुलची निवड का?
यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलची निवड हा विश्वचषकाच्या संघाबाबत सर्वांत चर्चेचा विषय ठरला. राहुलने मे महिन्यापासून कोणत्याही स्तरावर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. ‘आयपीएल’च्या गेल्या पर्वात क्षेत्ररक्षण करताना मांडीला झालेली दुखापत, त्यावर शस्त्रक्रिया आणि त्यानंतर तंदुरुस्ती मिळवण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) मेहनत, अशी कसरत राहुलने गेल्या चार महिन्यांत केली आहे. मात्र, एका दुखापतीतून सावरतो, तोच राहुलला वेगळी दुखापत झाली. त्यामुळे तो सध्या सुरू असलेल्या आशिया चषकातील दोन साखळी सामन्यांत खेळू शकला नाही. मात्र, एकीकडे आशिया चषक सुरू असताना दुसरीकडे राहुलने ‘एनसीए’मध्ये सराव सामने खेळले. यात त्याने ५० षटके यष्टिरक्षण केले आणि ३५ हून अधिक षटके फलंदाजी केली. त्यामुळे राहुलच्या तंदुरुस्तीबाबत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी समाधान व्यक्त करताना त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान दिले.
राहुलच्या निवडीमुळे कोणते प्रश्न उपस्थित झाले?
काही दिवसांपूर्वी आशिया चषकासाठी संघ जाहीर करताना आगरकर यांनी राहुलला पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज असे संबोधले होते. मात्र, राहुल आशिया चषकाच्या दोन साखळी सामन्यांना मुकला आणि इशान किशनला संधी मिळाली. किशनने यापूर्वी सलामीला येताना आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या उपस्थितीत किशनला मधल्या फळीत खेळण्यावाचून पर्याय नव्हता. कारकिर्दीत प्रथमच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी, सामना थेट पाकिस्तानविरुद्ध आणि भारतीय संघाची ४ बाद ६६ अशी बिकट स्थिती. या दडपणाखाली किशनने शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ या वेगवान त्रिकुटाचा नेटाने सामना केला आणि ८२ चेंडूंत ८१ धावांची झुंजार खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे सलग चौथे अर्धशतक होते. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करूनही आणि कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी आपण सक्षम असल्याचे सिद्ध करूनही किशनला संघाबाहेर करून चार महिने क्रिकेट न खेळलेल्या राहुलला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले जाणार का? तसे झाल्यास किशनवर हा अन्याय असेल का? पूर्वपुण्याईवरून राहुलला संधी देणे कितपत योग्य ठरेल? असे विविध प्रश्न उपस्थित होतात. भारताच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीत सर्व उजव्या हाताने खेळणारे फलंदाजच आहेत. अशात किशनचे डावखुरेपण भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल.
हेही वाचा – विश्लेषण : रा. स्व. संघासाठी ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’च; जुन्या ठरावांमध्येही उल्लेख!
सूर्यकुमारला पसंती का?
रोहित, गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, किशन/राहुल हे फलंदाज पहिल्या पाच क्रमांकावर खेळणार हे जवळपास निश्चित आहे. १५ जणांच्या चमूत एका अतिरिक्त फलंदाजाच्या स्थानासाठी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात स्पर्धा होती. एकीकडे सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अधिक अनुभव असला, तरी एकदिवसीयमध्ये त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. त्याला २६ एकदिवसीय सामन्यांत केवळ ५११ धावा करता आल्या आहेत आणि यात त्याने केवळ दोन अर्धशतके केली आहेत. दुसरीकडे तिलकने आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय सामना खेळलेला नाही. मात्र, त्याने वेस्ट इंडिजमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेट पदार्पणात आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर कौतुकास्पद कामगिरी केली होती. तसेच ‘आयपीएल’च्या गेल्या दोन पर्वांत त्याने कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही खेळपट्टीवर, कितीही गुणवान गोलंदाजांविरुद्ध धावा करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. तो डावखुरा फलंदाज असून ‘ऑफ-स्पिन’ गोलंदाजीही करू शकतो. परंतु अखेरीस निवड समितीने अनुभवी सूर्यकुमारलाच पसंती दर्शवली. मोठे फटके मारून सामन्याचे चित्र पालटण्याची सूर्यकुमारमध्ये क्षमता आहे आणि ही बाब त्याच्यासाठी महत्त्वाची ठरली.
चहल आणि अश्विनकडे दुर्लक्ष का?
विश्वचषकासाठी भारताच्या संघात रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या डावखुऱ्या फिरकीपटूंसह ‘चायनामन’ कुलदीप यादवला स्थान मिळाले आहे. जडेजा आणि अक्षर यांच्यातील फलंदाजीची क्षमता भारतासाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. मात्र, या दोघांची गोलंदाजीची शैली साधारण सारखीच आहे. दोघेही डावखुरे फिरकी गोलंदाज असून यष्टींना धरून वेगाने चेंडू टाकण्यासाठी ते ओळखले जातात. त्यामुळे हे दोघे एकत्रित खेळण्याची शक्यता कमीच आहे. कुलदीपने गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची निवड योग्यच ठरते. मात्र, फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध मोठे फटके मारल्यास त्याची गोलंदाजीची लय बिघडते अशी नेहमीच टीका केली जाते. त्यामुळे कुलदीप लयीत नसला आणि प्रतिस्पर्धी संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक असल्यास भारतीय संघ अडचणीत सापडू शकेल. डावखुऱ्या फलंदाजांना डावखुऱ्या फिरकीपटूंविरुद्ध धावा करणे सोपे जाते. अशा वेळी अक्षरच्या जागी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि लेग-स्पिनर यजुवेंद्र चहल या अनुभवी फिरकीपटूंपैकी एक संघात असणे भारतासाठी फायद्याचे ठरले असते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेषत: लेग-स्पिनर मधल्या षटकांत बळी मिळवण्यात यशस्वी ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाले आहे. असे असतानाही निवड समितीने चहलकडे दुर्लक्षच केले.
अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देणे कितपत योग्य?
‘आम्हाला गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांत योगदान देऊ शकतील असे खेळाडू हवे होते,’ असे रोहित म्हणाला. याच कारणास्तव जडेजा, अक्षर, हार्दिक पंड्या आणि शार्दूल ठाकूर या चार अष्टपैलूंना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आठव्या आणि नवव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांच्या धावा निर्णायक ठरू शकतात असे रोहितचे म्हणणे आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांसारख्या संघाचे गोलंदाजही फलंदाजीत योगदान देतात. तसेच या संघांत अष्टपैलूंची संख्या मोठी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल मार्श, मार्कस स्टोइनिस, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल आणि ॲश्टन एगर असे पाच अष्टपैलू आहेत. तसेच कर्णधार पॅट कमिन्स, शॉन ॲबट आणि मिचेल स्टार्क हे गोलंदाज फलंदाजी करण्यात सक्षम आहेत. आता त्यांचे अनुकरण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. यात वावगे असे काहीच नसले, तरी शार्दूलला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यासाठी भारताला जसप्रीत बुमरा, शमी आणि सिराज यांच्यापैकी एका वेगवान गोलंदाजाला संघाबाहेर ठेवण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागेल. भारताने फलंदाजी करू शकतील अशा गोलंदाजांना प्राधान्य दिले आहे. मात्र, त्यामुळे भारताची गोलंदाजी काहीशी कमकुवत झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – विश्लेषण : प्रो गोविंदा म्हणजे नेमके का? याचे नियम काय आहेत?
फलंदाजी आणि गोलंदाजीबाबत कोणते प्रश्न?
भारताच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने रोहित आणि कोहली यांच्यावर असेल. रोहित आणि कोहली यांना गेल्या काही काळात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या वर्षी मार्च महिन्यापासून रोहित आणि कोहली यांनी अनुक्रमे पाच आणि सहा एकदिवसीय सामनेच खेळले आहेत. यात त्यांना एकेक अर्धशतकच करता आले आहे. भारतासाठी हा चिंतेचा विषय ठरू शकेल. मात्र, या दोघांमध्येही मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याची क्षमता आहे. रोहितने गेल्या विश्वचषकात पाच शतके केली होती, तर कोहलीला सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडण्याची संधी विश्वचषकादरम्यान मिळू शकेल. गोलंदाजीत बुमराने बऱ्याच काळापासून एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही. पाठीच्या दुखापतीतून तो आताच सावरला आहे. त्यामुळे तो विश्वचषकात नऊ साखळी सामने खेळण्याइतपत तंदुरुस्त होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.