नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात मागच्या आठवड्यात कुख्यात गुंड सुनील बल्यान ऊर्फ टिल्लू ताजपुरिया याचा इतर कैद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर तिहार तुरुंगात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या तामिळनाडू पोलिसांच्या कार्यशैलीवर खूप टीका झाली. तुरुंगातील सीसीटीव्ही चित्रणामध्ये तामिळनाडू विशेष दलाचे पोलीस हा हल्ला होत असताना निमूटपणे उभे असल्याचे दिसत आहेत. गुन्हा घडत असताना त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे ताजपुरियाचा तुरुंगातच खून झाला. दिल्लीच्या कारागृह विभागाच्या पोलीसप्रमुखांनी तामिळनाडू विशेष पोलीस दलाच्या महासंचालकांना पत्र पाठवून या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या घटनेसाठी जबाबदार धरलेल्या सात अधिकाऱ्यांना निलंबित करून राज्यात माघारी बोलाविण्यात आले आहे. पण इतर राज्यांत अशा प्रकारे दुसरे राज्य आपले पोलीस तैनात करू शकते का? सुरक्षेचे कंत्राट सरकारी यंत्रणेला देता येते का? या विषयाचा घेतलेला हा आढावा.
सध्या, तामिळनाडू विशेष दलाचे १००० हून अधिक अधिकारी तिहार तुरुंगात तैनात करण्यात आले आहेत. तिहार तुरुंगातील कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये हे जवान तैनात आहेत. फक्त तुरुंगातच नाही तर तुरुंगाबाहेरील परिघातही तामिळनाडूचे पोलीस सुरक्षा प्रदान करतात. आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगात जवळपास २,४०० किमी दूर असलेल्या बाहेरील राज्यातून एवढ्या प्रमाणात पोलीस का बोलावण्यात आले असतील? याचे उत्तर शोधायचे झाल्यास तिहार तुरुंगातील १९७६ चा प्रसंग आठवावा लागेल. ज्या प्रसंगामुळे दिल्ली पोलिसांची मान शरमेने खाली गेली होती.
न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या १३ कैद्यांनी तुरुंगाच्या सीमेवर असलेल्या भिंतीजवळ एक बोगदा खणला. या बोगद्यातून हे १३ कैदी मार्च १९७६ रोजी पळून गेले. कैद्यांनी पलायन केल्यानंतर त्यांची पार्श्वभूमी आणि इतिहास तपासण्यात आला. तेव्हा ते सर्व कैदी हरयाणा राज्यातील असल्याचे समजले. विशेष म्हणजे या तुरुंगात सुरक्षेसाठी उपलब्ध असलेले अधिकतर पोलीस जवानदेखील याच राज्यातून येत होते. कैद्यांनी यशस्वी पलायन केल्यानंतर सुरक्षेसाठी तैनात केलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, अशी माहिती सुनील गुप्ता यांनी दिली. गुप्ता १९८१ ते २०१६ पर्यंत तिहार तुरुंगातील कायदा अधिकारी आणि प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. या प्रसंगानंतर कैदी आणि सुरक्षा अधिकारी यांच्यात अंतर असायला हवे, अशी आवश्यकता निर्माण झाली.
तिहार तुरुंगात शिक्षा भोगणारे बहुतेक कैदी हे दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यातले होते. त्यामुळे उत्तरेतली राज्ये वगळता इतर राज्यांतील पोलीस दलाला तिहार तुरुंगाची सुरक्षा करण्यासाठी पाचारण करण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यात हे असे राज्य निवडावे, जिथे हिंदी भाषा सामान्यपणे वापरली जात नसेल, अशी माहिती तिहार तुरुंगात सेवा पुरविणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
निवडणूक आणि इतर अतिमहत्त्वाच्या प्रसंगात बाहेरील राज्यातून सुरक्षाव्यवस्था आयात करण्याचा प्रघात पूर्वीपासून आहे. जसे की, १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि इतर राज्यातील सशस्त्र पोलीस दलाला सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी पाचारण करण्यात आलेले आहे, अशी माहिती पीआयबीने प्रसिद्धीपत्रक काढून दिली. स्थानिक पातळीचा सर्व्हे केल्यानंतर बाहेरून सुरक्षा व्यवस्था मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.
तिहारसाठी तामिळनाडू राज्यच का निवडले?
सुनील गुप्ता यांनी सांगितले की, दिल्लीचा या निर्णयात कोणताही वरचष्मा नव्हता. “दिल्लीतील यंत्रणांनी केंद्र सरकारला पत्र लिहून इतर राज्यांतून पोलीस दल मागविण्याची विनंती केली. पण इतर राज्यांतही एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांची उपलब्धता, शिस्त आणि कार्यपद्धती यांसारखे मुद्दे लक्षात घेऊन अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला,” अशी माहिती गुप्ता यांनी दिली. १९८० च्या वर्षांत तामिळनाडू विशेष दलातील पहिल्या तुकडीला तिहारमध्ये तैनात करण्यात आले.
सध्या तिहार तुरुंगात फक्त तामिळनाडूमधीलच पोलीस दल तैनात नाही, त्यांच्यासोबत केंद्रीय राखीव पोलीस दल आणि तुरुंगातील इतर सुरक्षा अधिकारीदेखील काम करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात तैनात केलेले अधिकारी वरचेवर बदलण्यात येतात. तिहार, रोहिणी आणि मंडोली अशा तीन तुरुंगात अदलून-बदलून पोलिसांची ड्युटी लावली जाते. तिहार तुरुंगात तैनात करण्यात आलेल्या तामिळनाडूमधील पोलिसांना किमान दोन वर्षे इथे सेवा द्यावी लागते. तरीही इतक्या वर्षांत पोलीस आणि कैदी यांच्यात असलेल्या संगनमताला रोखता आलेले नाही. तुरुंगातील अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचे अनेकदा दिसले. कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगातील अधिकाऱ्यांना पैसे देऊन स्वतः आलिशान जीवन जगत असल्याचे समोर आले होते. एप्रिल महिन्यात गँगस्टर प्रिन्स तेवतिया याची तुरुंगात हत्या झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा तिहार तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.