Swami Vivekananda birth Anniversary : १२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जयंतीदिन म्हणून साजरा केला जातो. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विवेकानंद हे हिंदू धर्माचे आध्यात्मिक नेते आणि विचारवंत होते. जगभरात हिंदू धर्माची ओळख करू देत त्यांनी जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. “स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी एक शाश्वत प्रेरणा आहेत. ते आजही तरुण मनांमध्ये उत्साह आणि उद्दिष्टांची ज्वाला प्रज्वलित करतात”, असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. दरम्यान, विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्याच्याबद्दल खास गोष्टी जाणून घेऊया.
हेही वाचा : Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
स्वामी विवेकानंद हे तरुणांचे प्रेरणास्थान मानले जातात. म्हणूनच १९८४ मध्ये भारत सरकारने त्यांच्या जन्मदिवसाला राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केले. स्वामी विवेकानंद यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योग या हिंदू तत्वज्ञानाची ओळख करून दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं होतं. १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म संमेलनात विवेकानंद यांनी भारतातर्फे केलेले भाषण चांगलेच गाजले होते. या भाषामुळे जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख मिळाली.
स्वामी विवेकानंद यांचे सुरुवातीचे जीवन
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ साली कोलकाता येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. लहानपणापासूनच त्यांना पाश्चात्य तत्वज्ञान, इतिहास आणि धर्मशास्त्राची आवड होती. यादरम्यान स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याबरोबर त्यांची भेट झाली. विवेकानंद यांनी रामकृष्ण यांनाच आपले गुरू मानलं. १८८६ मध्ये रामकृष्ण यांच्या मृत्यूपर्यंत स्वामी विवेकानंद त्यांच्याबरोबर होते.
१८९३ मध्ये खेत्री राज्याचे महाराजा अजित सिंह यांच्या विनंतीवरून त्यांनी आपले नाव बदलून विवेकानंद ठेवलं, त्याआधी त्यांचे नाव सच्चिदानंद असे होते. रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्युनंतर विवेकानंद यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला आणि जनतेला त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत तसेच आध्यात्मिक ज्ञान देण्याबाबत शिक्षण दिले.
स्वामी विवेकानंद यांचे शिकागोतील भाषण
स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात झालेल्या सर्वधर्म परिषदेत आपले विचार मांडले होते. त्यांच्या या भाषणाने भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली होती. विवेकानंदांनी आपल्या भाषणात सार्वभौम स्वीकृती, सहिष्णुता आणि धर्म यासारख्या विषयांचा समावेश होता. विवेकानंद यांच्या भाषणानंतर परिषदेतील उपस्थितांनी त्यांना उभं राहून अभिवादन केलं. या भाषणात इतर धर्म एकाच आध्यात्मिकतेसाठी कसे वेगवेगळे मार्ग दाखवतात यावर प्रकाश टाकण्यात आला. भारतीय परंपरेच्या श्रेष्ठतेचा युक्तिवादही त्यांनी आपल्या भाषणातून केला.
शिकागोतील भाषणामुळे मिळाली ओळख
विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणातील अनेक भाग तेव्हापासूनच लोकप्रिय झाले. “जगाला सहिष्णुता आणि सर्वधर्मांची स्वीकृती याची शिकवण देणाऱ्या धर्मात माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्व धर्माचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाहीत तर एकतेवर देखील विश्वास ठेवतो”, असं विवेकानंद यांनी म्हटलं होतं.
“मला गर्व आहे की मी ज्या देशात राहतो त्या देशाने अन्य देशातील छळलेल्या आणि निर्वासितांना आश्रय दिला आहे. आम्ही केवळ आमच्या देशातच नव्हे तर हृदयातही त्यांना स्थान दिलं आहे. जर त्यांचा छळ करणारे भयानक राक्षस अस्तित्वात नसते तर मानवी समाज आजपेक्षा खूप प्रगत झाला असता”, असंही विवेकानंद यांनी म्हटलं होतं. दरम्यान, विवेकानंद यांनी सुरुवातीला अमेरिका आणि नंतर ब्रिटनमधील विविध ठिकाणी व्याख्याने दिली. त्यामुळे पाश्चिमात्य जगात ते भारतीय ज्ञानाचे दूत म्हणून ओळखले जाऊ लागले.
हेही वाचा : Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
रामकृष्ण मिशनची केली स्थापना
भारतात परतल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण परमहंस यांचे विचार आणि त्यांची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा हेतू होता. त्याचबरोबर गरीब आणि दुबळ्या लोकांची धार्मिक तसेच अध्यात्मिक प्रगती व्हावी, असाही विवेकानंद यांचा विचार होता. १८९९ मध्ये विवेकानंदांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे बेलूर मठाची स्थापना केली. पुढे हेच त्यांचे कायमचे निवासस्थान झाले.
स्वामी विवेकानंद यांचा वारसा
विवेकानंदांनी आपल्या भाषणांमधून आणि व्याख्यानातून धार्मिक विचारांचा प्रसार करण्याचे काम केले. त्यांनी नवीन वेदांताचा प्रसार करून पाश्चात्य दृष्टिकोनातून हिंदू धर्माची व्याख्या केली. आध्यात्मिकतेला भौतिक प्रगतीबरोबर एकत्र करण्यावर त्यांचा विश्वास होता. विवेकानंद यांनी ‘राज योग’, ‘ज्ञान योग’ आणि ‘कर्म योग’ यासारखी अनेक पुस्तके देखील लिहिली. योगाचा अभ्यास हा देखील त्यांचा महत्त्वाचा वारसा होता.
विवेकानंद यांचा शेवटचा संदेश कोणता?
इंडियन एक्सप्रेसने एका लेखात असं म्हटलं आहे की, “शिकागोतील भाषणानंतर भारताच्या प्राचीन अध्यात्मिक संस्कृतीबाबत जगाला सांगण्याचा मार्ग योगपुरुष विवेकानंदांनी शोधून काढला. पाश्चिमात्य मंडळींपर्यंत भारतीय संस्कृती पोहोचवण्यात योग हा सुरेख दुवा ठरला.” १९०२ मध्ये मृत्यूपूर्वी स्वामी विवेकानंद हे त्यांच्या एका पाश्चात्य अनुयालाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, “कदाचित मला माझ्या शरीरातून बाहेर पडणं चांगलं वाटेल. जुन्या कापडासारखे ते फेकून देण्याची इच्छा होईल. परंतु, मी काम करणं थांबवणार नाही. जोपर्यंत संपूर्ण जगाला हे कळत नाही की ते देवाशी एकरूप आहेत, तोपर्यंत मी लोकांना प्रेरणा देत राहीन.”