How Swearing Help Relieve Pain : शिवी देणं आणि शिवी खाणं हे कोणत्याही व्यक्तीला आवडत नाही. मात्र, राग अनावर झाल्यानंतर अनेकांच्या तोंडातून शिव्या बाहेर पडतात. शरीराला एखादी दुखापत झाली किंवा ठेच लागली, तर सहजपणे तोंडातून शिवी निघून जाते. काहींना तर लहानसहान गोष्टींवरूनही शिव्या देण्याची सवय असते. मुळात शिवी देणं ही गोष्ट समाजानं निषिद्ध मानली आहे. लहान मुलांच्या तर कानावरही असे शब्द पडू नयेत, यासाठी पालकांकडून काळजी घेतली जाते. परंतु, अधूनमधून शिव्या दिल्यानं वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. अभ्यासात नेमकं काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवी म्हणजे नेमकं काय?

शिवी म्हणजे एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी जाणूनबुजून वापरलेले अपमानजक व घारणेरडे शब्द. शिव्या देणारे लोक सहसा कुणालाही आवडत नाहीत; पण आता शिव्यांबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. कारण, यूकेमधील संशोधकांना असं आढळून आलंय की, शिव्या दिल्यानं वेदना सहन करण्याची क्षमता ३२ टक्क्यांनी वाढू शकते, ज्यामुळे अस्वस्थतेचा सामना करण्याचा एक अनपेक्षित मार्ग मिळतो.

तुम्ही शिवी नक्की द्या; पण त्या घाणेरड्या आणि कानांना ऐकणं कठीण होईल, अशा नसाव्यात. मनातल्या मनात का होईना, शिव्या द्या. शिव्या देणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, असं संशोधकांनी सांगितलं आहे. “शिवी ही खरोखर जादुई गोष्ट आहे, ज्यामुळे वेदनेपासून आपल्याला दिलासा मिळतो, असं ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानसशास्त्र विषयाचे संशोधक ऑली रॉबर्टसन यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’शी बोलताना म्हटलं आहे.

आणखी वाचा : पीएचडीधारक विद्यार्थ्याचा ६० महिलांवर बलात्कार, व्हिडीओही काढले; घटनेला वाचा कशी फुटली?

शिवी दिल्यानं वेदना कमी होतात का?

शिवी देणं या विषयावर यूकेमधील संशोधकांनी नुकताच एक अभ्यास केला. त्यामध्ये संशोधकांना असं आढळून आलं की, शिव्या दिल्यानं शरीरात ‘लढाई करा किंवा पळून जा’ अशी भावना तयार होते. त्यामुळे शरीरातील अॅड्रेनालाइनसारख्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. हे हार्मोन्स शरीराला अधिक वेगानं आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत करतात. त्यामुळे वेदनेच्या क्षणी शिव्या देणं आपल्याला त्या वेदना कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात. पण, ही प्रतिक्रिया नेमकी कशामुळे होते हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे.

वॉकहार्ट हॉस्पिटल्समधील एक कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पाई यांनी ‘द डेक्कन हेराल्ड’ला सांगितलं, “शिवी दिल्यानं मेंदूचे विशिष्ट भाग सक्रिय होतात. जे भावना आणि वेदनेवर नियंत्रण मिळविण्याशी संबंधित असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वेदना झाली, तेव्हा त्याच्या तोंडातून नकळत शिवी बाहेर पडते. त्यामुळे अॅड्रेनालाइन नावाचा हार्मोन्स बाहेर पडतो, जो वेदना सहन करण्याची क्षमता वाढवतो आणि तात्पुरता अस्वस्थता कमी करतो.”

संशोधनातून काय समोर आलं?

इंग्लंडमधील कील विद्यापीठातील मानसशास्त्राचे संशोधक आणिव वरिष्ठ व्याख्याते रिचर्ड स्टीफेन्स यांनी २००९ मध्ये एक संशोधन केलं. त्यामध्ये शिव्यांचा संबंध हा हायपोअल्जेसिया (Hypoalgesia) म्हणजेच वेदना आणि त्याची तीव्रता कमी होणं याच्याशी जोडण्यात आला आहे. रिचर्ड यांनी तरुण विद्यार्थ्यांना संशोधनात सहभागी केलं आणि त्यांचे हात अतिशय थंड असलेल्या पाण्यात बुडवले. त्यानंतर विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संशोधकानं कोणतेही शब्द उच्चारण्यास सांगितलं. अभ्यासातून असं दिसून आलं की, ज्यांनी अपशब्द वापरले त्यांच्यामध्ये इतरांच्या तुलनेत वेदना सहन करण्याची क्षमता जास्त होती. चांगले शब्द उच्चारणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अपशब्द वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी वेदना जाणवल्या होत्या.

शिव्या देणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं?

२०२१ मध्येही अमेरिकेतील ‘new jersey city university’च्या संशोधकांनी शिवी देण्यावर सविस्तरपणे अभ्यास केला होता. त्यात संशोधकांनी असा दावा केला होता की, जे लोक जास्त शिव्या देतात, ते दीर्घकाळ आयुष्य जगतात. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे शिव्या दिल्यानं त्यांच्या मेंदूवरील ताण कमी होतो. ज्यामुळे ते इतरांच्या तुलनेत ‘टेन्शन फ्री’ असतात. एखादी चुकीची किंवा न पटणारी घटना घडल्यावर आपलं त्यावर काहीच नियंत्रण नसतं. अशा वेळी शिव्या देऊन मोकळं झालं की, ताण कमी होतो आणि लवकर मिटतो, असंही संशोधकांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : Marathi Politics : मुंबईत मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी होतेय का? हिंदी भाषिक का वाढले?

शिव्या दिल्यानं शरीरातील ऊर्जा वाढते?

शिव्या दिल्यानं शरीराला होणाऱ्या वेदना कमी होतातच, त्याशिवाय नकारात्मक भावना निघून जाते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, असा दावाही संशोधकांनी केला. “न्यूरोलॉजिकलदृष्ट्या, शारीरिक वेदना आणि भावनिक वेदनांचे मार्ग सारखेच आहेत,” असे रॉबर्टसन यांनी द वॉशिंग्टन पोस्टला सांगितले. मनोरंजक गोष्ट म्हणजे अलीकडच्या संशोधनातून असं दिसून आलं की, शिव्या दिल्यानं शरीरातील ऊर्जादेखील वाढण्यास मदत होते. म्हणूनच एखाद्या गोष्टीवरून तुम्हाला त्रास झाला, तर मनातल्या मनात का होईना पटकन शिवी देऊन मोकळं व्हावं, असं रॉबर्टसन यांनी म्हटलं आहे.

कोणत्या भाषेत शिवी दिल्यानं वेदना कमी होतात?

शिव्या दिल्यानं शरीरातील वेदना कमी होऊन ऊर्जा कशी वाढते, याचं स्पष्टीकरण संशोधकांनी दिलं नाही. त्यावर आणखी सखोलपणे अभ्यास करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वेदना कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या भाषेत शिवी देतात हेही महत्त्वाचं आहे. ऑली रॉबर्टसन व रिचर्ड स्टीफन्स या संशोधकांनी इंग्रजी व जपानी भाषकांची तुलना करून वेगवेगळ्या भाषांमध्ये शिव्या देण्याचा समान परिणाम होतो का याचा शोध घेतला. त्यांनी इंग्रजी व जपानी बोलणाऱ्या आणि शिव्या देणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास केला. निष्कर्षांवरून असं दिसून आलं की, भाषा कोणतीही असो, शिव्या दिल्यानं वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. “जर तुम्हाला कधी वेदना झाल्या असतील, तर पटकन शिवी देऊन मोकळे व्हा. मग त्यासाठी स्वत:ला गुन्हेगार मानू नका, असंही रॉबर्टसन आणि स्टीफन्स यांनी सांगितलं.