अटेंशन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) म्हणजेच अंतिचंचलता हा विकार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून येतो. सर्वसाधारणपणे शाळेत शांत न बसणाऱ्या आणि खोडकर मुलांमध्ये या विकाराची लक्षणे दिसून येतात. आता सर्वच वयोगटांत हा विकार दिसून येऊ लागला आहे. त्यातही प्रामुख्याने तरुण आणि मध्यमवयीन महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. हा विकार लहानपणी होतो आणि मोठे झाल्यानंतर आपोआप बरा होता, हा समज खूप काळ होता. नंतर १९९० मध्ये झालेल्या संशोधनातून प्रौढपणातही हा विकार कायम राहत असल्याचे समोर आले. लहानपणी हा विकार असलेल्या किमान ६० टक्के जणांमध्ये प्रौढपणीही हा विकार दिसून येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्षणे कोणती?

या विकाराचे प्रामुख्याने एकाग्रतेचा अभाव, अतिक्रियाशीलता आणि आवेगशीलता हे तीन प्रकार आहेत. अनेक जणांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करता येत नाही. तसेच, ठरवून दिलेले काम करण्याकडे त्यांचे लक्ष नसते. काही जण अतिक्रियाशील असतात. त्यांच्या या अतिक्रियाशीलतेमुळे अनेक ठिकाणी ते चौकटीत बसत नाहीत. फारसा विचार न करता आवेगात कृती करणे आणि स्वत:वर नियंत्रण नसणे अशी लक्षणे या विकाराच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. रुग्णाच्या लक्षणानुसार त्याची वर्गवारी एकाग्रतेचा अभाव, अतिक्रियाशीलता आणि आवेगशीलता या प्रकारांमध्ये केली जाते. काही जणांमध्ये दोन प्रकारांचे मिश्रण पाहायला मिळते.

हेही वाचा >>> विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?

अडचणी कोणत्या?

या विकाराच्या रुग्णांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येत नाही आणि सहजपणे त्यांचे लक्ष विचलित होते. वेळेचे व्यवस्थापन, नियोजन आणि सुसंगतपणे गोष्टी करण्यात अडचणी येतात. अनेकदा ते गोष्टी विसरतात. दैनंदिन गोष्टींचाही त्यांना अनेक वेळा विसर पडतो. एखादा बोलत असताना मध्येच बोलणे अथवा सतत बडबड करण्याची सवयही अशा रुग्णांमध्ये दिसून येते. मोठे काम अथवा एकाच वेळी अनेक कामे करणे या रुग्णांना शक्य होत नाही. एकाच जागी खूप काळ स्थिर बसणे शक्य होत नाही. यामुळे त्यांच्या व्यक्तिगत जीवनासोबत सार्वजनिक जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. मेंदूशी निगडित हा विकार असल्याने त्याबाबत फारसे बोलले जात नाहीत. या आजारामुळे रुग्णावर वेगळा शिक्का बसण्याचा धोका असल्याने कुटुंबीय खुलेपणाने बोलत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास अनेक अडचणी येतात.

निदान कसे होते?

लहान वयात अथवा प्रौढपणी या विकाराचे निदान होऊ शकते. लहान वयात निदान न झालेल्या प्रौढांमध्ये नंतर या विकाराचे निदान होते. लहान मुले आणि प्रौढांमध्ये या विकाराचे निदान करण्याचे निकष थोडे वेगळे आहेत. या विकाराच्या १६ वर्षांवरील मुलांमध्ये किमान सहा लक्षणे तरी दिसून यावी लागतात. प्रौढांमध्ये या विकाराचे निदान करणे अवघड असते. त्यामुळे त्यांच्या वयाच्या १२ वर्षांपर्यंतच्या वर्तनाच्या अथवा वैद्यकीय अहवालांच्या आधारे निदान केले जाते. याचबरोबर रुग्णाचे कुटुंबीय आणि मित्रांशी बोलून हे निदान करावे लागते.

हेही वाचा >>> हिंदू महिलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी; कोण आहेत तुलसी गबार्ड?

जगभरात काय स्थिती?

ब्रिटनचा विचार करता एकूण लोकसंख्येपैकी ४ टक्के म्हणजेच २० लाख जणांना अंतिचंचलता विकार असल्याचा अंदाज आहे. त्याच वेळी अमेरिकेत ही संख्या ८७ लाख आहे. गेल्या दोन दशकांत अमेरिकेत या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातही प्रौढांमध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. अमेरिकेत दोन दशकांपूर्वी प्रौढांमध्ये या विकाराचे प्रमाण ६.१ टक्के होते. ते आता १०.२ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे अमेरिकेत २०२० पासून या विकाराचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारताचा विचार करता मागील काळात झालेल्या काही संशोधनानुसार प्रौढांमध्ये या विकाराचे प्रमाण ५.४८ ते २५.७ टक्के आढळून आले आहे.

उपचार कोणते?

या विकाराच्या उपचारांमध्ये रुग्णांमधील लक्षणांची तीव्रता कमी करण्यावर भर दिला जातो. प्रौढांना औषधे दिली जातात. याचबरोबर त्यांचे मानसिक समुपदेशन केले जाते. समुपदेशक या रुग्णांना दैनंदिन जीवनातील कौशल्यांमध्ये सुधारणा शिकवितात. याचबरोबर जीवनशैलीत सकारात्मक बदल सुचविले जातात. शारीरिक व्यायाम करण्यासही सांगितले जाते. या रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांचेही समुपदेशन महत्त्वाचे ठरते. रुग्ण हा मुद्दाम तसा वागत नाही, हे कुटुंबीयांना स्वीकारावे लागते. त्यांनी रुग्णाची स्थिती समजून घेतल्यास त्याला योग्य पाठबळ मिळून तो लवकरात लवकर सुधारू शकतो. त्यातून हा रुग्ण सर्वसामान्य आणि आनंदी जीवन जगू शकतो.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symptoms and challenges for adhd in adults attention deficit hyperactivity disorder in children print exp zws