सीरियाच्या हंगामी अध्यक्षांनी आपला पहिला परदेश दौरा करण्यासाठी इराण नव्हे, तर सौदी अरेबियाची निवड केली. इराणचे निकटवर्ती असलेल्या बशर अल असद यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर सीरियात झालेल्या सत्तांतरानंतर हा पहिला मोठा भूराजकीय बदल मानला जात आहे. यातून इराण-रशियापासून सीरिया दूर जात असून अमेरिकेला अधिक जवळ असलेल्या स्थानिक सहकाऱ्याचा शोध सुरू झाल्याचे चित्र आहे. सीरियाच्या बदलत्या भूमिकेमुळे पश्चिम आशियातील राजकारणही वेगळ्या वळणावर जाण्याची चिन्हे आहेत…
सीरियाचे नवे हंगामी अध्यक्ष कोण?
बंडाची यशस्वी सांगता झाल्यानंतर आणि बशर अल असद रशियाला पळून गेल्यानंतर बंडखोरांचे एक बडे नेते अहमद अल-शारा हे सीरियाचे हंगामी अध्यक्ष झाले आहेत. अबू मोहम्मद अल-गोलानी या ‘युद्धनामा’ने ते जगभर ओळखले जातात. त्यांचा जन्म १९८२ साली सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झाल्याचे सांगितले जाते. अल-शारा यांचे वडील अभियंता होते तर आई भूगोलाची शिक्षिका… १९८९ साली त्यांच्या कुटुंब मायदेशी, सीरियाला परतले. अल-शारा काही काळ दमास्कसच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते. मात्र शिक्षण अर्धवट सोडून ते असद यांच्याविरोधातील बंडखोर टोळ्यांमध्ये ते सहभागी झाले. २०१६मध्ये ते सीरिया मुक्तीसेनेचे कमांडर झाले. २०१७मध्ये अल-कायदाशी संलग्न असलेल्या ‘अल-नुसरा फ्रंट’चे ते नेते झाले. कालांतराने त्यांनी अल-कायदाशी फारकत घेतली आणि ‘हयात तहरीर-ए-शाम’ (एचडीएस) या बंडखोरांच्या गटाची स्थापना केली. सीरियाच्या इडलिब प्रांतातील हा प्रभावशाली बंडखोर गट होता.
सौदी भेटीची वैशिष्ट्ये काय?
अल-शारा आपले परराष्ट्रमंत्री असद अल-शाईबानी यांच्यासह रविवारी सौदीची राजधानी रियाधला पोहोचले. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रवास सौदी विमानातून केला. त्यांच्या पाठीमागे असलेल्या टेबलवर सौदीचाच राष्ट्रध्वज झळकत होता. रियाध विमानतळावर उतरत असताना तेथे सौदीच्या राष्ट्रध्वजाबरोबरच सीरियाचा नवा तीन तारे असलेला तिरंगी ध्वज फडकविण्यात आला होता. सौदी प्रसारमाध्यमांनी या दौऱ्याला जोरदार प्रसिद्धी दिली. अल-शारा यांनी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. सौदीला ‘भगिनीसमान’ असलेल्या सीरियामध्ये सुरक्षा आणि स्थैर्य यावर दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याचे सौदी माध्यमांनी म्हटले आहे. तर सीरियातील ‘सना’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मानवाधिकार आणि अर्थकारण यासह सर्वच मुद्द्यांवर सहकार्य आणि संवाद वाढविण्याबाबत सौदी युवराजांशी चर्चा झाल्याचे अल-शारा यांनी म्हटले आहे. अर्थात सौदीबरोबर अल-शारा यांची मैत्री नवी नाही. सीरियामध्ये असद यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी बंडखोर गटांना रसद पुरविणाऱ्यांमध्ये सौदी अरेबिया हे प्रमुख अरब राष्ट्र आहे. मात्र आता अल-शारा बंडखोरांचे नेते नाहीत, तर एका देशाचे नेते आहेत. आता ते काळजीपूर्वक आपली प्रतिमा तयार करताना दिसत आहेत.
‘पुरोगामी’ दिसण्याचा अल-शारा यांचा प्रयत्न का?
सीरियाचे हंगामी अध्यक्ष झाल्यापासूनच अल-शारा यांनी आपली प्रतिमा शांतताप्रीय करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासारखा ‘ऑलिव्ह’ रंगाचा लष्करी गणवेश ते परिधान करतात. प्रशासनात त्यांनी महिलांना मोठ्या प्रमाणात सामावून घेणे, सीरियातील ख्रिश्चन आणि शियापंथीय अलावत समाजाशी संवाद साधणे यातून ते सर्वसमावेशक असल्याचे दाखवत आहेत. त्याच वेळी असद यांच्यावर वरदहस्त असलेल्या इराण आणि रशियाला चार हात लांब ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणने दमास्कसमध्ये अद्याप आपली वकिलात सुरू केलेली नाही. या ‘पुरोगामी’ प्रतिमानिर्मितीचा एक भाग म्हणून त्यांनी पहिल्या दौऱ्यासाठी अन्य कोणत्याही देशात न जाता सौदीची निवड केल्याचे मानले जाते. इराण-रशियाला दूर ठेवून पाश्चिमात्य राष्ट्रांच्या अधिक जवळ असलेल्या अरब राष्ट्रांशी मैत्री वाढविण्यामागील कारणे जितकी आर्थिक आहेत तितकीच सुरक्षेसाठी महत्त्वाची…
पहिल्या दौऱ्यासाठी सौदीची निवड का?
असद यांच्या राजवटीत अमेरिका-युरोपने सीरियावर अनेक निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध हटवून देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देणे यास अल-शारा यांचे प्राधान्य आहे. सुमारे दशकभराच्या अंतर्गत यादवीने गांजलेल्या सीरियाला पुन्हा उभारी द्यायची असेल, अत्यंत हालाखीत राहणाऱ्या कोट्यवधी नागरिकांना दिलासा द्यायचा असेल, तर त्यासाठी काही अब्ज डॉलरची गरज आहे. ही गरज भागविण्याचे सामर्थ्य केवळ पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये आहे. दुसरीकडे इस्लामिक स्टेट आणि अन्य लहान-मोठ्या दहशतवादी गटांच्या कारवाया सुरूच आहेत. शनिवारीच अलेप्पो प्रांतातील मन्जिब शहरात झालेल्या स्फोटात चौघांचा बळी गेला असून नऊ जण जखमी झाले आहेत. तुर्कीचा पाठिंबा असलेले काही बंडखोर अद्याप सीरियात वावरत आहेत. त्यांचा बिमोड केला जात नाही किंवा त्यांच्याशी तडजोड केली जात नाही तोपर्यंत अल-शारा यांची सत्ता स्थिर होणे अशक्य आहे. या सर्व बाबींचा विचार करून पाश्चिमात्य राष्ट्रांना सकारात्मक संदेश देण्यासाठीच ते सर्वप्रथम सौदीला गेल्याचे उघड आहे. या एका कृृतीतून अल-शारा ऊर्फ गोलानी यांनी भूतकाळातील मदतीची जाणीव, वर्तमानातील गरजपूर्ती आणि भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले आहेत. शिवाय त्यांच्या या दौऱ्याला एक भावनिक आधारही आहे. कारण रियाध हे त्यांचे जन्मस्थळ आहे.
amol.paranjpe@expressindia.com