सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये ८ डिसेंबर रोजी विविध बंडखोरांचे आगमन झाले. त्याच्या काही काळ आधीच तेथील हुकूमशहा आणि २४ वर्षे अध्यक्ष राहिलेले बशर अल असद यांनी देश सोडून पळ काढला. पण या बंडखोरांमध्येही लक्ष वेधले अबू मोहम्मद अल जोलानी याने. तो हयात तहरीर अल शाम (एचटीएस) या गटाचा म्होरक्या असून, त्याच्या संघटेनेची मुसंडी असद यांच्या पाडावासाठी निर्णायक ठरली. सीरियाची सूत्रे त्याच्याकडेच असतील, असे सांगितले जाते. 

अबू मोहम्मद अल जोलानी…

४२-वर्षीय अबू मोहम्मद अल जोलानी हा एचटीएस या संघटनेचा नेता. ही संघटना पूर्वी अल कायदाशी संलग्न होती. यामुळेच आतापर्यंत तरी अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी अल जोलानीला जाहीर पाठिंबा दिलेला नाही. पण सीरियामध्ये सर्वाधिक बेधडक मुसंडी अल जोलानीनेच मारलेली दिसते. याशिवाय इडलिब या सीरियातील प्रांतावर त्याची गेले काही वर्षे सत्ता आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात अल जोलानीच्या नेतृत्वाखाली एचटीएस संघटनेने अलेप्पो हे सीरियाचे दुसरे महत्त्वाचे शहर जिंकले. त्यानंतर दमास्कसच्या दिशेने कूच करताना अनेक महत्त्वाचे प्रदेश ताब्यात घेतले. त्याच्या जिहादी पार्श्वभूमीविषयी तुर्कीयेला काहीच वावडे नाही. अल जोलानीचा जन्म सौदी अरेबियात झाला. त्याचे सुरुवातीचे नाव होते अहमद हुसेन अल शरा. त्याचे पालक सीरियन स्थलांतरित होते. कालांतराने ते पुन्हा सीरियात आले. अबू मोहम्मद अल जोलानीने २००३ मध्ये इराक गाठले आणि अल कायदामध्ये भर्ती होऊन तो अमेरिकी फौजांशी लढू लागला. तेथे त्याला अटक झाली आणि काही वर्षे त्याने तेथील अमेरिकी तुरुंगात काढली.

हेही वाचा –  आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?

जिहादी प्रतिमा बदलणार?

सीरियात अंतर्गत यादवीच्या काळात अबू मोहम्मद अल जोलानीने ‘नुसरा फ्रंट’ ही संघटना स्थापन केली. ती अल कायदाचीच शाखा होती. तिचे नाव पुढे हयात तहरीर अल शाम (स्वैर अनुवाद – लेवांत (सीरिया) स्वातंत्र्य संघटना) असे करण्यात आले. याच दरम्यान कधीतरी अहमद हुसेन अल शरा याने ‘अबू मोहम्मद अल जोलानी’ असे नाव धारण केले. अल कायदासारखी जिहादी प्रतिमा मोडून काढण्याचा प्रयत्न अल जोलानी आणि एचटीएसने केला आहे. अल कायदा, तालिबान किंवा आयसिसप्रमाणे ‘धर्मसत्ता’ स्थापण्याची आपली महत्त्वाकांक्षा नाही, असा एचटीएसचा दावा आहे. यासाठीच इडलिब या प्रांतावर ताबा मिळवल्यानंतर तेथे रीतसर प्रशासन स्थापण्याचा निर्णय अल जोलानी आणि त्याच्या साथीदारांनी घेतला. त्यांच्या ताब्यातील प्रदेशात कर गोळा करणे, मर्यादित नागरी सुविधा पुरवणे, नागरिकांना ओळखपत्रे देणे अशी कामे त्यांनी केली, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद आहे. अर्थात या संघटनेकडून नागरिकांवर अत्याचार झाल्याच्या, दडपशाहीच्याही अनेक तक्रारी आहेत. पण इतर सुन्नी किंवा शिया जिहादी गटांप्रमाणे धर्मयुद्ध इतकाच अल जोलानी आणि त्याच्या संघटनेचा मर्यादित हेतू नसावा, असे अनेक पाश्चिमात्य विश्लेषकांना वाटते. 

हेही वाचा – सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

सीरियाच्या एकत्रीकरणाचे आव्हान

अबू मोहम्मद अल जोलानी हा सुन्नी आहे, तर सीरियाचे अनेक भाग हे शियाबहुल आहेत. खुद्द बशर अल असद शियापंथिय होते आणि दमास्कसमधील प्रशासनावरही शियांचा पगडा आहे. असा दुभंगलेला देश जोडण्याचे आव्हान अल जोलानीसमोर आहे. तुर्कीयेने त्याच्या सुन्नी जिहादी पार्श्वभूमीसाठीच त्याला शस्त्रे आणि निधी पुरवला. तो ही भूमिका सोडून देऊ लागल्यास त्याची राजवट अस्थिर करण्याचे प्रयत्न त्या देशाकडून होऊ शकतात. लिबिया आणि इराकमध्येही शासकांच्या राजवटी उलथून टाकण्यात आल्या. पण सीरियामध्ये हे संक्रमण स्थानिकांच्या देखरेखीखाली होत आहे हा मोठा फरक आहे. सीरियामध्ये सध्या चार प्रमुख गट सक्रिय आहेत. वायव्येकडे तुर्कीये समर्थित अबू मोहम्मद अल जोलानीचा हयात तहरीर अल शाम, ईशान्येकडे कुर्दिश बंडखोरांचा गट, दक्षिणेकडे जॉर्डन समर्थित बंडखोरांचा गट आणि पश्चिमेकडे अजूनही बशर अल असद यांच्याशी इमान सांगणारा एक गट. प्रत्येक गटाकडे स्वतःची फौज आहे. पण सध्या तरी बहुतेक सर्व गटांनी एचटीएसशी जुळवून घेण्याची भूमिका घेतलेली दिसून येते. धर्मयुद्धातून सीरियाची शकले उडणार नाहीत, ही खबरदारी अबू मोहम्मद अल जोलानी आणि इतर बंडखोर गट घेत आहेत. पण त्यांचे मतैक्य किती काळ टिकते आणि तुर्कीये, इराण, रशिया यांचा हस्तक्षेप विराम किती काळ टिकतो, यावरच सीरियाचे भवितव्य अवलंबून राहील. 

Story img Loader