ज्ञानेश भुरे

ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आता निर्णायक वळणावर आली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड अशी उपांत्य फेरीची दुसरी लढत गुरुवारी (१० नोव्हेंबर) खेळली जाईल. भारताला विजयासाठी पहिली पसंती मिळत आहे. या उपांत्य फेरीसाठी भारतीय संघाचा सराव कसा सुरू आहे, अंतिम ११ खेळाडू निवडताना संघ व्यवस्थापनाचा कसा कस लागेल, याचा मागोवा…

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

उपांत्य फेरीत भारताची ताकद नेमकी कशात?

भारतीय संघ क्रिकेटविश्वात आपल्या फलंदाजीच्या जोरावर वर्चस्व राखून होता. मात्र, अलीकडच्या काळात भारताने गोलंदाजीतही आपला प्रभाव पाडला आहे. विशेषतः भारताच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरते आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग या वेगवान त्रिकुटाने छाप पाडली आहे. रविचंद्रन अश्विनने मायदेशासह परदेशातही आपल्या फिरकीचे जाळे यशस्वी विणले. अश्विनला यजुवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांची साथ मिळाली. या सगळ्यात अश्विन एक पाऊल पुढे राहिला. विश्वचषकात अश्विनने चमक दाखवली आहे. आतापर्यंत त्याने सहा गडी बाद केले आहेत. इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळायची तितकीशी सवय नाही. त्यामुळे भारतीय फिरकीपटू या सामन्यात निर्णायक ठरू शकतात. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपने भारताकडून सर्वाधिक ११ गडी बाद केले आहेत. त्याचीही भूमिका महत्त्वाची असेल.

भारतीय फलंदाजीच्या कामगिरीची अजूनही चिंता?

उपांत्य फेरीपर्यंत भारताच्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांखेरीज एकही फलंदाज सातत्य राखू शकलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध कोहलीने भारताला एकहाती विजय मिळवून दिला. नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा एकदा कोहली चमकला. त्याला सूर्यकुमारच्या आक्रमकतेची साथ मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमार वगळता भारताचे फलंदाज चमकलेच नाहीत आणि भारताने तो सामना गमावला. बांगलादेशविरुद्ध कोहलीच खेळला. झिम्बाब्वेविरुद्ध सूर्यकुमारने पुन्हा धावा केल्या. आव्हान उभे करताना आणि आव्हानाचा पाठलाग करताना कोहली, सूर्यकुमार हा समान धागा राहिला आहे. आघाडीची फळी म्हणजे अर्थातच रोहित शर्मा, केएल राहुल यांना चमक दाखवता आलेली नाही. भारताच्या आतापर्यंतच्या धावसंख्येत कोहली आणि सूर्यकुमारचा वाटा ८० टक्के आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान रोहित जायबंदी झाल्याचे वृत्त आहे. संघ व्यवस्थापनाने रोहितची दुखापत गंभीर नसल्याचा निर्वाळा दिल्याने भारताला काहीसा दिलासा मिळाला.

विश्लेषण: सूर्यकुमारचे योगदान भारतासाठी का ठरते निर्णायक? त्याच्या फलंदाजीचे वेगळेपण काय?

भारतीय संघासमोर आणखी काय आव्हाने असतील?

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झालेल्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तर भारताचे क्षेत्ररक्षण फार वरच्या दर्जाचे झालेले दिसून येत नाही. तशात अश्विन, रोहित हे मैदानावर धीमे ठरतात. त्यांना इंग्लंडकडून हेरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपांत्य फेरीच्या प्रवासापर्यंत त्यांनी पहिल्याच सामन्यात खेळलेल्या खेळाडूंवर विश्वास दाखविण्याचे नियोजन केले. मधल्या काळात त्यांनी दीपक हुडाला खेळविण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिक, अक्षर पटेलला वगळले. मात्र, यातून काही हाती आले नाही. त्यामुळे पुन्हा पहिल्याच सामन्यातील संघावर भारत ठाम राहिले. ऋषभ पंतचा वापर करण्यात आला नाही. यजुवेंद्र चहलला संधी मिळाली नाही. आता थेट उपांत्य फेरीत या दोघांना संधी मिळाली, तर ते दडपणाचा कसा सामना करतात यावर बरेच काही अवलंबून असेल.

खेळपट्टीचे स्वरूप कसे राहील?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी ॲडलेडच्या मैदानावर आधीच्या म्हणजेच न्यूझीलंड वि. आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान या सामन्यादरम्यान वापरलेल्या खेळपट्टीचा वापर करण्याचा निर्णय ‘आयसीसी’ने घेतला आहे. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरसह संघ व्यवस्थापनाने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. इंग्लंडला सामना नव्या खेळपट्टीवर खेळविण्यात येईल अशी अपेक्षा होती. इंग्लंडमध्ये २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत कार्डिफ येथे पाकिस्तानविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना खेळविण्यात आल्यावर जबरदस्त टीका झाली होती. त्यामुळे २०१९साली इंग्लंडमध्येच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य सामन्यांसाठी दोन खेळपट्ट्या नव्याने तयार करण्यात आल्या होत्या. आता या वेळी पुन्हा एकदा वापरलेल्या खेळपट्टीवर उपांत्य लढत होणार असल्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजांना याचा फायदा होईल. यावर अश्विन, अक्षर पटेल हे इंग्लंडच्या आदिल रशीद, मोईन अलीपेक्षा अधिक फायदा उठवू शकतील.

विश्लेषण: दुबळ्या मानल्या गेलेल्या संघांचा विश्वचषक?

भारताचा अंतिम ११ जणांचा संघ कसा असेल?

ट्वेन्टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत सहसा विजयी संघात बदल केला जात नाही. भारतीय संघातही बदल अपेक्षित नाही. त्यानंतरही इंग्लंडची फिरकी गोलंदाजी खेळण्यातली उणीव लक्षात घेता भारत एका अतिरिक्त फिरकी गोलंदाजाचा समावेश करणारा का, हा मोठा प्रश्न असेल. असा निर्णय झाल्यास अश्विन, अक्षरसह यजुवेंद्र चहलला संधी मिळेल. चहलला संधी द्यायची झाल्यास एक वेगवान गोलंदाज कमी करायचा की एक फलंदाज कमी करायचा हा दुसरा प्रश्न भारतासमोर उभा राहील. फलंदाजीतील सातत्याचा अभाव लक्षात घेता फलंदाजाला कमी केले जाणार नाही. हार्दिक पंड्या पूर्ण चार षटके गोलंदाजी करू शकत असल्यामुळे एका वेगवान गोलंदाजाला कमी केले जाऊ शकते. यानंतर एक छोटा प्रश्न म्हणजे यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला पसंती द्यायची की ऋषभ पंतला. या आघाडीवरचा कुठलाही निर्णय झाला तरी तो धाडसी ठरेल.

खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे आव्हान किती?

हा प्रश्न किमान भारतासाठी महत्त्वाचा ठरत नाही. रोहित शर्मा सरावादरम्यान जायबंदी झाला असला, तरी त्याची दुखापत गंभीर नाही. रोहितने अल्पशा विश्रांतीनंतर सरावदेखील केला. अन्य खेळाडू तंदुरुस्त आहेत. तंदुरुस्तीचा खरा प्रश्न इंग्लंडला भेडसावेल. डेव्हिड मलान यापूर्वीच उपांत्य फेरीत खेळू शकणार नाही हे स्पष्ट होते. आता वेगवान गोलंदाज मार्क वूडही जायबंदी झाल्याचे वृत्त आहे. महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन प्रमुख खेळाडू जायबंदी झाल्यामुळे इंग्लंड संघावर निश्चितपणे दडपण आले असेल. त्यामुळे उपांत्य फेरीत मैदानावर उतरताना इंग्लंड संघ कमीअधिक प्रमाणात मानसिकतेच्या दडपणाखाली राहील. याचा फायदा भारतीय संघास निश्चित होईल.