-अन्वय सावंत
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वीच भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलियातील अधिक उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीला अनुकूल मानल्या जातात. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात चार वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आले, पण यात अनुभवी मोहम्मद शमीचा समावेश नव्हता. शमीची केवळ राखीव खेळाडूंमध्ये निवड झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. एकीकडे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमरासह भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज असणाऱ्या शमीकडे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मात्र दुर्लक्ष केले जाण्यामागे कोणती कारणे असू शकतात, याचा घेतलेला आढावा.
शमीने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कशी कामगिरी केली आहे?
शमीची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्याने ६० कसोटी सामन्यांत २१६ बळी आणि ८२ सामन्यांत १५२ बळी मिळवत भारतीय संघातील आपले महत्त्व वारंवार सिद्ध केले आहे. मात्र, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याला तितकीशी छाप पाडता आलेली नाही. शमीने २०१४ साली आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एकीकडे ट्वेन्टी-२० सामन्यांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे शमी पदार्पणानंतरच्या आठ वर्षांत केवळ १७ ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे. या सामन्यांत केवळ १८ बळी त्याच्या नावावरून असून त्याने ९.५४च्या (एका षटकामागे इतक्या धावा) धावगतीने धावा दिल्या आहेत. त्यामुळे त्याला भारताच्या ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी कायम झगडावे लागले आहे.
गेल्या काही ‘आयपीएल’ हंगामांमधील कामगिरी कशी आहे?
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये शमीने आतापर्यंत कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स), किंग्ज ईलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) आणि गुजरात टायटन्स या चार संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचा समावेश असलेल्या गुजरातच्या संघाने गेल्या हंगामात ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले. शमीने १६ सामन्यांत २० गडी बाद करताना या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. शमीला सुरुवातीच्या ३५ ‘आयपीएल’ सामन्यांत केवळ २१ बळी मिळवता आले होते. त्यानंतर मात्र त्याने कामगिरी उंचावताना गेल्या चार हंगामांतील ५८ सामन्यांत ७८ बळी मिळवले आहेत. यावरून शमीने गोलंदाज म्हणून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये केलेली प्रगती अधोरेखित होते.
युवा गोलंदाजांमुळे शमीकडे दुर्लक्ष होते का?
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये शमी हा जसप्रीत बुमरासह भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मानला जातो. त्यामुळे तो तंदुरुस्त राहावा यासाठी त्याला अधूनमधून विश्रांती दिली जाते. काही वर्षांपूर्वी शमीच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यामुळे तो जायबंदी होऊ नये यासाठी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीकडून अधिक काळजी घेतली जाते. त्यातच ‘आयपीएल’मुळे अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांसारखे युवा वेगवान गोलंदाज भारताला मिळाले आहेत. ३१ वर्षीय हर्षल पटेलनेही ‘आयपीएल’मध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळावी यासाठी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बरेचदा अनुभवी वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली जाते. ३२ वर्षीय शमीची ट्वेन्टी-२० संघात सातत्याने निवड न होण्यामागे हेसुद्धा एक कारण आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकात शमीची उणीव भासेल का?
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताने बुमरा, भुवनेश्वर, हर्षल आणि अर्शदीप या वेगवान चौकडीची संघात निवड केली आहे. याशिवाय हार्दिक पंड्यासुद्धा आहे. मात्र, बुमरा वगळता सातत्याने ताशी १४० किमीहून अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची त्यांच्यात क्षमता नाही. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर ‘कुकाबुरा’चा चेंडू अधिक उसळी घेत असल्याने ‘सीम’चा चांगला वापर करणाऱ्या शमीविरुद्ध खेळणे प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाजांना अवघड गेले असते. शमीने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या आठ कसोटी सामन्यांत ३१ बळी मिळवले आहेत. शमीला नवा चेंडू वापरण्याची आणि वेगवान मारा करण्याची संधी लाभली असती. त्यामुळे विश्वचषकात भारताला शमीची उणीव नक्कीच भासू शकेल.