-ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने १९८३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावले, तेव्हा भारतीय संघाकडेही दुबळे म्हणून बघितले जात होते. त्यानंतर भारतीय क्रिकेटने प्रगती केली. पण, २००७ मध्ये भारताने पहिल्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली, तेव्हा देखील युवा भारतीय संघ काहीसा दुबळा मानला जात होता. याला महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत साखळीतच गारद झाला होता. त्यानंतरही क्रिकेटच्या पहिल्या पायरीवर असणाऱ्या संघांनी काही धक्कादायक निकाल नोंदवले. पण, या वेळी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत या तथाकथित दुबळ्या संघांनी खूप प्रभाव पाडला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या संघांची चर्चा इतकी कधीच झाली नव्हती. या संघांच्या यशामागील कारणांचा हा मागोवा…

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या संघांनी कसे लक्ष वेधले?

आधी पात्रता फेरी, नंतर प्राथमिक फेरी आणि त्यातून अव्वल १२ गटांची फेरी अशा टप्प्यातून यंदाची विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झालेला दुबळ्या संघांच्या सनसनाटी निकालांची मालिका साखळी गटाच्या अखेरच्या सामन्यापर्यंत कायम होती. या संघांचा प्रभाव इतका जबरदस्त होता, की  अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित नव्हते. गट २ मध्ये तर हा जिंकला, तर तो…तो जिंकला, तर तो, तो संघ हरला… तर हा असे समीकरण राहिले होते. अखेरीस दुबळ्या संघानेच हे उत्तर सोडवले. नेदरलँड्स संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि भारताच्या उपांत्य फेरी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. गट १ मध्ये केवळ आयर्लंड हा एकच संघ दुबळा होता. तुलनेने गट २ मध्ये नेदरलँडस, झिम्बाब्वे असे दोन संघ होते. या दुबळ्या संघांच्या कामगिरीमुळे आघाडीच्या संघांना आपल्या पुढील प्रवासासाठी वाट बघावी लागली हेच या संघांचे यश म्हणता येईल.

सनसनाटी विजय कोणते ठरले?

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी (१६ ऑक्टोबर) नामिबियाने आशिया चषक विजेत्या श्रीलंका संघावर ५५ धावांनी विजय मिळविला. या विजयाने स्पर्धेची प्राथमिक फेरी चांगली रोमांचक झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (१७ ऑक्टोबर) स्कॉटलंडने दोन वेळच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा विजेत्या वेस्ट इंडिजचा ४२ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर वेस्ट इंडिज संघ कायम बॅकफूटवर राहिला. पाठोपाठ आयर्लंडने (२१ ऑक्टोबर) वेस्ट इंडिजला ९ गडी राखून हरवले. आयर्लंड, नेदरलँड्स, झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे संघ प्राथमिक फेरीतून अव्वल १२च्या गटात आले. तेथे आयर्लंडने (२६ ऑक्टोबर) आपल्या शेजारी इंग्लंडचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे ५ धावांनी पराभव केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ ऑक्टोबरला झिम्बाब्वेने पाकिस्तानच्या तोंडचा घास काढून घेतला. अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेने एक धावेने विजय मिळविला. त्यानंतर २ नोव्हेंबरला नेदरलँडस-झिम्बाब्वे या सामन्यात नेदरलँडसने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. साखळी सामन्याच्या अगदी अखेरच्या दिवशी नेदरलँडसने दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला.

या संघांच्या प्रभावामागे नेमके कारण काय?

कसोटी आणि अगदी मर्यादित ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यांपेक्षा ट्वेन्टी-२० क्रिकेटचे चांगलेच पेव फुटले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातही ट्वेंन्टी-२० क्रिकेट खेळले जात आहे. अगदी क्रिकेटची बाराखडी शिकणाऱ्या अमेरिकेलाही या लघुतम क्रिकेटच्या प्रारूपाची भुरळ पडली. अशा रीतीने जगभरात होणाऱ्या लीग क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू खेळत असतात. त्यामुळे खेळाडूंना खेळण्याची मोठी संधी मिळते. सामन्यांमधून येणाऱ्या विविध दडपणांचा सामना करण्याचा त्यांना सराव मिळतो. त्यामुळे हे खेळाडू अनेकदा आघाडीच्या खेळाडूंचा सामना करत असतात. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्यांचा हा अनुभव सांघिक यशात परिवर्तित होतो आणि त्याचे परिणाम या स्पर्धेत दिसून आले.

ऑस्ट्रेलियातील खेळण्यायोग्य परिस्थितीचा या संघांच्या यशात किती वाटा?

ऑस्ट्रेलियातील क्रिकेटचा हंगाम तसा अन्य देशांपेक्षा उशिराने सुरू होतो. त्याचा परिणाम खेळपट्ट्यांवर होतो. खेळपट्ट्या अधिक काळ जिंवत राहतात. साहजिकच गोलंदाजांना जरा अधिकच संधी मिळते. त्याचा फायदा अशा दुबळ्या संघांना होतो. कारण, या दुबळ्या संघांची बहुतेक ताकद ही त्यांच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात असते. फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांचा त्यांच्या विजयात प्रमुख वाटा असतो, हे यावेळीदेखील सिद्ध झाले आहे. एकूणच ऑस्ट्रेलियात स्पर्धा झाल्यामुळे क्रिकेटच्या पहिल्या पायरीवर असणाऱ्या या संघांना विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत टिकून राहण्याचा आत्मविश्वास मिळाला.

पावसाची साथ मिळाली का?

खरे तर अलिकडच्या काळात क्रिकेट स्पर्धा आणि पाऊस म्हटला की दोन्ही संघांतील खेळाडूंच्या अंगावर काटा उभा राहतो. याचे मुख्य कारण म्हणजे पावसानंतर निर्णयासाठी वापरात येणारी डकवर्थ-लुईस नियम पद्धती. या नियमाने सामन्यातील आव्हानाचेच हाल होतात. पण, पावसामुळे सामना रद्द होणे किंवा कमी षटकांचा खेळविण्यात येणे याचा फायदा या दुबळ्या संघांना अधिक होतो. या स्पर्धेतील इंग्लंडविरुद्ध आयर्लंड हा सामना याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 is this the wc of minnows print exp scsg