-संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी विजेता पाकिस्तानचा संघही यंदा होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. हा संघ धोकादायक म्हणून गणला जातो. पाकिस्तानच्या संघाने २००९ मध्ये झालेल्या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र, पाकिस्तानला पुन्हा जेतेपद मिळवता आलेले नाही. तरी यंदा गेल्या काही दिवसांतील कामगिरी पाहता, या संघाशी टक्कर घेणे सोपे नाही. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या स्पर्धेच्या गेल्या सत्रात भारताला पराभूत करीत संघ पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यामुळे यावेळी पाकिस्तान संघाचा प्रयत्न १३ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी असेल. त्यांच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा…

रिझवान आणि बाबर यांच्यावर पाकिस्तानची फलंदाजी अधिक अवलंबून का?

मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांची लय पाहता पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असल्याचे दिसून येते. रिझवान (८५३ गुण) आणि बाबर (८०८ गुण) ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांपैकी एका खेळाडूने मोठी खेळी केल्यास संघाचा विजय निश्चित समजला जात आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानसाठी निर्णायक ठरू शकतील. त्यामुळे संघाला पराभूत करायचे झाल्यास प्रतिस्पर्धी संघांना त्यांना लवकर बाद करणे गरजेचे आहे.

मध्यक्रमाच्या अपयशावर संघ तोडगा कसा काढणार?

रिझवान आणि आझम वगळल्यास इतर फलंदाजांना पाकिस्तानकडून फारशी चुणूक दाखवता आलेली नाही. हा संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. हे दोन्ही खेळाडू लवकर माघारी परतल्यास इतर फलंदाजांना संघाचा डाव सावरताना चांगली कसरत होते, त्यामुळे या बाबीवर संघाने विचार करणे गरजेचे आहे. आसिफ अली, शान मसूद आणि हैदर अलीसारखे फलंदाज असून मध्यक्रमात त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या पाहता त्यांनी संयमाने खेळणे गरजेचे असेल. संघ व्यवस्थापनही त्यांच्या कामगिरीवर नक्कीच लक्ष ठेवून असेल.

जलदगती गोलंदाजांनी पुढाकार घेणे का गरजेचे आहे?

पाकिस्तानकडे नेहमीच चांगले जलदगती गोलंदाज समोर येत असतात. यंदाही संघाकडे चांगल्या गोलंदाजांचा भरणा आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पूरक अशा खेळपट्ट्यांवर शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वसिम, हारिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद हसनैनसारख्या मजबूत गोलंदाजी माऱ्यासमोर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धावा करण्याचे मोठे आव्हान असेल. आफ्रिदीच्या खांद्यावर संघाच्या गोलंदाजीची मदार असेल. त्याला युवा नसीमचीही साथ मिळेल. त्यामुळे संघाचे फलंदाज अपयशी ठरल्यास जलदगती गोलंदाजांना पुढाकार घ्यावा लागेल. गेल्या काही काळात गोलंदाजांना दुखापतीचा फटका बसला आहे. तारांकित जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला संघात स्थान देण्यात आले असले, तरीही त्याच्या तंदुरुस्तीबाबत संघ व्यवस्थापन चिंतेत असल्याचे चित्र आहे. आफ्रिदी तंदुरुस्त नसल्यास त्याचा पर्यायही संघाला तयार ठेवावा लागू शकतो.

अष्टपैलू खेळाडू पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचे?

पाकिस्तानकडे अनुभवी शादाब खान, इफ्तिकार अहमद आणि मोहम्मद नवाझ यांसारखे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. हे खेळाडू मोठे फटके मारण्यासह निर्णायक क्षणी संघाला गडी बाद करून देण्यातही सक्षम आहेत. पण त्यांच्या कामगिरीत पुरेसे सातत्य नाही. बाबर आणि रिझवान अपयशी ठरल्यास संघाला कठीण परिस्थितीतून सावरण्याची मोठी जबाबदारीही या खेळाडूंवर असणार आहे.

पाकिस्तान संघ :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसिम, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर.