-संदीप कदम

गतविजेत्या आणि यजमान ऑस्ट्रेलियाला यंदाही ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आणि विश्वचषक यांचे खास नाते आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी बरीच वर्षे वाट पाहावी लागली. ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सहा पर्वांमध्ये केवळ एकदा अंतिम फेरी गाठता आली होती. मात्र, गतवर्षी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दमदार कामगिरी करताना जेतेपदाचा दुष्काळ संपवला. आता घरच्या मैदानांवर आणि आपल्या चाहत्यांसमोर खेळताना ऑस्ट्रेलियन संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याकडेच राखण्यास उत्सुक असेल.

आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नरवर अधिक भिस्त का?

ऑस्ट्रेलियाकडे आपल्या घरच्या मैदानांवर खेळताना सलामीवीर कर्णधार आरोन फिंच आणि स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांवर संघाला चांगली सुरुवात  देण्याची मोठी जबाबदारी असेल. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करून धावा करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे. मात्र, आरोन फिंचला गेल्या काही काळात लय कायम राखता आलेली नाही. काही खेळी वगळता त्याने निराशाच केली आहे. त्यामुळे कर्णधाराला पहिल्याच सामन्यापासून लय मिळवणे संघासाठी महत्त्वाचे असेल. वॉर्नर कांगारूंसाठी अनेकदा निर्णायक ठरला आहे. गेल्या काही डावांमध्ये त्याने आपल्या खेळींच्या बळावर संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना वॉर्नरच्या आक्रमक फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष राहील. अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथची लय ही संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला अलीकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही, तसेच ऑस्ट्रेलियन संघात आता टीम डेव्हिडचाही समावेश झाल्याने स्मिथला अंतिम एकादशमध्ये संधी मिळेल का हे पाहावे लागेल.

अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी का निर्णायक ठरू शकते?

ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, मिचेल मार्श आणि टीम डेव्हिड हे फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये योगदान देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे कांगारूंना विजय मिळवायचा झाल्यास या खेळाडूंना चमकदार कामगिरी करावी लागेल. ऑस्ट्रेलियन परिस्थितीचा अंदाज या खेळाडूंना असल्याने ते अधिक घातकही ठरण्याची शक्यता आहे. सर्वांच्या नजरा असतील त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने लक्ष वेधणाऱ्या युवा टीम डेव्हिडकडे. स्फोटक फलंदाजी, लांब पल्ल्याचे षटकार मारण्याची ताकद आणि मोक्याच्या क्षणी संघाला बळी मिळवून देण्याच्या क्षमतेने तो विश्वचषकात निर्णायक ठरू शकतो. स्टोयनिस, मार्श यांसारख्या खेळाडूंनी दुखापतींमुळे गेल्या काही काळात फारसे सामने खेळलेले नाहीत. गेल्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या अष्टपैलू कामगिरीने संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या मार्शकडून यंदाही कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल. स्टोइनिसही मोठे फटके मारण्यास सक्षम असून अधिक काळ मैदानावर व्यतीत केल्यास तो प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. मॅक्सवेलला गेल्या काही काळात समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर त्याला अपयश आले, मात्र व्यवस्थापनाने त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन संघात स्थान दिले आहे. तो लयीत नसला तरीही, प्रतिस्पर्धी संघ त्याला कमी लेखण्याची चूक करणार नाही. अखेरच्या क्षणी कॅमेरून ग्रीनचा समावेश संघात करण्यात आल्याने संघाकडे आणखी पर्याय उपलब्ध झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ जलदगती गोलंदाजांवर निर्भर का ?

ऑस्ट्रेलियातील अधिक उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर नेहमीच जलदगती गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळेच सुरुवातीच्या षटकांमध्ये संघाला लवकर बळी मिळवून देण्याची जबाबदारी ही आपसूक वेगवान गोलंदाजांकडे येते. त्यातच जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा मारा हा ऑस्ट्रेलियाकडे आहे. ही एक गोष्ट कांगारूंना इतर संघांपेक्षा वेगळे करते. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन या वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा करणे हे प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाजांना नेहमीच आव्हानात्मक असते. या गोलंदाजांकडे गती, स्विंग आणि चेंडूचा अचूक टप्पा ठेवण्याचे कसब असल्याने ते अधिकच घातक ठरू शकतात. त्यातच जेतेपद कायम राखण्याची भिस्तही या प्रमुख गोलंदाजांवर असेल. स्टार्कला दुखापतीमुळे गेल्या काही काळात फारसे सामने खेळण्यास न मिळाल्याने तरीही तो अधिक प्रतिस्पर्धी फलंदाजांना घातक ठरू शकतो.

फिरकी गोलंदाजांना कमी संधी?

ऑस्ट्रेलियन संघात लेग-स्पिनर ॲडम झॅम्पा आणि ॲश्टन ॲगरच्या रूपात उत्तम फिरकीपटूही आहेत. सामन्यामधील षटकांमध्ये गडी बाद करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. मात्र, संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा पाहता दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. यासह त्यांना मॅक्सवेल, डेव्हिड यांचीही साथ मिळेल. संघ व्यवस्थापनाकडे फिरकीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने कोणाला अंतिम एकादशमध्ये संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

संघ : आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन, ॲश्टन एगर, ॲडम झॅम्पा.