-संदीप कदम

इंग्लंडने २०१०मध्ये वेस्ट इंडिज येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. हे त्यांचे पहिले जागतिक जेतेपद ठरले होते. त्यातच २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकातील अपयशानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१९ मध्ये मायदेशात झालेला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदासाठीही इंग्लंडला प्रबळ दावेदार मानले जाते आहे. त्यांना जेतेपद मिळवण्याची कितपत संधी आहे याचा हा आढावा…

बटलर, हेल्स का निर्णायक ठरू शकतात?

कर्णधार जॉस बटलर, ॲलेक्स हेल्स आणि डेव्हिड मलान या आघाडीच्या फळीवर संघाला भक्कम सुरुवात देण्याची जबाबदारी असेल. विशेषत: बटलर आणि हेल्स मोठे फटके मारण्यात सक्षम असून चांगल्या धावगतीने धावा करण्याची कसब त्यांच्याकडे आहे. त्यांना एकदा लय सापडली, तर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर ते दडपण टाकतील. युवा फलंदाज हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत आपल्यातील प्रतिभा सिद्ध केली. त्याला मालिकावीराच्या पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. मलाननेही या मालिकेत काही उत्तम खेळी केल्या. त्यामुळे इंग्लंडला बाद फेरीपर्यंत मजल मारायची झाल्यास या फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. बटलरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेच्या तीनपैकी दोन सामन्यांत अर्धशतके केली. त्यामुळे त्याला सूर गवसला आहे.

इंग्लंड अष्टपैलू खेळाडूंवर अधिक अवलंबून का?

इंग्लंडच्या संघात नेहमीच चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा समावेश राहिलेला आहे आणि या खेळाडूंनी संघाच्या विजयात नेहमीच आपले योगदान दिलेले आहे. इंग्लंडला २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा बेन स्टोक्स, तसेच लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांसारखे अष्टपैलू खेळाडू इंग्लंडकडे आहेत. हे सर्व खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये आपली छाप पाडण्यास सक्षम आहे. त्यामुळे संघाच्या विजयात त्यांची कामगिरी ही निर्णायक ठरू शकेल. त्यातच ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर स्टोक्स आणि वोक्स आपल्या गोलंदाजीनेही चुणूक दाखवू शकतात. ट्वेन्टी-२० विशेषज्ञ म्हणून ओळख असलेला ख्रिस जॉर्डनही दडपणात संघाला विजय मिळवून देण्यास सक्षम आहे.

रीस टॉपली, मार्क वूड यांच्याकडून गोलंदाजीत अपेक्षा का?

ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच जलदगती गोलंदाजांना मदत मिळते. तसेच, विश्वचषकातील बरेचसे सामने दिवस-रात्र खेळवण्यात येणार असल्याने गोलंदाजांना पूरक परिस्थिती असेल. त्यामुळे मार्क वूड आणि रीस टॉपली यांच्यावर इंग्लंडच्या गोलंदाजीची मदार असेल. त्यांना करन, वोक्स यांचीही साथ मिळेल. पण सुरुवातीच्या षटकांमध्ये गडी बाद करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने वूड व टॉपली यांच्यावर असणार आहे. चार जलदगती गोलंदाजांना संघात स्थान मिळाल्यास संघ व्यवस्थापनासमोर मोईन अली किंवा आदिल रशीद यांपैकी एकाला संघाबाहेर ठेवण्याचा पेच निर्माण होईल. मात्र, सुरुवातीला ते तीनच वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे.

दुखापतींपासून दूर राहण्याचे इंग्लंडसमोर कसे आव्हान असेल?

गेल्या काही काळात इंग्लंडच्या खेळाडूंना दुखापतींनी सतावले आहे. जॉनी बेअरस्टो आणि जोफ्रा आर्चर यांसारखे तारांकित खेळाडू दुखापतींमुळे यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार आहेत. तसेच लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस वोक्स यांनीही दुखापतींमुळेच अलीकडच्या काळात फारसे सामने खेळलेले नाहीत. तसेच, पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत दुखापतीतून बटलरला अनेक सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळे इंग्लंडला जेतेपद मिळवण्याचे आपले स्वप्न साकार करायचे झाल्यास संघ व्यवस्थापनाला खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर तितकेच लक्ष द्यावे लागणार आहे.

इंग्लंडचा संघ :

जॉस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), ॲलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, रीस टॉपली, मार्क वूड.