-अन्वय सावंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये वर्षानुवर्षे तणावाचे वातावरण आहे. या राजकीय तणावाचे पडसाद खेळांमध्येही उमटतात. विशेषतः भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध आले की, केवळ या दोन देशांतील नागरिकांचे नाही, तर संपूर्ण क्रिकेट जगताचे या सामन्याकडे लक्ष असते. आता हे दोन संघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातही आमनेसामने येणार असून या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

भारत-पाकिस्तान सामना कधी व कुठे खेळवला जाणार आहे?

ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (२३ ऑक्टोबर) एक लाख आसनसंख्या असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळवला जाणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे अवघ्या पाच मिनिटांत विकली गेल्याची माहिती आहे. थेट ‘अव्वल १२’ फेरीत प्रवेश मिळालेल्या भारत आणि पाकिस्तानचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिलाच सामना असेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सलामीसाठी उत्सुक असतील. त्यातच भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या, तर पाकिस्तानच्या संघात बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांसारखे तारांकित खेळाडू असल्याने त्यांच्यातील द्वंद्व पाहण्यासारखे असेल.

दोन संघांमधील इतिहास काय सांगतो?

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आतापर्यंत ११ ट्वेन्टी-२० सामने झाले असून यापैकी आठ सामन्यांत भारतीय संघाने विजय नोंदवला आहे. उर्वरित तीन सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषकांमध्ये या संघांत झालेल्या सहापैकी चार सामन्यांत भारतीय संघाने बाजी मारली, तर एका सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयी ठरला. तसेच २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान साखळी सामना निर्धारित षटकांअंती बरोबरीत राहिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बोल-आउटमध्ये भारताने सरशी साधली होती. तसेच पाकिस्तानला नमवूनच भारताने २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपदही मिळवले होते. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात मात्र पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून मात केली होती. कोणत्याही (एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२०) विश्वचषकात पाकिस्तानकडून पराभूत होण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्याचा आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

भारत-पाकिस्तान सामन्यांना इतके महत्त्व का?

१९४७ साली झालेली फाळणी, युद्ध, काश्मीरचा मुद्दा आणि दहशतवाद अशा विविध कारणांमुळे भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये राजकीय तणाव आहे. याचा परिणाम खेळांवरही झाला आहे. या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची दोन्ही देशांतील क्रीडारसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. परंतु अलीकडच्या काळात हे दोन्ही संघ केवळ ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. २६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध आणखीच बिघडले. २००९मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकन संघाच्या बसवर लाहोर येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये दशकभराच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले नाहीत. २०१२मध्ये पाकिस्तानच्या संघाने भारताचा दौरा केला. उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने झाले. ही या दोन संघांमधील अखेरची द्विदेशीय मालिका ठरली. त्यानंतर विविध कारणांस्तव भारत-पाकिस्तान मतभेद वाढत गेले. परिणामी दोन संघांंमधील सामन्यांची संख्याही कमी झाली. त्यामुळे आता ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आल्यावर या सामन्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते.

आर्थिक गणिते काय?

भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले की हा केवळ एक सामना नसतो. त्यामागे बरीच आर्थिक गणितेही असतात. एकीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे विश्वातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. भारत-पाकिस्तान सामन्यांचा या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांना आर्थिक फायदा होतोच, शिवाय ‘आयसीसी’ला महसुलासाठी हा सामना विशेष महत्त्वाचा ठरतो. तसेच संयोजक आणि जाहिरातदारही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. ऐन दिवाळीत, त्यातच रविवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढल्याची माहिती आहे. गेल्या दशकापासून अक्षरशः कोट्यवधी प्रेक्षक विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे हे सामने पाहात असतात. या आकडेवारीची तुलना विश्वचषक फुटबॉल किंवा ऑलिम्पिक उद्घाटन-समारोप प्रेक्षकसंख्येशीच होऊ शकते. इतर कोणत्याही खेळांमध्ये दोन देशांतील सामन्यांसाठी इतका प्रेक्षकवर्ग जगभर लाभण्याचे दुसरे उदाहरण नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 why india vs pakistan always becomes talking point does it have political conflict angle what are financial aspect of match print exp scsg