ज्ञानेश भुरे
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेग आणि उसळी असलेल्या खेळपट्टी, खेळपट्टीवर कमी-अधिक प्रमाणावर असलेले गवत, पोषक हवामान अशा वेगवान गोलंदाजीस साथ देणाऱ्या वातावरणात वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व राखले नसते, तर नवल होते. एकूणच वेगवान गोलंदाज सरस ठरत असल्याचे दिसत असून, फलंदाज अपयशी ठरत आहेत. यातही नव्या चेंडूचा सामना करणारे सलामीचे फलंदाज सर्वाधिक अपयशी ठरले आहेत. स्पर्धेत आतापर्यंत दिसून आलेल्या या परिस्थितीचा घेतलेला आढावा….
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेगवान गोलंदाजांचा राहतोय का वरचष्मा?
ट्वेन्टी-२० क्रिकेट हे कितीही फलंदाजी धार्जिणे माने जात असले, तरी अनेकदा गोलंदाजांच्या कौशल्याने या अंदाजास तडा गेल्याचे दिसून आले आहे. सध्या सुरू असलेली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा याचे उत्तम उदाहरण मानता येईल. स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार तेव्हाच वेगवान गोलंदाज काही प्रमाणात वर्चस्व राखणार याची शक्यता होतीच. कुठल्याही प्रकारच्या गोलंदाजांवर हल्ला चढविण्याची क्षमता असणारे फलंदाज असल्यामुळे हे वर्चस्व इतक्या मोठ्या प्रमाणावर राहील असे वाटले नव्हते. ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजीस पोषक असणारे वातावरण सर्वात निर्णायक ठरत आहे. येथे असणाऱ्या खेळपट्ट्या वेगवान आहेत. त्यावर उसळी मिळत आहे. बहुतेक सर्वच केंद्रांवर चेंडू चांगला स्विंग आणि सीम होत आहे. त्यामुळे या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वात कमी धावगती बघायला मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या ३१ सामन्यांनंतर प्रत्येक विकेटसाठी धावांची सरासरी २०.४० इतकी राहिली असून, प्रति षटकांनुसार ७.३० धावगती मिळाली आहे. आजवरच्या आठ स्पर्धांमध्ये ही आतापर्यंतची नीचांकी सरासरी व धावगती ठरते.
वेगवान गोलंदाजांचा वरचष्मा कसा राहिला?
वेगवान गोलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर बहुतेक संघांतील वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व राखले आहे. अर्थात, फिरकी गोलंदाजांनीदेखील आपला करिष्मा दाखवला आहे. आतापर्यंत फिरकी गोलंदाजीच्या यशाची सरासरी २०.९२ इतकी राहिली असून, ६.८७ असा आजपर्यंत सर्वांत कमी इकॉनॉमी रेट राहिला आहे. पण, वेगवान गोलंदाज या स्पर्धेत खरे नायक ठरत आहेत. त्यांनी प्रति षटकामागे ७.१६ धावा देताना २१.४६ची सरासरी राखली आहे. वेगवान गेलंदाजांनी प्रत्येक १७.८ चेंडूंनंतर विकेट मिळविली आहे. वेगवान गोलंदाजांची आजपर्यंतच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज (२०१०) स्पर्धेत वेगवान गोलंदाजांनी ७.२३ अशी धावगती राखली होती. त्यानंतर याच स्पर्धेत सर्वात कमी धावगती वेगवान गोलंदाजांनी राखलेली बघायला मिळत आहे. वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत स्पर्धेत ६५ टक्के गोलंदाजी केली असून, त्यांनी बाद केलेल्या गड्यांची सरासरी ६८ टक्के आहे. पहिल्या २००७ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हीच टक्केवारी ७४.२ आणि ७५.७ टक्के इतकी होती. त्यानंतर प्रथमच वेगवान गोलंदाजांचे पूर्ण वर्चस्व राखलेले पहायला मिळते.
विश्लेषण: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा का बनल्या धूसर?
पॉवर-प्ले फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरतोय का?
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पहिली सहा षटके महत्त्वाची असतात. यात क्षेत्ररक्षण प्रतिबंधित क्षेत्राच्या आत राहिल्यामुळे फलंदाजांना फटकेबाजीचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते. पण, ही स्पर्धा याला अपवाद ठरताना दिसत आहे. फलंदाजांना येत असलेले अपयश हे सर्वाधिक पॉवर प्लेमधील आहे. या वेळी पॉवर प्लेच्या षटकांत प्रत्येक विकेटमागे २०.२३ धावा निघाल्या असून, गेल्या पाच स्पर्धेतील ही सर्वात नीचांकी सरासरी आहे. त्याचबरोर धावा करण्याची ६.६४ ही सरासरी देखील सर्वात खराब मानली जाते. गेल्या स्पर्धेत ही सरासरी ६.७२ टक्के राहिली होती. या महत्त्वाच्या टप्प्यात सहा संघांनी प्रतिविकेट १७ पेक्षा कमी धावा दिल्या आहेत. केवळ तीन संघांनी ४० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. न्यूझीलंडची या षटकातील गोलंदाजी सरासरी ८.७१ ही सर्वोत्तम राहिली आहे, तर इंग्लंडने सर्वाधिक ४७ धावा दिल्या आहेत.
सलामीचे फलंदाज ठरले सर्वांत अपयशी?
आव्हानाचा पाठलाग करताना किंवा आव्हान उभे करताना सलामीच्या फलंदाजांनी भक्कम पाया रचणे अपेक्षित असते. पण, या स्पर्धेत याचाच अभाव दिसून आला आहे. बहुतेक सर्व संघांना त्यांच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिलेली नाही. ऑस्ट्रेलियाची जोडी डेव्हिड वॉर्नर-ॲरोन फिंच, भारताचे रोहित शर्मा-के.एल. राहुल, इंग्लंडचे जॉस बटलर-ॲलेक्स हेल्स, पाकिस्तानचे बाबर आझम-महंमद रिझवान, न्यूझीलंडचे ॲलन फिन-डेव्हॉन कॉनवे अशी सलामीला अपयशी ठरलेल्या सलामीच्या जोड्यांची नावे देता येतील. यातही न्यूझीलंडच्या जोडीने एका सामन्यात सर्वोत्तम सुरुवात दिली आहे. स्पर्धेत आजपर्यंत झालेल्या ११२ डावांत केवळ १६ अर्धशतकी खेळी सलामीच्या फलंदाजांकडून झाल्या आहेत. त्याच वेळी एकेरीत धावसंख्येवर बाद होणाऱ्या फलंदाजांची संख्या अधिक आहे. स्पर्धेत आतापर्यंत सलामीच्या फलंदाजांना संघाच्या धावसंख्येत केवळ ३१.९ टक्केच वाटा उचलता आला आहे.
आव्हान देणाऱ्या संघांचे विजय अधिक…
प्रकाशझोत आणि दव यामुळे आव्हानाचा बचाव करताना गोलंदाजांना नेहमीच अडचणी आल्या आहेत. सहाजिकच आव्हानाचा पाठलाग करताना संघांनी सर्वाधिक विजय मिळविले आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे गेल्यावर्षी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना केवळ १९ विजयांची, तर २९ पराभवांची नोंद आहे. या वेळी साखळी सामनेच सुरू असताना हा आकडा १६-११ असा आहे. इंग्लंडमध्ये २००९ च्या स्पर्धेत १६ विजय, ११ पराभव ही आकडेवारी होती. पण, ती संपूर्ण स्पर्धेची होती. ऑस्ट्रेलियात अजून साखळी फेरीच सुरू आहे.
विश्लेषण : ‘झुलता पूल’ म्हणजे काय? मोरबी दुर्घटनेत नेमकी काय चूक झाली?
क्षेत्ररक्षकांचेही अपयश ढळढळीत?
कॅचेस विन मॅचेस असे क्रिकेटमध्ये बोलले जाते. मात्र, या स्पर्धेत असे दिसत नाही. कारण, झेल सोडूनही अनेक संघांनी विजय मिळविले आहेत. आतापर्यंत स्पर्धेत ६२ झेल सोडले गेले आहेत आणि २४५ झेल घेतले आहेत. म्हणजेच झेल सोडण्याचे प्रमाण ३.९५ टक्के इतके राहिले आहे. गेल्या संपूर्ण स्पर्धेत ३१६ झेल घेतले गेले आणि केवळ ४९ झेल सोडले गेले होते. या स्पर्धेत आयर्लंडने सर्वाधिक १२ झेल सोडले आहेत. नामिबियाने एकही झेल सोडलेला नाही. त्यांनी सोळा झेल घेतले आहेत. न्यूझीलंडने केवळ १ झेल सोडला असून, १३ झेल घेतले आहेत. भारताने १५ झेल घेतले असून, ४ झेल सोडले आहेत.