इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यान आज होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी मेलबर्न शहरावरील आकाश निरभ्र असलं तरी या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १०० टक्के या सामन्यादरम्यान पाऊस पडेल असं येथील स्थानिक हवामान खात्याने सांगितलं आहे. ला निना प्रभावामुळे सध्या मेलबर्नसहीत ऑस्ट्रेलियातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे.
पावसामुळे सामना उशीरा सुरु होईल किंवा त्यात व्यत्यय येईल असं सांगितलं जात आहे. तसेच सोमवारच्या राखीव दिवशीही पावसाची शक्यता आहे. दोन्ही दिवसांचा विचार केला तर पावसाची शक्यता ९५ टक्क्यांपर्यंत आहे. पावसामुळे खरोखरच हा सामना वाहून गेला तर काय? राखीव दिवशी सामना खेळवण्याचे नियम काय? राखीव दिवशीही पाऊस पडला तर काय याबद्दलच्या प्रश्नांची उत्तर जाऊन घेऊयात…
राखीव दिवस म्हणजे काय?
राखीव दिवस म्हणजे एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेचा निकाली सामना खेळवण्यासाठी ठेवण्यात आलेला अतिरिक्त दिवस. खास करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून नियमितपणे राखीव दिवसाची तरतूद करण्यात आलेली असते. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक असो किंवा टी-२० विश्वचषक असतो अंतिम सामना नियोजित दिवशी झाला नाही तर त्याच्या पुढला दिवस हा अतिरिक्त नियोजनामध्ये राखीव म्हणून ग्राह्य धरुन नियोजन केलं जातं. उपांत्य फेरीतील सामन्यांसाठीही अनेकदा राखीव दिवसाची तरतूद असते. सामना नियमांच्या आधारे थेट जेतेपद वाटून देत रद्द करावा लागू नये जास्तीत जास्त निकाल हा मैदानावरील खेळाच्या आधारे लावता यावा या विचाराने राखीव दिवसाची तरतूद करण्यात आलेली असते.
आज पाऊस पडला तर काय?
सामना सुरु होण्याच्या काही तास आधी तरी मेलबर्नमधील आकाश निरभ्र असलं तरी या शहरातील वातावरण कधीही बदलू शकतं असं आहे. स्थानिक हवामान खात्याने या सामन्यादरम्यान १०० टक्के पाऊस पडणार असं म्हटलं आहे. पाऊस आला आणि तो थांबलाच नाही तर खेळ राखीव दिवशी खेळवला जाईल. सामान्यपणे टी-२० सामन्याचा निकाल लावण्यासाठी प्रत्येक संघाने किमान पाच षटकांची गोलंदाजी आणि फलंदाजी करणे आवश्यक असतं. त्यामुळे सामना राखीव दिवशी खेळवताना कमी षटकांचा सामना खेळून निकाल लावता येतो का हे आधी तपासून पाहिलं जाईल आणि मग पुढील निर्णय घेतला जाईल.
सामना सुरु होऊन थांबवल्यास?
सामना सुरु झाला आणि पावसामुळे मध्येच थांबवावा लागला तर राखीव दिवशी सामना आहे त्या स्थितीमधून म्हणजेच धावपळक आहे त्या स्थितीमधून सुरु केला जाईल. रविवारच्या नियोजनामध्ये पावसाचा विचार करुन ३० मिनिटांचा अतिरिक्त राखीव वेळही ठेवण्यात आला आहे. मात्र राखीव दिवशी चार तासांच्या खेळाचं नियोजन असेल. त्यामुळे भारतीय वेळेनुसार उद्या म्हणजेच राखीव दिवसाचा खेळ सकाळी साडेनऊ वाजता खेळ सुरु होईल.
आयसीसीने १३ नोव्हेंबर रोजी ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी आधी नियमांप्रमाणे दोन तासांचा राखीव वेळ देण्यात आला होता. पण मेलबर्नमधील हवामान पाहून हा वेळ दोन तासांवरुन चार तासांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
राखीव दिवशीही पाऊस पडला तर?
राखीव दिवशीही पाऊस पडला तर दोन्ही संघांना जेतेपद वाटून दिलं जाईल. उपांत्य फेरीचा जो पहिल्या क्रमांकावर तो विजेता हा नियम इथे लागू होणार नाही. दोन्ही संघ विजेता म्हणून घोषित केले जातील.