-ज्ञानेश भुरे
विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताने बुधवारी बांगलादेशाचा संघर्षपूर्ण लढतीत ५ धावांनी पराभव केला. या विजयाने भारताने उपांत्य फेरीतील मार्ग सुकर केला. या विजयानंतर भारतासमोर नेमके काय आव्हान असेल आणि गटाचे समीकरण काय राहील याचा घेतलेला आढावा…
भारतासाठी हा विजय किती महत्त्वाचा ठरला?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला सर्व काही सुरळीत सुरू असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर वेगवेगळ्या अंगाने बरीच चर्चा झाली. पण, जेव्हा बांगलादेशाने ऐन सामन्यात भारतासमोर आव्हान उभे केले तेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव महागात पडणार अशी शंकेची पाल मनात चुकचुकून गेली. पण, या आव्हानात्मक परिस्थितीचा संयमाने सामना करताना भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि भारताचा विजय साकार केला. आता या विजयाने भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर केला. अन्य सामन्यांच्या निर्णयावर फार अवलंबून राहावे लागणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर संघर्ष करावा लागला असला, तरी भारतासाठी हा विजय महत्त्वाचा ठरला.
पाऊस आणि डकवर्थ-लुईस नियमाचा कसा फायदा झाला?
क्रिकेट सामन्यात पावसाचे आव्हान नेहमीच असते. पावसामुळे सामना रद्द झालेली उदाहरणे आहेत आणि पावसामुळे निर्णयासाठी वापरण्यात येणाऱ्या डकवर्थ-लुईस नियमाचा फटका बसलेली उदाहरणेही खूप आहेत. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेत पावसापेक्षा त्यानंतर निर्णयासाठी वापरण्यात येणारे डकवर्थ-लुईसचे समीकरण याचे खरे आव्हान असते. या वेळी डकवर्थ-लुईस नियमापेक्षा भारतासाठी पाऊस धावून आला असेच म्हणावे लागेल. कारण, पावसामुळे खेळ थांबला तेव्हा बांगलादेश डकवर्थ-लुईस नियमानुसार १७ धावांनी पुढे होते. पण, पावसाने विश्रांती घेतली आणि मैदानावरील सुविधांमुळे सामना पुढे सुरू झाला. तेव्हा बांगलादेशाच्या वाट्यातील चार षटके आणि ३३ धावा कमी करून १६ षटकांत १५१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. उर्वरित ९ षटकांत ८१ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशाचे फलंदाज दडपणाखाली खेळले. याचा फायदा भारतीयांनी अचूक उठवला.
सामन्यातील निर्णायक क्षण कोणता?
राहुलला गवसलेला सूर, विराट कोहलीचे सातत्य, सूर्यकुमारची आक्रमकता ही भारताच्या विजयाची कारणे देता येतील. पण, ते निर्णायक क्षण ठरू शकत नाहीत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन लिटन दासने केलेली फटकेबाजी धडकी भरवणारी होती. लिटन दासने २१ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकून एक वेळ भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. पण, खेळ पुन्हा सुरू झाल्यावर काहीशा निसरड्या मैदानावर चेंडू वेगाने जात नव्हता. खेळाडू घसरत होते. अशाच वेळी एक धाव चोरण्याच्या नादात लिटन परतताना घसरला. त्यातही तोल सावरत तो धावला. पण, राहुलच्या अचूक फेकीने लिटन धावबाद झाला. सामन्याला इथेच खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
भारताच्या विजयानंतर गटाचे समीकरण कसे असेल?
बांगलादेशवर संघर्षपूर्ण विजय मिळविल्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित नाही, तर फक्त सुकर झाला आहे. उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताला झिंम्बाब्वेवर विजय आवश्यक आहे. भारत सध्या गटात आघाडीवर आहे. पाकिस्तानला अजून आशा आहेत. पण, त्यांना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशवर मोठे विजय आवश्यक आहेत. अर्थात, पाकिस्तान गुरुवारी दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यास भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेशाला बळकटी मिळेल आणि पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात येईल. पण, जर पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले आणि झिम्बाब्वेने भारताला हरवले तर सरस धावगती राखल्यास पाकिस्तान गुणतक्त्यात भारताच्या पुढे जाईल. नेदरलॅंड्सनी अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवले किंवा पावसामुळे सामनाच झाला नाही, तर पाकिस्तान निव्वळ धावगतीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेलाही मागे टाकू शकेल. बांगलादेशने पाकिस्तानला हरवल्यास ते देखील स्पर्धेत राहतील. पण, त्यासाठी झिम्बाब्वेने भारताला हवरणे आवश्यक असेल. अर्थात, अशा वेळी बांगलादेशला निव्वळ धावगतीचा फटका बसू शकतो.
भारतासमोर आता काय आव्हाने असतील?
भारताने बुधवारी बांगलादेशविरुद्ध विजय मिळविल्यानंतरही अनेक प्रश्न भारतासमोर उभे आहेत. भारताला अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करायची असेल, तर पॉवर प्लेमधील फलंदाजी आणि उत्तरार्धातील गोलंदाजी यात सुधारणा करावी लागणार आहे. भारतीय डाव प्रत्येक सामन्यात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीने उभा राहिला. सलामीच्या जोडीला येणाऱ्या अपयशाची डोकेदुखी कायम राहिली आहे. के. एल. राहुलला लय गवसली असली, तरी रोहित शर्मा अजून धडपडतोय. पॉवर प्लेच्या सहा षटकांत आजचा सामना वगळता ३५ धावांच्या पुढे जाता आलेले नाही. भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवता येऊ शकतो हे लिटन दासने दाखवून दिले आहे. भारतीय गोलंदाजांचे बलस्थान स्विंग गोलंदाजी आहे. परंतु त्यांच्याकडे फारसा वेग नाही. हा कच्चा दुवा बाकीचे संघ हेरतील हे नक्की. त्यामुळे हा विजयसुद्धा भारताला जागे करणारा आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशने आमच्यापेक्षा सरस खेळ केला आणि आम्हाला अजून सुधारणा करण्यास वाव असल्याचे दाखवून दिल्याचे मान्य केले आहे.