-संदीप कदम
पाकिस्तानविरुद्ध रविवारी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या थरारक सामन्यात विराट कोहलीने अविस्मरणीय खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. दडपणाखाली येऊनही विराटने ५३ चेंडूंत केलेल्या नाबाद ८२ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने चार गडी राखून विजय नोंदवला. या विजयामुळे भारताने गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपाही काढला. त्याच्या या खेळीनंतर पुन्हा एक सिद्ध केले की, आधुनिक क्रिकेटमधील तो सर्वात मोठा ‘मॅचविनर’ आहे. विराटची ही खेळी अविस्मरणीय होतीच, पण यापूर्वीही त्याने अशा अनेक निर्णायक खेळी केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे नाबाद ८२…
२०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची गाठ ऑस्ट्रेलियन संघाशी होती. भारताला विजयासाठी १६१ धावांची आवश्यकता होती. भारतीय संघाची ४ बाद ९४ अशी बिकट असताना विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करीत ५१ चेंडूंत नाबाद ८२ धावांची निर्णायक खेळी केली. त्याने महेंद्रसिंह धोनीसह भागीदारी रचत भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला चढवत आक्रमक फटके मारले. या खेळीत त्याने नऊ चौकार व दोन षटकार लगावले.
होबार्ट येथील १३३ धावांची स्फोटक खेळी…
विराटने २८ फेब्रुवारी, २०१२ मध्ये होबार्ट येथे आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी केली. विराटच्या फलंदाजीमुळे श्रीलंकेने दिलेले ३२१ धावांचे लक्ष्य भारताने ३६.४ षटकांत पूर्ण केले. त्याने ८६ चेंडूंत १३३ धावांच्या खेळीत १६ चौकार आणि दोन षटकार लगावले. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ४० षटकांमध्ये लक्ष्य पूर्ण करायचे होते. हे अशक्य लक्ष्य भारताला विराटमुळेच पूर्ण करता आले आणि भारताने ७ गडी राखून विजय साजरा केला. त्याने मलिंगाविरुद्ध केलेली फटकेबाजी आजही सर्वांना लक्षात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची १२९ धावांची खेळी…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८मध्ये झालेल्या सहा सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात विराटने चमक दाखवली. भारताने या मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली होती. अखेरच्या सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना लवकर गमावले. त्यांनतर कोहलीने ९६ चेंडूंत १२९ धावांची खेळी केली. त्याने या कामगिरीच्या बळावर भारताला सामन्यासह मालिकेतही विजय मिळवून दिला. त्याने आपल्या या खेळीत १९ चौकार व दोन षटकार लगावले.
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा…
भारत आणि पाकिस्तान यांदरम्यान आशिया चषक २०१२मध्ये सामना झाला. ही लढत विराट कोहलीच्या ऐतिहासिक खेळीसाठी ओळखली जाते. पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३२९ धावा केल्या. पाकिस्तानकडून नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफीझने शतकी खेळी केली. भारताकडून गौतम गंभीर लवकर माघारी परतल्यानंतर विराट मैदानात आला. त्यानंतर त्याने सामन्याचे सर्व चित्र पालटून टाकले. त्याने १४८ चेंडूंत १८३ धावांची खेळी केली. त्याने आपल्या या खेळीमध्ये २२ चौकार आणि एक षटकार मारला. ही खेळी विराटच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक समजली जाते.
विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध १०७ धावा…
भारत आणि पाकिस्तान यांमधील सामना हा नेहमीच रोमहर्षक होताना दिसतो. २०१५ विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकले होते. भारताने नाणेफेक जिंकून सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराटने संघासाठी निर्णायक खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत १२६ चेंडूंचा सामना करीत १०७ धावा केल्या. यानंतर भारताच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरीत करत पाकिस्तानला २२४ धावांवर रोखले. या सामन्यात विराटला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
इंग्लंडविरुद्धची १४९ धावांची खेळी…
२०१४ मध्ये झालेल्या निराशाजनक इंग्लंड दौऱ्यानंतर २०१८च्या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचे विराटवर दडपण होते. एजबॅस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत एकीकडे भारतीय फलंदाजांना अडथळा येत असताना कोहलीने २२५ चेंडूंत १४९ धावांची खेळी केली. या खेळीमुळे विराटने भारताला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढले. त्याने या वेळी तळाच्या फलंदाजांसह भागीदारी रचत संघाच्या धावसंख्येत भर घातली.