-अन्वय सावंत

ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारताने २००७मध्ये झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र भारताची ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाची पाटी कोरीच आहे. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताला गोलंदाजांच्या कामगिरीची चिंता असली, तरी विश्वचषकापूर्वी बहुतांश फलंदाजांना सूर गवसणे ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. फलंदाजी ही कायमच भारताची जमेची बाजू मानली जाते. ट्वेन्टी-२० विश्वचषकातही फलंदाजच भारताचे तारणहार ठरण्याची शक्यता आहे.

रोहित-राहुल या सलामीच्या जोडीवर मोठी जबाबदारी का?

ट्वेन्टी-२० विश्वचषकात केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघे भारताच्या डावाची सुरुवात करतील. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातही राहुल-रोहित जोडीच सलामीला खेळत होती. मात्र, त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही, परिणामी भारताला बाद फेरीही गाठता आली नाही. परंतु त्यावेळी विराट कोहली भारताचे कर्णधारपद भूषवत होता. त्या विश्वचषकानंतर रोहितने नेतृत्वाची धुरा सांभाळली आणि त्याने फलंदाजांना आक्रमक शैलीत खेळ करण्याची मोकळीक दिली. गेल्या काही काळात राहुलच्या धावगतीबाबत (स्ट्राईक रेट) बरीच चर्चा केली जात होती. मात्र, गेल्या महिन्यात राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांत १४६.६६च्या धावगतीने धावा केल्या. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनही सामन्यांत अर्धशतके झळकावली. तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी ब्रिस्बन येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने ३३ चेंडूंत ५७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे तो लयीत आहे. त्याचा साथीदार रोहितला यावर्षी २३ ट्वेन्टी-२० सामन्यांत केवळ दोन अर्धशतके करता आली असली, तरी तो आक्रमक शैलीत फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघांतील सर्वोत्तम गोलंदाजांवर दडपण आणतो आहे. त्याने या वर्षात १४२.४८च्या धावगतीने धावा केल्या आहेत. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकातही राहुल-रोहित जोडीने पॉवर-प्लेच्या सहा षटकांत वेगाने धावा केल्यास मधल्या फळीवरील दडपण कमी होईल.

कोहली-सूर्यकुमारवर कोणती जबाबदारी?

राहुल-रोहितने चांगली सुरुवात करून दिली तरी, भारताला मोठी धावसंख्या गाठण्यासाठी मधल्या फळीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तिसऱ्या क्रमांकावर कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव खेळणे अपेक्षित आहे. कोहलीला गेल्या काही काळात मोठी खेळी करण्यात अपयश येत होते. त्यामुळे त्याने महिनाभर विश्रांती घेतली. त्यानंतर त्याने अमिराती येथे झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत भारतीय संघात पुनरागमन केले आणि अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद १२२ धावांची खेळी करताना अडीच वर्षांपासूनचा शतकाचा दुष्काळ संपवला. या स्पर्धेच्या पाच सामन्यांत कोहलीने शतकासह दोन अर्धशतकेही साकारली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक सामन्यात त्याने ६३ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियात कोहलीने कायमच दमदार कामगिरी केली असून ट्वेन्टी-२० विश्वचषकातही त्याच्याकडून संघाला सातत्याची अपेक्षा असेल. त्याला सूर्यकुमारची साथ लाभेल. मुंबईकर सूर्यकुमार सध्या भारताचा सर्वात लयीत असणारा फलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळून गेल्या सहा सामन्यांत अनुक्रमे ४६, ०, ६९, नाबाद ५०, ६१, ८ धावा अशी सूर्यकुमारची कामगिरी आहे. त्याने या दोन्ही मालिकांमध्ये १८५ हूनही अधिकच्या धावगतीने धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याने अर्धशतक केले.

हार्दिकची भूमिका किती निर्णायक?

ट्वेन्टी-२० विश्वचषकात अष्टपैलू हार्दिक पंड्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. हार्दिक पाचव्या क्रमांकावर खेळणे अपेक्षित असून अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याची त्याची क्षमता भारतासाठी निर्णायक ठरू शकेल. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने फलंदाजीतही आपली चमक दाखवली. त्याने १५ सामन्यांत ४८७ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानावर होता. त्यानंतर भारतीय संघाकडून खेळतानाही त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. त्याने या वर्षात १८ ट्वेन्टी-२० डावांमध्ये १५१.३८च्या धावगतीने ४३६ धावा केल्या असून यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ३७ चौकार आणि २२ षटकारही मारले आहेत. दडपणातही संयम राखून फलंदाजी करण्याचा हार्दिकमधील गुण भारतासाठी फायदेशीर ठरेल.

कार्तिक आणि पंतमध्ये कोणाला पसंती?

यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यात स्पर्धा आहे. कार्तिकच्या गाठीशी अधिक अनुभव असला, तरी पंतच्या डावखुरेपणाबाबतही भारतीय संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागतो आहे. मात्र, कसोटी आणि एकदिवसीय संघाचा प्रमुख सदस्य असलेल्या पंतला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये छाप पाडता आलेली नाही. दुसरीकडे कार्तिकमध्ये अखेरच्या षटकांत मोठे फटके मारून सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे. त्याने गेल्या ‘आयपीएल’मध्ये विजयवीराची (फिनिशर) भूमिका चोख बजावली. त्यामुळे सहाव्या क्रमांकावर कार्तिकला पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे.

जडेजाची उणीव कितपत भासणार?

डावखुरा फलंदाज आणि तितकाच चांगला डावखुरा फिरकीपटू असलेल्या अष्टपैलू रवींद्र जडेजाची भारताला या स्पर्धेत उणीव भासू शकेल. दुखापतीमुळे जडेजाला ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलची भारतीय संघात निवड झाली आहे. अक्षर उत्तम गोलंदाज असला, तरी फलंदाज म्हणून त्याची जडेजाशी तुलना होऊ शकत नाही. जडेजाने सातव्या क्रमांकावर खेळताना भारताला सामने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे त्याची कमी भरून काढण्यासाठी अक्षरसह अश्विन, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या तळाच्या फलंदाजांनी योगदान देणे गरजेचे आहे.

Story img Loader