-संदीप कदम
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. फलंदाजी, गोलंदाजीच्या आघाडीवर पाकिस्तानच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. अनेक अडथळे ओलांडून या स्तरापर्यंत आलेल्या पाकिस्तानच्या फिनिक्सभरारीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध अंतिम फेरीत कोणाचे आव्हान असेल हे गुरुवारी कळेल. पाकिस्तानच्या एकूण कामगिरीचा घेतलेला हा आढावा…
बाबर आझमला सूर सापडणे संघासाठी का महत्त्वाचे?
संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत बाबरच्या फलंदाजीमधील लय हा पाकिस्तानच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय होता. बाबर लवकर बाद झाल्याने पाकिस्तानच्या मध्यक्रमावर दडपण निर्माण होत होते. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मोहम्मद रिझवान (५७ धावा) आणि बाबर आझम (५३ धावा) यांनी आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या गड्यासाठी केलेल्या १०५ धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला गेला. त्यामुळे अंतिम सामन्यात जाण्यापूर्वी बाबरचा आत्मविश्वासही दुणावला असेल. विशेष म्हणजे या सामन्यात त्याला जीवदानही मिळाले. त्याचा बाबरने फायदा घेतला. आता पाकिस्तानला पुन्हा जेतेपद मिळवायचे झाल्यास रिझवान आणि बाबर हे दोघेही खेळाडू लयीत असणे महत्त्वाचे आहे.
वेगवान गोलंदाजांवर भिस्त…
पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी ही नेहमीच त्यांची भक्कम बाजू राहिली आहे. शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह यांनी भेदक माऱ्यासह प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यातच ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्याही त्यांना पूरक आहेत. उपांत्य सामन्यातही आफ्रिदीने दोन बळी मिळवत संघासाठी निर्णायक कामगिरी बजावली. रौफने प्रति १५० ताशी किमीच्या गतीने चेंडू टाकत सर्वांचे लक्ष वेधले. आफ्रिदी विश्वचषक स्पर्धेपूर्वी दुखापतग्रस्त होता, मात्र त्यामधून सावरत त्याने संघात पुनरागमन केले. संघाच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात त्याचे योगदान महत्त्वाचे आहे.
अष्टपैलू खेळाडूंचे योगदान किती मोलाचे?
पाकिस्तानची या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात भक्कम बाजू म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू. शादाब खान, मोहम्मद नवाझ आणि इफ्तिखार अहमद यांनी संघाच्या प्रवासात निर्णायक भूमिका बजावली आहे. या सर्वांमध्ये शादाबचे नाव आघाडीवर आहे. उपांत्य सामन्यातही शादाबने घातक ठरत असलेल्या डेव्हाॅन कॉन्वेला धावचीत करत आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. त्यापूर्वीच्या सामन्यांतही त्याने फलंदाजी किंवा गोलंदाजीत योगदान देत पाकिस्तानचा प्रवास सुकर केला आहे. नवाझ आणि अहमद दोघेही मोठे फटके मारण्यात सक्षम असून संघांसाठी त्यांनीही स्पर्धेत चमक दाखवली आहे.
मोहम्मद हारिसची भूमिका का महत्त्वाची ठरते आहे?
बदली खेळाडू म्हणून संघात आलेला मोहम्मद हारिस सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी फारशी ओळख नसलेला हा खेळाडू सध्या संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडत आहे. उपांत्य सामन्यातही बाबर आणि रिझवान बाद झाल्यानंतर हारिसने (३० धावा) संघाला विजयाच्या समीप नेले. त्यापूर्वी, बांगलादेशविरुद्ध त्याने १८ चेंडूंत ३१ धावा करत सर्वांचे लक्ष वेधले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही त्याने ११ चेंडूंत २८ धावा करत इतर फलंदाजांवरील दडपण कमी केले.
पाकिस्तान १९९२ची पुनरावृत्ती करू शकतो का?
पाकिस्तानच्या संघाने १९९२मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इम्रान खानच्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवले होते. त्यानंतर २००९मध्ये शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली त्यांनी ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला होता. ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जेतेपदाची चर्चा सुरू आहे. १९९२चा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता, तसेच सध्या विश्वचषक स्पर्धाही तेथेच सुरू आहे. तेव्हाही पाकिस्तानचा संघ हा अंतिम फेरीत पोहोचण्याच्या कोणत्याच आशा नव्हत्या. या वेळीही दक्षिण आफ्रिका पराभूत झाल्याने त्यांना अंतिम फेरीत पोहोचता आले. दोन्ही वेळ त्यांनी उपांत्य फेरीत न्यूझीलंडला नमवले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ १९९२च्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
न्यूझीलंडची कामगिरी निर्णायक सामन्यात का ढासळते?
साखळी फेरीत न्यूझीलंडने सातत्यपूर्ण कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली, मात्र उपांत्य सामन्यातील त्यांच्या कामगिरीमुळे सर्वांची निराशा झाली. सर्वच आघाड्यांवर त्यांचे खेळाडू अपयशी ठरले. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदीसारख्या गोलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. फलंदाजीत डॅरेल मिचेल आणि कर्णधार केन विल्यम्सन वगळता इतरांना फारसे काही करता आले नाही. यासह आपल्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी परिचित असलेल्या न्यूझीलंडने या विभागातही निराशा केली. त्यांनी या सामन्यात अनेक झेल सोडले आणि धावचीत करण्याच्या संधीही गमावल्या. गेल्या काही वर्षांत न्यूझीलंडचा संघ उपांत्य किंवा अंतिम सामन्यात पोहोचतो, मात्र तेथे त्यांची कामगिरी ढासळते, हे पुन्हा दिसून आले.