-अन्वय सावंत

‘‘अलीकडच्या काळात केवळ काही खेळाडूंनीच मला जे काही करत असेन ते थांबवून त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी भाग पाडले आहे. सूर्यकुमार यादवमध्ये ती क्षमता आहे,’’ अशा शब्दांत प्रसिद्ध समालोचक हर्ष भोगले यांनी भारतीय फलंदाजाचे कौतुक केले. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात सूर्यकुमारने वैविध्यपूर्ण आणि कलात्मक फटक्यांच्या आतषबाजीने क्रिकेटरसिकांना, समालोचकांना आणि आपल्या संघातील सहकाऱ्यांनाही थक्क केले आहे. भारताच्या डावाची सुरुवात संथगतीने झाली, तरी सूर्यकुमार मैदानावर येताच धावांची गती वाढते. तो अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत फलंदाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दडपण आणतो. याचा भारताच्या इतर फलंदाजांनाही फायदा होतो. त्यामुळे सूर्यकुमारचे भारतीय संघातील महत्त्व सामन्यागणिक वाढते आहे. त्याची कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरते आहे.

Disposal of two and a half lakh metric tons of waste by Vasai Municipal corporation
कचरा विल्हेवाट प्रक्रियेला वेग; पालिकेकडून सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Shubman Gill On the challenges of batting at No 3 in Test Cricket
IND vs BAN : ‘आता माझे लक्ष्य…’, तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याच्या आव्हानाबाबत शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, अर्धशतकांचे मोठ्या…
gharoghari matichya chuli serial janaki stand for ovi against aishwarya new promo out
लेकीसाठी जानकी धारण करणार रौद्र रूप, ऐश्वर्याला दिली सक्त ताकीद; जाणून घ्या ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये नेमकं काय घडणार….
Paralympic gold medal Praveen Kumar Paralympics sport news
हार न मानण्याची प्रवृत्ती हीच प्रवीणची ताकद
Loksatta viva safarnama Map reading and traveling
सफरनामा: नकाशावाचन आणि भटकंती
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल

सूर्यकुमारने ट्वेन्टी-२० विश्वचषकात कशी कामगिरी केली आहे?

ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार हा भारताचा सर्वांत लयीत असणारा फलंदाज होता आणि त्याने ही लय विश्वचषकातही कायम ठेवली आहे. सूर्यकुमारने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आतापर्यंतच्या पाच सामन्यांत ७५च्या सरासरीने २२५ धावा फटकावल्या आहेत. त्याने या धावा १९३.९७च्या धावगतीने (स्ट्राइक रेट) केल्या असून १००हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याची धावगती सर्वोत्तम आहे. त्याने नेदरलँड्स (२५ चेंडूत नाबाद ५१ धावा), दक्षिण आफ्रिका (४० चेंडूत ६८) आणि झिम्बाब्वे (२५ चेंडूत नाबाद ६१) या संघांविरुद्ध अर्धशतके साकारली.

सूर्यकुमारच्या खेळींचे वैशिष्ट्य काय?

नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या तुलनेने दुबळ्या संघांविरुद्ध आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली होती. त्यानंतर सूर्यकुमारने फटकेबाज अर्धशतके साकारत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र भारताची ५ बाद ४९ अशी स्थिती झाली होती. परंतु सूर्यकुमारने कगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, लुन्गी एन्गिडी आणि वेन पार्नेल या आफिकेच्या दर्जेदार वेगवान चौकडीचा नेटाने सामना केला. त्याने डावाच्या सुरुवातीला मैदानी फटके मारले, एक-दोन धावा काढून धावफलक हलता ठेवण्यावर भर दिला. त्याने संयम बाळगला. मग डावखुरा फिरकीपटू केशव महाराज गोलंदाजीला येताच त्याने धावांची गती वाढवली. फिरकीपटूंना फारशा अनुकूल नसलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर सूर्यकुमारने महाराजच्या गोलंदाजीवर ३ चौकार व १ षटकार वसूल केला. त्यामुळे अडखळत्या सुरुवातीनंतरही भारताला सन्मानजनक (२० षटकांत ९ बाद १३३) धावसंख्या उभारता आली.

सूर्यकुमार इतरांपेक्षा वेगळा का ठरतो?

‘३६० डिग्री प्लेअर’ अशी सूर्यकुमारने ख्याती मिळवली आहे. कोणताही चेंडू मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात मारण्याची त्याच्यात क्षमता आहे. मनगटाचा अप्रतिम वापर करून चेंडू आपल्या डावीकडे मागील बाजूस (फाइन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये) टोलवण्यात सूर्यकुमार सक्षम आहे. तो सर्वाधिक धावा या इथेच करतो. वेगवान गोलंदाजांच्या गतीचा वापर करून एका पायावर बसून आपल्या मागील बाजूस चेंडू मारण्याचे (लॅप स्वीप) कसब सूर्यकुमारला अवगत आहे. तसेच अधूनमधून नजर चेंडूवर, कोपर वर आणि पाय पुढे काढून अन्य मुंबईकर फलंदाजांप्रमाणे तंत्रशुद्ध फलंदाजी करणेही सूर्यकुमारला जमते. त्याला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वगैरे वेळही लागत नाही. त्यामुळे तो मैदानात येताच भारताच्या डावाला वेग येतो. याच सर्व गोष्टी सूर्यकुमारला इतरांपेक्षा वेगळा बनवतात.

कोणत्या फलंदाजासोबत खेळताना सूर्यकुमार सर्वोत्तम कामगिरी करतो?

सूर्यकुमार आणि विराट कोहली ही जोडी अलीकडच्या काळात भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करते आहे. एकीकडे सूर्यकुमारची आक्रमकता, तर दुसरीकडे कोहलीचा संयम हे समीकरण भारताला यश मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरते आहे. कोहली एकेक धाव काढून धावफलक हलता ठेवतो, तर सूर्यकुमार फटकेबाजी करून गोलंदाजांना अडचणीत टाकतो. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील ‘अव्वल १२’ फेरीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहली अव्वल, तर सूर्यकुमार दुसऱ्या स्थानावर होता. या दोघांनी नेदरलँड्सविरुद्ध आठ षटकांतच ९५ धावांची अभेद्य भागीदारी रचली होती. तसेच या स्पर्धेपूर्वीही कोहली आणि सूर्यकुमार यांच्यात निर्णायक भागीदाऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे भारताला तब्बल १५ वर्षांनंतर आता ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकायचा असल्यास आगामी सामन्यांतही या जोडीचे योगदान महत्त्वाचे ठरेल.