ताहिरा कश्यपला दुसऱ्यांदा कॅन्सरचे निदान, कर्करोग पुन्हा होण्याची नेमकी कारणं कोणती?

प्रसिद्ध चित्रपट निर्माती ताहिरा कश्यप हिला दुसऱ्यांदा स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. ४२ वर्षीय ताहिराने २०१८ मध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली होती. आता पुन्हा एकदा तिला कर्करोगाने ग्रासलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत ताहिरानं ही माहिती दिली आहे. “सात वर्षांच्या नियमित तपासणीची ताकद आणि थेरपी… हा एक दृष्टिकोन आहे. नियमित मॅमोग्रामची गरज आहे आणि सर्वांना मी हेच सुचवेन. माझ्यासाठी हा दुसरा राउंड… कारण मला पुन्हा कर्करोगाचं निदान झालं आहे”, असं ताहिरानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ताहिराच्या या पोस्टवर तिचे कुटुंबीय, मित्र व चाहते यांच्याकडून कमेंट्स येत असून, सर्व जण तिला धीर देत आहेत. ताहिराचा पती अभिनेता आयुष्मान खुराना यानं ताहिराला ‘माझा हीरो’ असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्यदिनी ताहिरानं तिला दुसऱ्यांदा कर्करोगाचं निदान झाल्याचं सांगितलं आणि या आजाराशी लढा देण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला आहे. ताहिराला सात वर्षांपूर्वी कर्करोग झाला होता आणि आता पुन्हा या आजारानं तोंड वर काढलं आहे. कर्करोगावर एकदा उपचार झाल्यावर आणि तो बरा झाल्यावर पुन्हा कसा उद्भवतो यामागे काही महत्त्वाची कारणं असू शकतात. नेमकी कोणती कारणं आहेत ते जाणून घेऊ…

कर्करोग पुन्हा का होतो?

कर्करोगावरील उपचारानंतर काही महिने किंवा काही वर्षांनी हा आजार पुन्हा होऊ शकतो. काही वेळा उपचारादरम्यान कर्करोगाच्या काही पेशी शरीरातच राहतात आणि आक्रमक उपचारांपासूनही त्यांचा बचाव होतो. नंतर काही वर्षांनी या कर्करोगाच्या पेशी अॅक्टिव्हेट होतात. क्लिव्हलँड क्लिनिकनुसार, कर्करोगाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. तसेच चाचण्यांमधून कर्करोग गायब झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर काही वर्षांनी तो परत होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला पुन्हा कर्करोग होतो आणि तो मूळ कर्करोगासारखाच होतो. हा कर्करोगाचा काही वेगळा प्रकार नसून, त्यामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही. दिल्लीतील एका रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोगशास्त्राच्या प्रमुख सल्लागार डॉ. तृप्ती रहेजा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “यशस्वी उपचारानंतरही काही सूक्ष्म कर्करोग पेशी शरीरात लपून राहतात. कालांतरानं त्या वाढू शकतात आणि त्यातून कर्करोगाची पुनरावृत्ती होते.”

कर्करोगाच्या पुनरावृत्तीचे प्रकार

कर्करोगाच्या पुनरावृत्तीचं वर्गीकरण तो शरीराच्या कोणत्या भागात होतो यावरून केलं जातं. जर आधीच्या भागात पुन्हा कर्करोग झाला, तर त्याला स्थानिक पुनरावृत्ती, असे म्हणतात. जेव्हा मूळ कर्करोगाजवळील भागात लिम्फ नोड्स म्हणजेच लसीका ग्रंथींमध्ये ट्यूमर होतो तेव्हा प्रादेशिक पुनरावृत्ती होते. तिसरा प्रकार म्हणजे दूरस्थ पुनरावृत्ती ज्यामध्ये मूळ ट्यूमरमधील कर्करोग शरीरात आधी झालेल्या भागापेक्षा त्यापासून दूरच्या भागात किंवा लसीका ग्रंथींमध्ये पसरतो. अमेरिकेतली कर्करोग संशोधन केंद्र सिटी ऑफ होपच्या वेबसाइटनुसार, “दूरस्थ पुनरावृत्ती ज्याला मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग, असंही म्हणतात. या प्रकारामध्ये आधी स्तनात उद्भवलेला ट्यूमर नंतर हाडे, यकृत किंवा फुप्फुसांमध्ये होतो.”

स्तनाच्या कर्करोगाची पुनरावृत्ती सामान्य आहे का?

स्तनाचा कर्करोग पुन्हा होणं ही दुर्मीळ बाब आहे. अपोलो रुग्णालयाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, कर्करोगाचा निदानाचा टप्पा, त्याचा प्रकार, उपचार व काही वैयक्तिक घटक यांवर अवलंबून असलेल्या स्तनाच्या कर्करोगाच्या पुनरावृत्तीचे प्रमाण भारतात साधारणपणे २० ते ३० टक्के असल्याचा अंदाज आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सर आणि ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर या प्रकारात स्तनाच्या कर्करोगाच्या इतर प्रकारांपेक्षा पुनरावृत्तीचा धोका जास्त असतो. ३५ वर्षांच्या आधी स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांना कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते. “कर्करोग पुन्हा होण्याचा धोका हा मूळ कर्करोगाचा प्रकार आणि टप्प्यावरदेखील अवलंबून असतो. काही प्रकारचा कर्करोग जसा की, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर जास्त आक्रमक असतो आणि उपचारानंतर पहिल्या काही वर्षांत तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता जास्त असते,” असं डॉ. रहेजा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

स्तनाच्या कर्करोगाची स्थानिक पुनरावृत्ती साधारणपणे लम्पेक्टॉमी (स्तनसंवर्धन शस्त्रक्रिया) किंवा पार्शियल मास्टेक्टॉमीच्या (अंशत: स्तन संरक्षण शस्त्रक्रिया) पाच वर्षांच्या आत होते. क्लिव्हलँड क्लिनिकने सांगितल्याप्रमाणे, “शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन थेरपी घेतल्यास या कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच या संयुक्त उपचारानंतर १० वर्षांच्या आत स्तनाचा कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता तीन ते १५ टक्के असते.

स्तनाच्या कर्करोगाच्या पुनरावृत्तीची लक्षणे

कर्करोग पुन्हा कुठल्या भागात झाला आहे यावर लक्षणे अवलंबून असतात. क्लिव्हलँड क्लिनिकच्या लेखानुसार, ज्यांना स्थानिक पुनरावृत्ती होते त्यांना छातीवर किंवा स्तनाच्या खाली गाठी, स्तनाग्रांमध्ये बदल, शस्त्रक्रियेच्या डागाजवळ गाठीसदृश जाणवणे, लम्पेक्टॉमी शस्त्रक्रिया झालेल्या भागाजवळील सुजलेली त्वचा व स्तनाच्या लसीका ग्रंथी अति कडक होणे, अशी लक्षणे जाणवतात.
प्रादेशिक स्तनाच्या कर्करोगामुळे अन्न गिळण्यास त्रास होतो, छातीत वेदना होतात, एका हाताला किंवा खांद्याला सूज किंवा बधीरपणा, तसेच काखेत किंवा कॉलर बोनभोवती सुजलेल्या लिम्फ नोड्स (लसीका ग्रंथी) येऊ शकतात. दूरवरच्या स्तनाच्या कर्करोगामुळे कर्करोग झालेल्या ठिकाणी वेदना होतात, जुनाट कोडा खोकला, चक्कर येणे, अति थकवा, भूक न लागणे, मळमळ आणि वजन कमी होणे, तीव्र डोकेदुखी तसंच अशक्तपणा आणि संतुलनाबाबत समस्या किंवा झटके येऊ शकतात.

कर्करोगाची पुनरावृत्ती कशी टाळता येऊ शकते?

पहिल्यांदाच स्तनाच्या कर्करोगातून बरे झालेल्या रुग्णांना तज्ज्ञ नियमित फॉलोअप स्क्रीनिंग आणि मॅमोग्राम करण्याचा सल्ला देतात. तसेच स्तनातील कोणत्याही बारीक बदलांवर लक्ष ठेवणंही गरजेचं आहे. कर्करोगातून बरे झालेल्यांनी पौष्टिक आहार घेणं, नियमित व्यायाम करणं पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. तसेच दारूचं सेवन आणि धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. “व्यक्तीच्या सध्याच्या परिस्थितीनुसार किंवा कुटुंबातील कर्करोग सिंड्रोम यांवर आधारित विशिष्ट कर्करोग तपासणीदेखील फायद्याची ठरू शकते. मात्र, साधारणपणे कर्करोग झालेला नसलेल्या लोकांसाठीदेखील यांसारखीच कर्करोग तपासणी मार्गदर्शक तत्त्वं पाळली पाहिजेत”, असं अमेरिकन कॅन्सर सोसायटीकडून सांगण्यात आलं.