बुधवारी सकाळी तैवानच्या पूर्व किनार्याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. भूकंपानंतर तैवानमधील किनारपट्टी भागांना आणि शेजारील काही देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपात चार लोकांनी आपला जीव गमावला असून डझनभर लोक जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या आकड्यांमध्ये वाढ होऊ शकते, असे अधिकार्यांचे सांगणे आहे.
भूकंपामुळे पूर्व किनाऱ्यावरील हुआलियन येथील मोठमोठ्या इमारतींचे नुकसान झाले आहे. हेच ठिकाण भूकंपाचे केंद्र होते. या भागात बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपाने संपूर्ण तैवान हादरले आहे. दक्षिणेकडील जपानी बेटांना आणि फिलिपिन्समध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आला. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून जवळ असल्याने तैवान आणि बेटांवर हे धक्के जाणवले.
भूकंप किती तीव्र होता?
‘असोसिएटेड प्रेस (एपी)’नुसार, ७.२ तीव्रतेचा भूकंप हुआलियन शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर आणि सुमारे ३५ किलोमीटर खोल होता. ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’ने भूकंपाची तीव्रता ७.४ एवढी नोंदवली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, पर्वतीय मध्य पूर्व किनारपट्टीवर भूस्खलनासह आतापर्यंत २५ हून अधिक धक्के जाणवले आहेत. तैवानच्या राष्ट्रीय अग्निशमन एजन्सीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या आधी झालेल्या भूकंपात हुआलियन काउंटीमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आणि किमान ५७ लोक जखमी झाले.
स्थानिक युनायटेड डेली न्यूजने वृत्त दिले आहे की, भूकंपाच्या केंद्राजवळील तारोको नॅशनल पार्कमध्ये खडक कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. या भूकंपात २६ इमारती कोसळल्या आहेत. त्यात २० हून अधिक लोक अडकले असल्याची शक्यता आहे. या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे त्यात म्हटले आहे. हुआलियनमधील इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काहींचे मजले कोसळले आहेत, तर काही इमारती झुकल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षा हेल्मेट देत, सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. २३ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या तैवानमध्ये रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली. भूकंपामुळे भुयारी रेल्वे मार्गाच्या रेल्वे लाईनचे नुकसान झाले आहे.
दुसऱ्या महायुद्धापूर्वी बांधलेल्या राष्ट्रीय विधीमंडळाच्या भिंती आणि छतालाही नुकसान झाले आहे. तैवानमधील तैपेई शहर सरकारने सांगितले की, त्यांना मोठ्या नुकसानाची कोणतीही माहिती मिळाली नाही. तैवानमधील ८७ हजारांहून अधिक घरांमध्ये अजूनही वीजपुरवठा खंडित असल्याचे तैवानमधील वीज कंपनी ताईपॉवरने सांगितले आहे. तैवानमध्ये असणार्या दोन अणुऊर्जा केंद्रांवर भूकंपाचा परिणाम झाला नाही, असेही ताईपॉवरने सांगितले. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सेमीकंडक्टर जायंट तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग को (टीएसएमसी) ने सांगितले की, त्यांनी काही फॅब्रिकेशन प्लांट्स रिकामे केले आहेत.
भूकंपानंतर सुमारे १५ मिनिटांनी योनागुनी बेटाच्या किनारपट्टीवर ३० सेंटीमीटर (सुमारे एक फूट) त्सुनामीची लाट आली. इशिगाकी आणि मियाको बेटांवर लहान लाटा पाहण्यात आल्या. जपानने ओकिनावा प्रदेशातील स्थितीची माहिती घेण्यासाठी लष्करी विमाने पाठवली. शांघाय आणि चीनच्या आग्नेय किनाऱ्यालगतच्या अनेक प्रांतांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, असे चिनी माध्यमांनी सांगितले. मात्र, चीनने त्सुनामीचा कोणताही इशारा दिला नाही. जिमू न्यूज या ऑनलाइन आउटलेटनुसार, चीनच्या फुजियान प्रांतातील रहिवाशांना धक्के जाणवल्याचे समोर आले. फिलीपिन्समध्ये उत्तर किनाऱ्यावरील रहिवाशांना उंच भागावर जाण्यास सांगण्यात आले, परंतु भूकंपाच्या तीन तासांनंतर कोणतीही मोठी त्सुनामीची नोंद झाली नाही.
तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
तैवानमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात. परंतु, हा २५ वर्षांतील सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगण्यात आले आहे. तैवान ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ च्या पट्ट्यात येते. पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा ज्वालामुखी आणि भूकंपांचा पट्टा आहे. हा पट्टा पॅसिफिक महासागराला वेढून आहे; जिथे जगातील सर्वात जास्त भूकंप होतात. तैवानने १९०१ ते २००० दरम्यान ९१ मोठे भूकंप पाहिले. देशामध्ये एक पूर्व चेतावणी प्रणालीदेखील आहे, जी भूकंपाचे झटके ओळखते आणि ताबडतोब सतर्कतेचा इशारा देते.
फेब्रुवारी २०१८ मध्ये, हुआलियनमध्ये शेवटचा ६.४ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात १७ लोकांचा मृत्यू झाला. तसेच एक ऐतिहासिक हॉटेल आणि इतर अनेक इमारती कोसळल्या. मोनाश विद्यापीठातील भूकंपशास्त्रज्ञ डी. निनिस यांनी ‘द कन्व्हर्सेशन’ लेखात लिहिले आहे की, या प्रदेशात दर ३० वर्षांतून एकदा सात तीव्रतेपेक्षा मोठे भूकंप होतात. फेब्रुवारी २०१६ मध्ये नैऋत्य तैवानमध्ये ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपात किमान ११४ लोकांचा मृत्यू झाला होता. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृतात, गेल्या १०० वर्षांमध्ये भूकंपाच्या ठिकाणाच्या २५० किलोमीटरच्या आत ९० हून अधिक भूकंप झाले. डिसेंबर १९४१ मध्ये दक्षिण-पश्चिम तैवानमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला, असे या वृत्तात देण्यात आले आहे.
सर्वात मोठा भूकंप कधी झाला?
‘एपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑनशोअर तैवानमधील रेकॉर्डवरील सर्वात भयंकर भूकंपाची घटना म्हणजे ची-ची किंवा जिजी हा भूकंप होता. हा भूकंप २१ सप्टेंबर १९९९ ला आला होता. पहाटे २ च्या सुमारास ७.७ तीव्रतेच्या भूकंपाचा झटका तैवानच्या नानटौ टाउनशिपला बसला होता. या भूकंपात दोन हजार ४०० लोकांचा मृत्यू झाला, एक लाख लोक जखमी झाले आणि ५० हजार इमारती कोसळल्या.
हेही वाचा: मतदानावर होणार उष्णतेच्या लाटेचा परिणाम? हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा
या विनाशकारी भूकंपाने सरकारला राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रणालीसंबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि भूकंप पूर्व चेतावणी प्रणाली सुधारण्यासाठी प्रोत्साहित केले होते. वर्ल्ड डेटा डॉट इन्फो’नुसार, ३ डिसेंबर १९६६ मध्ये बेटावर ८.० तीव्रतेचा सर्वात शक्तिशाली भूकंप झाला होता, त्यात सात लोकांचा मृत्यू झाला होता. एप्रिल १९३५ मध्ये, बेटाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ ७.१ तीव्रतेच्या भूकंपात तीन हजार २०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर १२ हजारांहून अधिक लोक जखमी झाले. या भूकंपात ५० हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले, असे सांगण्यात आले.