British Steal the Taj Mahal’s golden finial: ताजमहाल ही भारतातील महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू असून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ती नेहमीच चर्चेत असते. या वास्तूच्या इतिहासात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. याच अनेक गूढ, अनभिज्ञ गोष्टींपैकी एक गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ताजमहालचा ‘ताज’ कुठे आहे, असा प्रश्न अनेक अभ्यासक विचारत आहेत. जगातील सौंदर्याची छटा असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या, स्मारकांच्या यादीत ताजमहाल अग्रणी आहे. परंतु, खुद्द ज्यावेळी ताजमहालाचाच प्रश्न समोर येतो, त्यावेळी मात्र या वास्तूचा सौंदर्य अलंकार चोरला कोणी या प्रश्नाचा शोध घेतला जातो.

ताजमहालावरील सोन्याची मुकुटमाला गेली कुठे?

ताजमहालचे वर्णन अनेक कवी, रसिकांनी केलेच आहे. निळ्याशार पाण्यावर शुभ्र मोती तरंगावा तसे या वास्तूचे सौंदर्य. याच सौंदर्यात भर घालणारी ४६६ किलो वजनाची सोन्याची मुकुटमाला कधी काळी मध्यवर्ती घुमटाची शोभा वाढवत होती. मात्र आता ही मुकुटमाला अस्तित्त्वात नाही. १८१० साली एका ब्रिटिश अधिकाऱ्याने ही अस्सल सोन्याची टोकदार मुकुटमाला काढून टाकली आणि त्याऐवजी दुय्यम दर्जाची दुसरी एक मुकुटमाला बसवली. या लेखात ताजमहाल वरील सोन्याची मुकुटमला कशी नाहीशी झाली? याचा प्रश्नाचा आढावा घेतला आहे.

…नाहीशा झालेल्या सोन्याच्या मुकुटमालेचे रहस्य

अद्वितीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ताजमहालच्या मध्यभागी असलेल्या घुमटावर मूलतः ४६६ किलो वजनाची नेत्रदीपक अशी सोन्याची टोकदार मुकुटमला/ कलशमाला बसवण्यात आली होती. तब्बल ३० फूट उंच असलेली ही कलशमाला इस्लामी स्थापत्यशास्त्रात दिसणाऱ्या चंद्राच्या खास आकृतीत घडवण्यात आली होती. ही सोन्याची कलशमाला स्मारकाच्या भव्यतेचे प्रतीक तर होतीच, पण त्याकाळच्या उत्कृष्ट कारागिरीचंही प्रतिनिधित्व करत होती. इतिहासकार राज किशोर राजे यांच्या ‘तवारीख-ए-आग्रा’ या पुस्तकात म्हटले आहे की, या कलशमालेसाठी सोनं राजघराण्याच्या खजिन्यातून आणण्यात आलं होतं आणि लाहोरचे उच्च अधिकारी काझिम खान यांच्या देखरेखीखाली ही कलशमाला घडविण्यात आली होती. ही कलशमाला ताजमहालाच्या सौंदर्यात आणि महत्त्वात भर घालणारा एक तेजस्वी मुकुटच ठरली होती.

सोन्याची मुकुटमाला नाहीशी कशी झाली

मूळ सोन्याची मुकुटमाला नाहीशी कशी झाली, हा कुतूहल आणि वादाचा विषय आहे. ऐतिहासिक नोंदींवरून असे दिसून येते की, १८१० साली ब्रिटिश अधिकारी जोसेफ टेलरने हा भाग काढून टाकला. असे मानले जाते की, त्याने सोने स्वतःसाठी घेतले, त्याच्या जागी सोन्याचा मुलामा दिलेला तांब्याची मुकुटमाला बसवण्यात आली. ही सुरुवात होती. त्यानंतर अनेकदा या मुकुटमालेत बदल करण्यात आले. सध्या आपण पाहतो, ती आवृत्ती चौथी आहे.

शहाणा मूर्ख

अमेरिकेने घेतलेला निर्णय हा प्रशंसनीय असला तरी ब्रिटिश काळापासून भारतातील अनेक वस्तू या अवैध, तसेच वैध मार्गाने परदेशात गेल्या आहेत. प्रत्यक्ष भला मोठा ताजमहाल ही या फेऱ्यातून सुटला नव्हता. १८३० साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चक्क ताजमहाल मोडून विकण्याचा घाट घातला होता. या मागे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. लॉर्ड विल्यम बेंटिक यांची भारताच्या इतिहासात वेगळी ओळख आहे. सती प्रथा बंद करण्यामागे बेंटिक यांचा सहभाग होता. परंतु त्यांच्या ताजमहाल विकण्याच्या योजनेमुळे इतिहासात त्यांची ओळख ‘शहाणा मूर्ख’ (Wise fool) अशी राहिली आहे.

ताजमहाल जतन करण्यामागील आव्हाने

ताजमहाल अनेक स्थित्यंतरातून गेला आहे. मुकुटमाला हे एक उदाहरण झाले. याशिवाय नैसर्गिक आपत्ती, प्रदूषण, तस्करी अशा अनेक समस्यांना ही वास्तू तोंड देत आहे. यमुना नदीच्या प्रदूषणामुळे आणि आसपासच्या रासायनिक कारखान्यांमुळे (मथुरा रिफायनरी) ताजमहालचा शुभ्र संगमरवरी रंग हळूहळू पिवळसर पडतो आहे. आम्लयुक्त पावसामुळे मार्बल इरोजन वाढले आहे. दररोज हजारो पर्यटक इथे भेट देतात. त्यामुळे वायू प्रदूषण वाढतं आणि देखभाल खर्चही वाढतो. भूकंप, वादळं आणि पावसामुळे इमारतीच्या पायाभूत संरचनेवर परिणाम होतो. यमुनेच्या पाण्याचा स्तर कमी झाल्यामुळे भूकंपप्रवणता वाढू शकते, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. अनेक छोट्या मूर्ती, शिलालेख आणि पुरावस्तूंची चोरी झाली आहे. देखभाल आणि जतन यासाठी पुरेशा निधीचा अभाव तसेच धोरणातील अकार्यक्षमता मोठं आव्हान ठरत आहे. गेल्या काही दशकांत संवर्धनाची काही कामं चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे वास्तूची मूळ स्थापत्यरचना बदलत आहे.

इतिहास, प्रेम, स्थापत्य आणि संस्कृती यांचा संगम

ताजमहाल हे केवळ एक संगमरवरी स्मारक नसून तो इतिहास, प्रेम, स्थापत्य आणि संस्कृती यांचा भव्य संगम आहे. या वास्तूवरील सोन्याची मुकुटमाला आता अस्तित्त्वात नाही, सौंदर्य पिवळसर पडलं आहे आणि वेळोवेळी राजकीय व पर्यावरणीय आव्हानांनी तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तरीही ताजमहालचं अप्रतिम तेज आजही लाखो मनांवर राज्य करत आहे. केवळ भारतीयांच्याच नाही तर जगभरातील अनेक रसिकांसाठी ही वास्तू महत्त्वाची आहे. त्यामुळेच इतिहासातून धडा घेऊन या वास्तूच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.