राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षाचा (भाजप) काँग्रेस हा प्रमुख विरोधक आहे. मात्र सद्यःस्थितीत द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) मुथ्थुवेल करुणानिधी स्टॅलिन (एमके) यांनी विरोधाची सूत्रे हाती घेतल्याचे चित्र देशभर दिसते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री असलेले ७३ वर्षीय स्टॅलिन यांनी तमीळ अस्मितेचा मुद्दा लावून धरत भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

सामान्य कार्यकर्ता ते पक्षप्रमुख

तामिळनाडूत सध्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून वाद पेटलाय. तमीळ आणि इंग्रजी याच दोन भाषांना स्टॅलिन यांचा पाठिंबा आहे. हिंदीला त्यांचा विरोध असल्याने संसदेतही द्रमुकचे खासदार आक्रमक झाले होते. स्टॅलिन यांनी जी भूमिका घेतली त्याची री या सदस्यांनी पुढे ओढली. कवी, लेखक, विचारवंत अशा विविध भूमिकांतून राजकीय पटल गाजविलेले एम. करुणानिधी यांचे राजकीय वारसदार असलेल्या स्टॅलिन यांची राजकीय परीक्षा तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पुढील वर्षी आहे. स्टॅलिन यांची राजकीय कारकीर्द १९९६ मध्ये चेन्नईचे महापौर म्हणून गाजली. त्यापूर्वी १९७३ मध्ये द्रमुकच्या राष्ट्रीय परिषदेवर प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आणीबाणीत ते स्थानबद्ध होते. पदवी परीक्षा त्यांनी कारागृहातूनच दिली. चेन्नईच्या सात वर्षांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीत त्यांनी शहरात अनेक विकासकामे केली. पुढे २००९ मध्ये राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. द्रमुकची युवा शाखा त्यांनी १९६८ मध्ये सुरू करत, राज्यभर दौरे केले. त्यामुळे परिस्थितीची अचूक जाण त्यांना आहे. आताही पक्षावर पूर्ण पकड असल्याने ते भाजपविरोधात एकहाती झुंज देत आहेत. सामान्य कार्यकर्ता ते द्रमुकचे सर्वेसर्वा असा त्यांचा प्रवास कष्टातून झालाय. केवळ करुणानिधींचे पुत्र म्हणून त्यांना पद मिळाले नाही. त्यांनी मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीला न्याय देत द्रमुकचा सूर्य तळपत ठेवला.

पहिल्याच निवडणुकीत अपयश

स्टॅलिन यांनी थाऊजंड लाइट्स मतदारसंघातून १९८४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढली. त्यात त्यांना अपयश आले. पुढे पाच वर्षांनी ते विधानसभेत पोहचले. त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरली. विरोधी पक्षनेते या नात्याने २०१६ मध्ये त्यांनी राज्यभर दौरे केले. पुढे दोनच वर्षांत करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुकची धुरा त्यांच्याकडे आली. राज्यात २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर द्रमुक सत्तेत आल्यावर स्टॅलिन मुख्यमंत्री झाले. मतदारसंघातील समस्या सोडविणारा उपक्रम असो किंवा पहिले कृषी अंदाजपत्रक अशी वैविध्यपूर्ण कामे स्टॅलिन यांच्या कार्यकाळात नोंदवली गेली. करोनाकाळातही स्टॅलिन यांच्या कामाचे कौतुक विरोधकांनी केले. आता स्टॅलिन केंद्रातील भाजपचे प्रमुख आव्हानवीर म्हणून पुढे आलेत. राहुल गांधी तसेच अरविंद केजरीवाल यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील पर्याय म्हणून पाहिले जात होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची कामगिरी घसरणीला लागली. हरियाणा, महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत त्यांना सपाटून मार खावा लागला. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची दिल्लीतील सत्ता गेली. अशा स्थितीत स्टॅलिन यांनी आपला तामिळनाडूचा बालेकिल्ला केवळ शाबूतच ठेवला नाही तर भक्कम केलाय.

भाषेचा भावनिक मुद्दा

तामिळनाडूत जर फार काही वेगळे घडले नाही तर पुढील वर्षी द्रमुकचीच सत्ता येण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वावरून दुफळी माजलीय. तर भाषेच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेय. विचारांवर ठाम राहात त्यांनी भाषा असो किंवा राज्यांशी संबंधित मुद्द्यांवर आक्रमक पवित्रा घेतलाय. आजच्या घडीला स्टॅलिन तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे दोघेच आपल्या राज्यांत भाजपला आव्हान देताना दिसतात. किंबहुना ही दोन राज्ये आज तरी सत्तेच्या दृष्टीने भाजपच्या टप्प्यात नाहीत. तामिळनाडूमध्ये तर भाजपकडे दोन आकडी आमदारही नाहीत. छोट्या पक्षांना बरोबर घेऊन २०२६ निवडणुकीत फार काही चमत्कार होईल असे चित्र नाही. अशा वेळी स्टॅलिन यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडलीय. गाव पातळीपासून ते संसदेपर्यंत ते आवाज उठवत आहेत. तामिळनाडूत हिंदी विरोध मोठा आहे. त्यामुळेच तीन भाषांच्या धोरणाला त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवलाय.

मतदारसंघ फेररचनेची जोड

भाषा धोरणाबरोबरच प्रस्तावित मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावर स्टॅलिन उत्तरेकडील राज्यांविरोधात सर्वांना एकत्रित करू पाहतात. लोकसंख्या नियंत्रण पर्यायाने राष्ट्रहिताच्या धोरणांची अंमलबजावणी केल्यावर आम्हाला लोकसभा मतदारसंघ फेररचनेत आमच्या जागा कमी होत असतील ते योग्य नाही असा त्यांचा रोकडा सवाल आहे. सर्वपक्षीय बैठक घेत स्टॅलिन यांनी हा मुद्दा लावून धरल्याने केंद्राला काय भूमिका स्पष्ट करावी हे समजेना. दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होणार नाही अशी वक्तव्ये केंद्रातील सत्ताधारी करत असले तरी, नेमकी स्थिती स्पष्ट होत नाही. यातून स्टॅलिन भाजपला आव्हान देत आहेत. राज्यावर असलेली त्यांची हुकूमत पाहता इंडिया आघाडीतील घटक पक्षही आपसूकच स्टॅलिन यांची पाठराखण करत आहेत. यातून २०२६च्या विधानसभा निवडणुकीचे पारडे त्यांनी आपल्या बाजूने फिरवले. यामुळेच विरोधकांची इंडिया आघाडी सध्या अस्तित्वात आहे की नाही याची चर्चा सुरू असताना स्टॅलिन यांनी मात्र भाजपविरोधात देशव्यापी प्रमुख चेहरा अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले.

Story img Loader