तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी तिरुवल्लुवर दिनानिमित्त समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे तेथे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तिरुवल्लुवर हे एक तत्त्वज्ञ आणि कवी होते. तमिळनाडूमध्ये त्यांना फार मानाचे आणि आदराचे स्थान आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठीच आर. एन. रवी यांनी हा फोटो शेअर केला होता. मात्र, त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तिरुवल्लुवर यांचे भगवीकरण केले जात आहे, असा आरोप डीएमकेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर तिरुवल्लुवर कोण होते? डीएमकेने नेमका काय आक्षेप घेतला? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..

आर. एन. रवी यांच्या पोस्टवर आक्षेप का?

आर. एन. रवी यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर डीएमकेने आक्षेप घेतला आहे. तिरुवल्लुवर यांचे भगवीकरण केले जात आहे, असे डीएमकेने म्हटले जात आहे. रवी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिरुवल्लुवर यांनी भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच तिरुवल्लुवर यांचे कपाळ आणि दंडावर भस्म लावलेले तसेच त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ दाखवण्यात आली आहे. याच कारणामुळे डीएमकेने रवी यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर आक्षेप घेतला. डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनीदेखील तिरुवल्लुवर यांना अभिवादन करण्यासाठी समाजमाध्यमांवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मात्र तिरुवल्लुवर हे पांढऱ्या शुभ्र वस्त्रांत दाखवण्यात आले आहेत. स्टॅलिन यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिरुवल्लुवर यांच्या गळ्यात माळ नाहीये तसेच दंडावर भस्म लावलेले नाही.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी

“तिरुवल्लुवर हे धर्माच्या पलीकडे”

डीएमकेच्या नेत्या कनिमोझी यांनीदेखील राज्यपाल रवी यांच्यावर टीका केली आहे. “तिरुवल्लुवर हे कोणत्याही एका धर्माची ओळख नाहीत. त्यांच्यावर सनातन किंवा हिंदूत्वाचे प्रतीक असलेले किंवा कोणत्याही धर्माचे चिन्ह लादता येणार नाही. आपल्याला हे समजणे गरजेचे आहे. तिरुवल्लुवर हे धर्माच्या पलीकडे आहेत, ते मानवतावादावर बोलतात”, असे कनिमोझी म्हणाल्या. तिरुवल्लुवर यांना दाखवण्यात आलेल्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे याआधीही अनेकवेळा वाद झालेला आहे. राजकारणातही या मुद्द्यामुळे मतभेद आहेत.

तिरुवल्लुवर कोण आहेत?

तिरुवल्लुवर यांचे तमिळनाडूमध्ये वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे. ते कोणत्या कालखंडातील आहेत, हे नेमके सांगणे कठीण आहे. मात्र, तिरुवल्लुवर ख्रिस्तपूर्व ५ व्या शतकातील आहेत, असे सांगितले जाते. त्यांना लोक प्रेमाने, आस्थेने वाल्लूवार असेही म्हणतात. त्यांनी तिरुक्कूरल नावाने काव्यरचना केली होती. तिरुक्कूरलमध्ये एकूण १३३० काव्यरचना आहेत. ज्या पद्धतीने उत्तर भारतात हिंदू घरांमध्ये भगवद्गितेला मानाचे स्थान आहे, अगदी त्याच पद्धतीने तिरुवल्लुवर यांनी लिहिलेल्या तिरुक्कूरल काव्यरचनेला तमिळनाडूमध्ये प्रत्येक घरात फार आदराचे स्थान दिले जाते.

तिरुवल्लुवर यांना अत्यंत मानाचे स्थान

तमिळनाडूमध्ये प्रत्येक धर्मात तिरुवल्लुवर यांना प्राचीन संत, कवी, तत्वज्ज्ञ म्हणून अत्यंत मानाचे स्थान दिले जाते. तिरुवल्लुवर यांनी त्यांच्या काव्यरचनेच्या माध्यमातून जी शिकवण दिलेली आहे, त्या शिकवणीचे तमिळनाडूमध्ये पालन केले जाते. २०२० सालचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिरुवल्लुवर यांनीच लिहिलेल्या काव्यातील काही ओळी उद्धृत केल्या होत्या.

तिरुवल्लुवर यांच्या कपड्यांच्या रंगाला एवढे महत्त्व का?

तिरुवल्लुवर यांच्याविषयी अधिक ऐतिहासिक माहिती नसतानाही राजकीय पक्षांनी त्यांच्याबाबत तसेच त्यांच्या कपड्यांबाबत आपल्या सोईनुसार तर्क लावलेले आहेत. तिरुवल्लुवर आयआयटीचे प्राध्यापक एस. स्वामीनाथन यांनी अधिक माहिती दिली. “तिरुवल्लुवर यांच्याविषयी जे काही छोटे-मोठे पुरावे उपलब्ध आहेत, त्यानुसार ते जैन धर्मीय होते. ते हिंदूही नव्हते आणि द्रविडीयनही नव्हते असा तर्क या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लावलेला आहे. आपण फक्त एवढेच निश्चितपणे सांगू शकतो की, त्यांनी लिहिलेल्या साहित्याला भारतीय इतिहासातील तसेच प्राचीन इतिहासातील कोणत्याही साहित्याशी तुलना करता येणार नाही”, असे स्वामीनाथन यांनी सांगितले.

शेकडो वर्षांनंतर निर्माण केली प्रतिमा?

“तिरुवल्लुवर यांचे पांढऱ्या वस्त्रातील फोटो ही एक कल्पनाच आहे. पूर्वी तिरुवल्लुवर यांचा कोणताही फोटो किंवा प्रतिमा उपलब्ध नव्हती. तिरुवल्लुवर हे काव्य लिहिणारी एकच व्यक्ती होती की अनेक वर्षे मिळून अनेकांनी ते काव्य लिहिलेले आहे, याचीही स्पष्ट माहिती नाही. येशू ख्रिस्ताची ज्याप्रमाणे प्रतिमा तयार करण्यात आली, त्याच पद्धतीने तिरुवल्लुवर यांचीदेखील त्यांच्या निधनाच्या शेकडो वर्षांनंतर एक प्रतिमा निर्माण करण्यात आली”, असे स्वामीनाथन यांनी सांगितले.

भाजपाचे नेते एच. राजा काय म्हणाले होते?

तिरुवल्लुवर यांच्याबाबत २०१९ साली भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस एच. राजा यांनी इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया दिली होती. द्रविडीयन राजकीय पक्ष यांचा देवावर विश्वास नसतो. त्यांनी तिरुवल्लुवर यांच्या चित्रणातून हिंदूंची चिन्हे काढून टाकली होती, असे तेव्हा एच. राजा म्हणाले होते. “तिरुवल्लुवर यांच्या मूळ चित्रणात विभुती होती. तसेच सर्व हिंदू चिन्हे होती. द्रविड कळघम आणि डीएमके पक्षाने राजकीय हितासाठी तिरुवल्लुवर यांच्या चित्रणात बदल केला”, असे राजा म्हणाले होते. तिरुवल्लुवर यांचे श्लोक आणि जीवन हे सनातन धर्माप्रमाणेच होते, असेही तेव्हा राजा म्हणाले होते.

राज्यपालांच्या पोस्टवर कनिमोझी काय म्हणाल्या?

तर दुसरीकडे सध्या राज्यपालांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टवर बोलताना डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपालांच्या पोस्टमधून त्यांना तिरुवल्लुवर तसेच तिरुकुरलबद्दल मूळ समज नाही हेच दिसते, असे कनिमोझी म्हणाल्या.” तिरुवल्लुवर संत होते, असे कोणीही म्हणालेले नाही. त्यांनी लग्न केलेले होते, असे म्हटले जाते. गृहस्ती जीवनाबद्दल त्यांच्याइतके सुंदर आणि काव्यात्मक पद्धतीने दुसऱ्या कोणीही लिहिलेले नाही. आम्हा तमिळ लोकांना हे काव्य वाचण्याची संधी मिळालेली आहे. आम्ही त्यांना कधीही संत म्हणून पाहिलेले नाही”, असे कनिमोझी म्हणाल्या.

तिरुवल्लुवर यांना आज एवढे महत्त्व का?

मदुराईजवळील किलाडी येथे नुकतेच एक उत्खनन झाले. या उत्खननात संगम युगाचे तसेच ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपर्यंतची माहिती मिळेल असे पुरावे आढळले आहेत. या उत्खननात सापडलेल्या पुराव्यांच्या रुपाने इतिहासकार आणि राजकीय नेत्यांना वेगवेगळे दावे करण्याची एक संधी मिळालेली आहे.

द्रविडीयन, हिंदुत्ववाद्यांत वाद

याच पार्श्वभूमीवर तिरुवल्लुवर हे सनातन धर्माशी निगडित होते असा दावा केला जातोय. किलाडी येथील उत्खननानंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळे दावे करण्यात आले. समाजमाध्यमांवर द्रविडियन विचार मांडणारे तसेच हिंदुत्ववादी विचार मांडणाऱ्यांत वाद सुरू झाले आहेत. किलाडी येथे हिंदू देवता किंवा हिंदू मूर्ती सापडलेल्या नाहीत. त्यामुळे द्रविडीयन विचारधारा मांडणारे आपली बाजू अधिक ताकदीने मांडत आहेत, तर हिंदुत्त्ववादी विचार मांडणारे किलाडी येथे हिंदू धर्माविषयी पुरावे आढळल्याचा दावा करत आहेत.