Harappan Script Challenges: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीची लिपी उलगडण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. सिंधू संस्कृतीच्या शोधाला अलीकडेच १०० वर्षे पूर्ण झाली. सिंधू संस्कृतीची लिपी हे आजतागायत न उलगडलेलं कोडंच आहे. जगभरातील पुरातत्त्वज्ञ, तामिळ भाषातज्ज्ञ, विद्वान आणि इतर अनेकजण गेल्या १०० वर्षांपासून न सुटलेल्या या सिंधूच्या कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी आजही अथक प्रयत्न करत आहेत. अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंधूच्या लिपीचा उलगडा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना १० लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹८.५७ कोटी) इतके बक्षीस दिले जाईल असे एम. के. स्टॅलिन यांनी जाहीर केले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने चेन्नई येथे आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ही घोषणा केली. त्याच पार्श्वभूमीवर हडप्पाकालीन लिपी उलगडणं इतकं कठीण का आहे, याचाच घेतलेला हा आढावा.
अधिक वाचा: हडप्पा ते चोल कालखंड: भारतीय शिल्पकृती इतिहास कसा उलगडतात?
एखादी लिपी उलगडण्यासाठी खालील समस्या क्रमवार सोडवाव्या लागतात असं इटालियन भाषातज्ज्ञ फॅबिओ टॅम्बुरिनी यांनी (२०२३) लिहिलं आहे (“Decipherment of Lost Ancient Scripts as Combinatorial Optimisation using Coupled Simulated Annealing”). एखाद्या चिन्हसमूहाचा खरंच लेखन प्रणालीशी संबंध आहे का, हे ठरवणं, चिन्हांचा प्रवाह वेगळा करून त्यातील प्रत्येक चिन्ह वेगवेगळं ओळखण्यासाठी योग्य पद्धती ठरवणं, एका चिन्हाचे विविध प्रकार (उदा. मुद्रित ‘a’ आणि हस्तलिखित ‘a’) ओळखून, लेखन प्रणालीसाठी आवश्यक किमान चिन्हांचा समूह तयार करणं म्हणजे अक्षरमाला, अक्षरगण किंवा चिन्हांचा संग्रह तयार करणं, प्रत्येक चिन्हाला त्याचं विशिष्ट मूल्य जसं की ध्वनी किंवा इतर अर्थ प्रदान करणं, या मूल्यांना एखाद्या विशिष्ट भाषेशी जुळवण्याचा प्रयत्न करणं. या समस्या क्रमवार सोडवाव्या लागतात
सिंधु लिपीच्या बाबतीत विद्वानांना या उपसमस्या सोडवण्यात अनेक अडचणी आल्या आहेत. यासाठी तीन प्रमुख कारणं आहेत.
१. बहुभाषक शिलालेखांचा अभाव:
अज्ञात लिपी उलगडण्यासाठी सर्वात उपयुक्त असलेली गोष्ट म्हणजे ज्ञात लिपींशी थेट तुलना करणे. हे दोन किंवा अधिक लिपींचा समान मजकूर असलेल्या बहुभाषक शिलालेखांमुळे शक्य होतं. सिंधु संस्कृतीचे समकालीन असलेल्या मेसोपोटेमियन संस्कृतीशी उत्तम व्यापारी संबंध होते. मेसोपोटेमियन क्यूनिफॉर्म लिपी १९ व्या शतकाच्या सुरुवातीला उलगडली. परंतु अद्याप पर्यंत कोणताही बहुभाषक शिलालेख सापडलेला नाही. सर्वात प्रसिद्ध बहुभाषक शिलालेख म्हणजे रोझेटा स्टोन. या शिलालेखात इसवी सनपूर्व १९६ मध्ये टॉलेमी पाचव्या याच्या कारकिर्दीत जारी केलेला आदेश ग्रीक, डेमोटिक (प्राचीन मिसरमधील नंतरची लिपी) आणि चित्रलिपी (हायेरोग्लिफ्स) या तीन लिपींमध्ये कोरलेला आहे. हा शिलालेख १८२० च्या दशकात फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ जीन-फ्रान्स्वा शांपोलियन यांच्या माध्यमातून प्राचीन इजिप्तच्या चित्रलिपी उलगडण्यासाठी महत्त्वाचा ठरला होता.
२. अज्ञात भाषा:
अज्ञात लिपी किंवा भाषा या तीन मूलभूत श्रेणींमध्ये मोडतात, असं ‘Lost Languages: The Enigma of the World’s Undeciphered Scripts (2008)’ चे लेखक अँड्र्यू रॉबिन्सन यांनी म्हटलं आहे. या तीन श्रेणींमध्ये ज्ञात भाषा अज्ञात लिपीत लिहिली जाते.
अज्ञात भाषा ज्ञात लिपीत लिहिली जाते, अज्ञात भाषा अज्ञात लिपीत लिहिली जाते.
या श्रेणींपैकी तिसरी श्रेणी उलगडण्यासाठी सर्वात आव्हानात्मक आहे. कारण ती विद्वानांना संदर्भ घेण्यासाठी अत्यल्प आधार प्रदान करते. सिंधु लिपी या श्रेणीत येते. या लिपीने वेगवेगळ्या भाषांचे प्रतिनिधित्व केल्याचे विविध तर्क विद्वानांनी मांडलेले असले तरी या वादाला निर्णायक पुरावा मिळालेला नाही. लिपीने कोणती भाषा दर्शवली आहे हे समजल्याशिवाय विद्वानांना लिपीच्या चिन्हांना ध्वनी प्रदान करण्यात खूप अडचणी आहेत.
३. संस्कृतीबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे:
ज्या लिपीबद्दल माहिती देणारे जास्तीत जास्त पुरावे, शिलालेख उपलब्ध असतात. ती लिपी उलगडण्याची शक्यता जास्त असते. याचे कारण असे की, प्रत्येक वेगळी वस्तू आणि ती सापडलेल्या परिस्थितीमुळे त्या लिपीबद्दल काही माहिती मिळू शकते. आतापर्यंत सुमारे ३,५०० मुद्रांची ओळख पटवण्यात आलेली आहे. परंतु प्रत्येक मुद्रेवर सरासरी फक्त पाचच अक्षरे कोरलेली असल्यामुळे, विद्वानांकडे पुरेसं साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे ते सखोल विश्लेषण करू शकत नाहीत. यात आणखी भर म्हणजे मेसोपोटेमिया आणि इजिप्तसारख्या समकालीन प्राचीन संस्कृतींच्या तुलनेत सिंधु संस्कृतीबद्दल खूपच कमी माहिती ज्ञात आहे. अनेक हडप्पा स्थळे अद्याप सापडायची आहेत आणि जी स्थळे शोधण्यात आली आहेत त्यावरही पुरेसे संशोधन करण्यात आलेले नाही.
माहितीच्या या सर्वसाधारण अभावामुळे सिंधु लिपी उलगडणे कठीण झाले आहे. भाषातज्ज्ञ, शिलालेख अभ्यासक आणि भाषातज्ज्ञांना लेखन प्रणाली समजून घेण्यासाठी अधिक संधी मिळावी यासाठी बरीच अधिक पुरातत्वीय सर्वेक्षण आणि संशोधन करावे लागणार आहे.