Tamil Nadu CM Stalin offers $1 million prize for deciphering Indus Valley script: सिंधू संस्कृतीच्या शोधाला अलीकडेच १०० वर्षे पूर्ण झाली. असे असले तरी सिंधू संस्कृतीची लिपी हे आजतागायत न उलगडलेलं कोडंच आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीची लिपी उलगडण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. स्टॅलिन म्हणाले की, १९२४ साली सर जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीच्या (IVC) शोधाची घोषणा केली होती. हा शोध भारतीय उपखंडाच्या शोधात एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता. या शोधामुळे या देशाच्या भूतकाळाविषयी असलेल्या अनेक समजुतींना यशस्वी छेद गेला. पूर्वी आर्य आणि संस्कृत हीच भारतीय संस्कृतीची मूळं असल्याचे मानले जात होते आणि त्याच अनुषंगाने इतिहासही मांडला जात होता. परंतु जॉन मार्शल यांच्या संशोधनाने हे समीकरण बदलले, असे मत तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने चेन्नई येथे आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, किंबहुना सिंधू संस्कृती ही आर्यांपूर्वीची होती. त्यामुळे त्यांची बोली भाषा द्रविडी असण्याची शक्यता अधिक आहे, या गोष्टीला आता अधिक बळकटी मिळाली आहे. तामिळनाडूमध्ये ‘आरियम’ हा शब्द ‘आर्यन’ या नावाचा संदर्भ देतो. या शब्दाला भाषिक अर्थही असू शकतो. काही लोक या शब्दाकडे वांशिक ओळख म्हणून देखील पाहतात.

सिंधू संस्कृती आणि द्रविड संस्कृतीचे प्रतीक

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सिंधू संस्कृती ही पूर्ण विकसित होती. या संस्कृतीत बैलांना महत्त्व होते. बैल हे द्रविड संस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करतात. सिंधू संस्कृतीतपासून प्राचीन तामिळ साहित्यात दिसणाऱ्या तामिळ सांस्कृतिक परंपरेत बैलांचा वावर सतत आढळतो आणि तो आजही टिकून आहे. याचे उदाहरण म्हणजे ‘अळंगनल्लूर’ असे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले (अळंगनल्लूर हे मदुराईतील प्रसिद्ध ठिकाण आहे. जिथे जल्लिकट्टू ही बैलांची स्पर्धा आयोजित केली जाते). दुसऱ्या बाजूला सिंधू संस्कृतीत घोड्याचे प्रतीक किंवा चिन्ह आढळत नाही.

highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
what is sham marriage
‘Sham Marriage’मुळे सरकार चिंतेत; सिंगापूरमध्ये वाढणारा लग्नाचा हा ट्रेंड काय आहे?
Loksatta editorial on Rivalry in many districts for the post of Guardian Minister Cabinet
अग्रलेख: मारक पालक नकोत!
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Ancient Egypt’s Worship of Buddha and Hindu Deities
Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?
Murder of young journalist Mukesh Chandrakar
सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांचा जीव…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
फोटो सौजन्य: विकिपीडिया

स्टॅलिन म्हणाले, “वैदिक साहित्यामध्ये मोठ्या शहरांचा उल्लेख नाही आणि तिथे मातृदेवीची उपासनादेखील नव्हती. मात्र या दोन्ही गोष्टी सिंधू संस्कृतीत आणि तामिळनाडूमधील कीळडी येथे आढळल्या आहेत. यावरून असे सिद्ध झाले आहे की, सिंधू संस्कृती ही संगम युगातील तामिळ लोकांच्या पूर्वजांची भूमी होती.” स्टॅलिन पुढे म्हणाले की, एकेकाळी भरभराट झालेल्या सिंधू संस्कृतीच्या लेखन प्रणालीचा अद्याप स्पष्टपणे अंदाज लावता आलेला नाही. जगभरातील पुरातत्त्वज्ञ, तामिळ भाषातज्ज्ञ, विद्वान आणि इतर अनेकजण गेल्या १०० वर्षांपासून न सुटलेल्या या सिंधूच्या कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी आजही अथक प्रयत्न करत आहेत. अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंधूच्या लिपीचा उलगडा करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना १० लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹८.५७ कोटी) इतके बक्षीस दिले जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधू संस्कृतीची लिपी आणि ती उलगडण्याचा प्रयत्न याचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

भारतीयांना किमान ५००० वर्षांपासून लेखनकला अवगत होती, हे सिंधू संस्कृतीच्या शोधाच्या निमित्ताने उघड झाले. सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील लिपी ‘सिंधू, मोहेंजोदडो किंवा हडप्पा लिपी’ म्हणून ओळखली जाते. सिंधू लिपी इसवी सनपूर्व ३५०० ते २७०० या कालखंडात विकसित झाल्याचे बहुतांश अभ्यासक मानतात. उत्खननात सापडलेल्या हडप्पाकालीन मृण्मय मुद्रा, मातीची भांडी यांसारख्या अनेक वस्तूंवर ही लिपी कोरलेली आढळते; तरी या लिपीचा नेमका उगम कुठे व कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या लिपीचा उलगडा करत असताना वेगवगेळ्या अभ्यासकांनी काही महत्त्वाचे तर्क मांडले आहेत. परंतु या संदर्भात अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नाही.

सिंधू लिपीच्या व्युत्पत्तीची गृहितकं

भारतीय पुरातत्त्व विभागाचे पहिले संचालक सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना हडप्पा येथे पहिली मुद्रा सापडली होती. या मुद्रेवर हडप्पाकालीन लिपी किंवा चिन्हं होती. या मुद्रेवर दक्षिण आणि आग्नेय आशियातील २०० पेक्षा अधिक लिपींची पूर्वज असलेली ब्राह्मी लिपीतील चिन्हे आहेत असे मत कनिंगहॅम यांनी व्यक्त केले होते. कनिंगहॅमनंतर इतर अनेक विद्वानांनीही सिंधू लिपी ब्राह्मीशी जोडण्याच्या बाजूने युक्तिवाद केला होता. पुरातत्वशास्त्रज्ञ एस. आर. राव आणि इतर काही अभ्यासकांनी सिंधू लिपी संस्कृतशी संबंधित असल्याचा युक्तिवाद केला आहे. तर आस्को पारपोला सारख्या अभ्यासकांनी या लिपीचा संबंध द्रविडियन संस्कृतीशी जोडला आहे.

पिक्टोग्राफिक लिपी

याशिवाय सिंधू लिपीला इतर संस्कृतींशी जोडण्याचा प्रयत्नही झाला आहे. एल. ए. वॅडेल यांनी या लिपीचा सुमेरियन लिपिशी संबध जोडला होता. १९३२ साली इजिप्टॉलॉजिस्ट सर फ्लिंडर्स पेट्री यांनी सिंधू लिपी ही इजिप्तच्या पिक्टोग्राफिक लिपीप्रमाणे हाताळली जावी असे नमूद केले होते. १९८७ साली ॲसिरिओलॉजिस्ट जे. व्ही. किनियर विल्सन यांनी सिंधू खोरे आणि मेसोपोटेमिया यांच्यातील संबंधांवरून युक्तिवाद केला होता. त्यामुळे या लिपीचा उलगडा होण्याऐवजी हे प्रकरण अधिकच क्लिष्ट झाले आहे.

संरचित लेखन प्रणालीचे सूचन

सिंधू लिपीत प्रामुख्याने लघुचिन्हांच्या मालिकेचा समावेश होतो. ही लघुचिन्हे मृण्मय मुद्रा, मातीची भांडी, पट्ट्या आणि अन्य वस्तूंवर कोरलेली आढळतात. पुरातत्त्वज्ञांना ४००० हून अधिक अशा कोरलेल्या वस्तू सापडल्या असून त्यावर सुमारे ४०० ते ६०० वेगवेगळी चिन्हे आहेत. या चिन्हांमध्ये पुनरावृत्ती दिसून येते. त्यामुळे ही पद्धत एका संरचित लेखन प्रणालीचे सूचक असल्याचे दिसून येते असे मत अभ्यासक व्यक्त करतात. या लिपीतील कोरीव लेख अत्यंत लहान असून त्यामध्ये सहसा पाच ते सहा चिन्हे असतात. त्यामुळे या चिन्हांचा अर्थ उलगडणे कठीण झाले आहे. तसेच इजिप्शियन हायेरोग्लिफ्ससाठी असलेल्या रोसेटा स्टोनसारखा ओळखीचा द्विभाषिक ग्रंथ नसल्यामुळे लिपी समजून घेण्याचे प्रयत्न आणखी कठीण ठरले आहेत.

फोटो सौजन्य: विकिपीडिया

सिंधू लिपीवरील प्रमुख सिद्धांत-

भाषाशास्त्रीय सिद्धांत

या सिद्धांताचे समर्थक सिंधू लिपी ही एक भाषाशास्त्रीय लेखन प्रणाली असल्याचा दावा करतात. या पद्धतीत बोली भाषा अक्षरांकित केली जाते. या प्रणालीचा उद्देश भाषेतील अर्थ अचूकपणे व्यक्त करणे आणि संवादाची प्रक्रिया लेखन स्वरूपात आणणे हा असतो. या सिद्धांताचे समर्थन करणारे अभ्यासक या लिपीची तुलना क्यूनिफॉर्म आणि हायेरोग्लिफ्स यांसारख्या अन्य प्राचीन लेखन पद्धतींबरोबर करतात. हा सिद्धांत मान्य असणाऱ्या अभ्यासकांचे प्रामुख्याने दोन गट पडतात. पहिल्या गटात द्रविडीय सिद्धांत मानणाऱ्या अभ्यासकांचा समावेश होतो. इरावतम महादेवन आणि अस्को पारपोला यांसारख्या संशोधकांनी सिंधू लिपी ही द्रविडी भाषेचे एक आद्य स्वरूप असल्याचे मत मांडले आहे. द्रविडीय सिद्धांत संरचनात्मक साम्य आणि सांस्कृतिक अवशेषांच्या आधारे लिपीला प्रोटो-तामिळ किंवा संबंधित भाषांशी जोडतो. तर दुसऱ्या गटात इंडो-आर्यन सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्या अभ्यासकांचा समावेश होतो. हे अभ्यासक या लिपीमध्ये इंडो-आर्यन भाषेच्या एका आद्य स्वरूपाचे अक्षरांकन करण्यात आल्याचे मानतात. हा दृष्टिकोन वादग्रस्त आर्य स्थलांतरण सिद्धांताशी सुसंगत आहे.आर्य स्थलांतरण सिद्धांतानुसार सुमारे इसवी सनपूर्व १५०० मध्ये इंडो-आर्य भाषिक भारतीय उपखंडात स्थलांतरित झाले होते.

गैर-भाषाशास्त्रीय सिद्धांत- चिन्हांचा वापर

या सिद्धांतानुसार सिंधू लिपी ही प्रोटो-लिपी म्हणून कार्य करते. हा सिद्धांत लघु कोरीव लेखांवर आणि त्यांच्या प्रशासकीय किंवा धार्मिक संदर्भांतील वापरावर भर देतो. या सिद्धांतानुसार ही चिन्हे आर्थिक व्यवहार, धार्मिक संकल्पना किंवा जमातींच्या ओळखीचे प्रतिनिधित्व करू शकतात.

लोगोग्राफिक आणि सिलॅबिक सिद्धांत

काही विद्वान असे सुचवतात की, सिंधू लिपीमध्ये लोगोग्राफिक आणि सिलॅबिक चिन्हांचा समावेश आहे. लोगोग्राम हे संपूर्ण शब्द किंवा कल्पना दर्शवतात तर सिलॅबिक चिन्हे ध्वनींचे संहितांकन करतात. या संमिश्र सिद्धांताचे समर्थक कोरीव लेखांमधील संरचनात्मक नमुन्यांकडे निर्देश करतात.

अधिक वाचा: सिंधू लिपीचा द्रविडीयन लिपीशी संबंध आहे का? काय सांगते नवीन संशोधन?

सिंधू लिपीशी संबंधित वाद

भाषाशास्त्रीय की गैर-भाषाशास्त्रीय स्वरूप

सिंधू लिपी ही भाषाशास्त्रीय लेखन प्रणालीचे प्रतिनिधित्व करते की नाही हा एक महत्त्वाचा वादाचा विषय आहे. भाषाशास्त्रीय सिद्धांताच्या टीकाकारांचे मत असे की, लिपीची लघुता आणि पुनरावृत्तीचे स्वरूप हे गैर-भाषाशास्त्रीय चिन्हांशी अधिक सुसंगत आहे. दुसरीकडे, भाषाशास्त्रीय सिद्धांताचे समर्थक या लिपीतील व्याकरणीय नियमांशी जुळणाऱ्या संरचनात्मक नमुन्यांकडे लक्ष वेधतात.

आधुनिक भाषांशी संबंध

सिंधू लिपीचा तामिळ किंवा संस्कृत यांसारख्या आधुनिक भाषांशी संबंध आहे का हा वादग्रस्त विषय आहे. हा वाद भारतीय संस्कृतीच्या उगमावरील व्यापक विचारसरणीशी जोडलेला आहे. द्रविडीय सिद्धांत सिंधू संस्कृतीच्या स्थानिक उगमाच्या दाव्यांशी सहसा सुसंगत असतो तर इंडो-आर्यन सिद्धांत कधीकधी राष्ट्रवादी कथनांशी संबंधित मानला जातो.

सांख्यिकीय विश्लेषण

अलीकडील अभ्यासात संगणकीय मॉडेल्स आणि सांख्यिकीय विश्लेषणांचा वापर करण्यात आला आहे. त्यांनी या वादाला अधिक तीव्रता प्राप्त झाली आहे. काही विश्लेषणांमधून असे सूचित होते की, लिपीतील चिन्हे भाषाशास्त्रीय लिपीच्या वैशिष्ट्यांसारखी आहेत. परंतु, टीकाकारांचे म्हणणे आहे की, असे नमुने गैर-भाषाशास्त्रीय प्रणालींमध्येही दिसून येऊ शकतात.

फोटो सौजन्य: विकिपीडिया

बंगळुरूस्थित एका सॉफ्टवेअर अभियंत्याने अलीकडेच प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात या लिपी संदर्भात नवीन संशोधन मांडले आहे. या शोध निबंधात नमूद केल्याप्रमाणे सिंधू लिपीत वेगवेगळ्या चिन्हांचा समावेश आहे. सिंधूकालीन वसाहतींमध्ये वेगवगेळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता, पुरातत्त्वीय सर्वेक्षणात सापडलेल्या या प्रतिकात्मक चिन्हांच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद साधला जात होता, असा तर्क या संशोधनात मांडण्यात आला आहे. बहता अनसुमाली मुखोपाध्याय या २०१४ पासून सिंधू लिपीवर संशोधन करत आहेत. त्यांनीही संगणकीय मॉडेल्सचा वापर केला आहे. त्यांच्या संशोधानुसार प्रत्येक सिंधूकालीन चिन्ह विशिष्ट अर्थ दर्शविते आणि ही लिपी प्रामुख्याने व्यावसायिक हेतूंसाठी वापरली गेली. नेचर ग्रुप ऑफ जर्नल – ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस कम्युनिकेशन्स, खंड १०, लेख क्रमांक: ९७२ (२०२३) मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या शोधनिबंधात मुखोपाध्याय स्पष्ट करतात की, चिन्ह कोरलेले सिंधू सील/ मुद्रा प्रामुख्याने टॅक्स स्टॅम्प म्हणून वापरली जात होती, तर टॅब्लेटचा वापर कर संकलन, हस्तकला किंवा व्यापार परवाना म्हणून केला जात होता.

लिपी उलगडण्यातील मुख्य अडचणी

रोसेटा स्टोनचा अभाव

द्विभाषिक ग्रंथाचा अभाव हा सिंधू लिपी उलगडण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. ज्ञात भाषेशी तुलना करता न आल्यामुळे संशोधकांना चिन्हांना ध्वन्यात्मक किंवा सांकेतिक मूल्ये देणे कठीण जाते.

मर्यादित संहिता

लघु आणि तुलनेने कमी प्रमाणात कोरलेल्या लेखनामुळे, तुलनात्मक विश्लेषणासाठी मर्यादा येतात. हे इजिप्शियन हायरोग्लिफ्स किंवा मेसोपोटामियन क्यूनिफॉर्मसारख्या इतर प्राचीन लिपींशी तुलना केल्यास स्पष्ट होते. जिथे विपुल प्रमाणात ग्रंथसंग्रह उपलब्ध आहेत.

अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?

संदर्भातील अनिश्चितता

कोरीव लेखांचा संदर्भ अनेकदा अस्पष्ट असतो. त्यामुळे त्याचा हेतू समजून घेणे कठीण होते. बरेचशी चिन्हे ही शिक्के किंवा मातीच्या भांड्यांवर दिसतात. जी कदाचित मालकी, व्यापारी वस्तू किंवा धार्मिक विधींचे प्रतिनिधित्त्व करत असण्याची शक्यता आहे.

अलीकडील प्रगती आणि तांत्रिक प्रगती

संगणकीय भाषाशास्त्र आणि मशीन लर्निंगमधील प्रगतीमुळे सिंधू लिपीचा अभ्यास करण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत. अल्गोरिदम कोरीव लेखांमधील नमुने आणि परस्परसंबंध ओळखू शकतात. ज्यामुळे त्याच्या रचनेवर आणि संभाव्य अर्थावर प्रकाश टाकता येतो. तसेच, 3D प्रतिमा आणि वस्तूंवर रासायनिक विश्लेषण केल्यामुळे लिपीच्या वापराबद्दल अधिक संदर्भ मिळतो.

सिंधू लिपीचे व्यापक परिणाम

सिंधू लिपी ही केवळ भाषाशास्त्रज्ञ आणि पुरातत्त्वज्ञांसाठी एक कोडे नाही, तर ती मानवी इतिहास आणि सांस्कृतिक उत्क्रांती समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. लिपी उलगडल्यामुळे सिंधू संस्कृतीतील सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक प्रथांबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते.

Story img Loader