सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आतापर्यंत विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांविरोधात कारवाई केली आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतील बड्या नेत्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांत ईडीकडून चौकशी सुरू आहे. असे असतानाच तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे नेते आणि ऊर्जा तसेच उत्पादन शुल्कमंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेची कारवाई केली आहे. अटक आणि चौकशीदरम्यान बालाजी यांना थेट रडू कोसळले. प्रकृती बिघडल्यामुळे सेंथिल यांना रुग्णालयातही दाखल करावे लागले. या सर्व घडामोडींमुळे बालाजी यांच्यावरील कारवाई देशभरात चर्चेचा विषय ठरली. याच पार्श्वभूमीवर सेंथिल यांच्यावर कोणते आरोप आहेत? व्ही. सेंथिल बालाजी यांचे तामिळनाडूत राजकीय वजन किती आहे? त्यांच्या अटकेनंतर डीएमके पक्षाने काय भूमिका घेतली? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालाजी यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीने बुधवारी (१४ जून) अटकेची कारवाई केली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने मंगळवारी (१३ जून) बालाजी यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. नोकऱ्यांच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीने बालाजी यांना अटक करताना सचिवालयातील त्यांचे कार्यालय, बालाजी यांच्या बंधूंचे निवासस्थान, चेन्नई तसेच कारूर येथील अनेक ठिकाणांवर छापा टाकला.

हेही वाचा >>> लव्ह जिहाद प्रकरणावरून मुस्लीम नागरिकांना राज्याबाहेर हुसकावण्याचा प्रयत्न; उत्तराखंडमधील राजकारण का तापले?

बालाजी यांना रडू कोसळले, रुग्णालयात केले दाखल

चौकशीदरम्यान बालाजी यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या वेळी त्यांची प्रकृती अचानकपणे बिघडली. त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. या वेळीच ते डोक्यावर हात ठेवून रडत होते. त्यानंतर तामिळनाडूमध्ये खरा ड्रामा सुरू झाला. हा सर्व प्रकार घडत असताना दुसरीकडे त्यांचे समर्थक ईडी तसेच केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले होते. त्यांच्यावर सध्या चेन्नईतल्या ओमंदुरार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालाजी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डीएमकेच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. यामध्ये युवक कल्याण आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, आरोग्यमंत्री एम. सुब्रमणियन, सार्वजनिक कल्याण विभागाचे मंत्री ई. व्ही. वेलू, कायदामंत्री एस. रेगुपाथी आदी नेत्यांचा समावेश होता. मात्र या मंत्र्यांना बालाजी यांना भेट घेण्याची परवानगी देण्यात आली नाही.

डॉक्टरांना बालाजी यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला

बालाजी यांच्या अटकेवर डीएमकेचे खासदार तथा वकील एन. आर. एलांगो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बालाजी यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोनरी अँजिओग्राम चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्यावर लवकरात लवकर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. तशी माहिती शासकीय रुग्णालयाने दिली आहे,” असे एलांगो यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे ईडीने बालाजी यांना अटक केली आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही. अटकेची कारवाई करताना नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असा दावाही एलांगो यांनी केला.

हेही वाचा >>> विश्लेषण: पश्चिम विदर्भातील खारे पाणी गोड होणार का? नितीन गडकरींचा खारपाणपट्ट्यातील प्रयोग काय आहे?

सेंथिल बालाजी यांच्यावर काय आरोप आहेत?

ईडीने मंगळवारी बालाजी यांच्या घरावर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यांच्यावर नोकरीसाठी रोख रक्कम घेतल्याच्या आरोपप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सरकार असताना २०११ ते २०१६ या काळात बालाजी परिवहनमंत्री होते. या काळात राज्य परिवहन विभागात ‘नोकरीच्या बदल्यात रोख रक्कम’ मागण्यात आली. परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला, असा आरोप केला जातो. २०१४-२०१५ या काळात हा कथित आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला होता. त्यानंतर राज्यात मोठा गहजब उडाला होता.

या प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जात होती. त्यासाठी ईडीने मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात बालाजी यांच्यासह अन्य आरोपींना ईडी समन्स जारी करण्याची परवानगी द्यावी, अशी मद्रास उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती. असे असले तरी न्यायालयाने ईडीला या प्रकरणात चौकशी करण्याची न्यायालयाने मुभा दिली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण: धनाढ्य सौदी अरेबियाची क्रीडाविश्वावर पकड? रोनाल्डो, बेन्झिमाला सौदी लीगची भुरळ का?

बालाजी हे स्टॅलिनचे जवळचे सहकारी

बालाजी हे स्टॅलिन यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. बालाजी यांच्यावर कारवाई केल्यानंतर डीएमके पक्षाचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी रुग्णालयात जाऊन बालाजी यांची भेट घेतली. तसेच चौकशीच्या नावाखाली ईडीकडून नाटक केले जात आहे. ईडीकडून बालाजी यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात आहे. ईडीने बालाजी यांच्यावर दबाव टाकला, परिणामी त्यांच्या छातीत दुखायला लागले, असा आरोप स्टॅलिन यांनी केला. बालाजी यांना तामिळनाडूमध्ये मोठे राजकीय महत्त्व आहे. ते तेथील राजकारणातील एक प्रसिद्ध चेहरा आहेत. गेल्या महिन्यात प्राप्तिकर विभागाने चेन्नई आणि कोईम्बतूर येथे सेंथिल यांच्यासह त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती. मात्र लोकांच्या रोषामुळे प्राप्तिकर विभागाला ही शोधमोहीम थांबवावी लागली होती.

बालाजी सेंथिल यांचा लोकांवर प्रभाव

तेव्हा प्राप्तिकर विभागाच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच बालाजी सेंथिल यांच्या कारूर मतदारसंघात हजारो कार्यकर्ते आयटी विभागाच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. कारूर मतदारसंघात बालाजी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे समर्थक या भागात रक्तदान शिबिरे, रोजगार मेळावे, ई-सेवा केंद्र तसेच अन्य उपक्रम सातत्याने राबवत असतात. त्यामुळे बालाजी यांचा जनसामान्यांवर प्रभाव आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: हरियाणात भाजप-जेजेपी यांच्यात नुसतीच खडाखडी?

सेंथिल बालाजी यांनी चार वेळा निवडणूक जिंकली

४७ वर्षीय सेंथिल बालाजी हे ओबीसी प्रवर्गातील गुंडार समाजातून येतात. गुंडार समाजातील लोक हे प्रामुख्याने गरीब शेतकरीवर्ग म्हणून ओळखले जातात. पश्चिम तामिळनाडू भागात हा समाज आढळतो. बालाजी हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी २००६ साली एआयएडीएमके पक्षाकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. २०११ ते २०१५ या कालावधीत ते जयललिता सरकारच्या काळात मंत्री होते. या काळात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जातो. पुढे सेंथिल यांनी पक्षबदल करीत डीएमके पक्षात प्रवेश केला.

सेंथिल जयललिता यांचे कट्टर समर्थक

एआयएडीएमके पक्षात असताना सेंथिल यांची जयललिता यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. गैरव्यवहाराच्या प्रकरणात जयललिता यांची निर्दोष म्हणून मुक्तता झाल्यानंतर सेंथिल बालाजी यांनी मुंडन केले होते. त्यांनी २०१३ सालच्या ‘अम्मा पाणी’ योजनेत मोलाची भूमिका बजावली होती. या योजनेंतर्गत लोकांना किफायतशीर आणि शुद्ध पाणी देण्यात येत होते. स्टॅलिन सरकारमध्ये ते ऊर्जा आणि उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण: तमिळनाडू भाजपला साथ देईल का?

एआयएडीएमके पक्षात फूट पडल्यानंतर सेंथिल हे शशिकला यांच्या बाजूने

मात्र पुढे सेंथिल बालाजी यांचे जयललिता यांच्याशी मतभेद निर्माण झाले. परिणामी त्यांचे मंत्रिपद गेले. यासह २०१५ साली त्यांना कारूर जिल्हा सचिवपदावरून दूर करण्यात आले. पुढे जयललिता यांच्या मृत्यूनंतर पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी व्ही. के. शशिकला यांना पाठिंबा दिला. २०१८ साली बालाजी सेंथिल यांनी डीएमके पक्षात प्रवेश केला.

बालाजी सेंथिल यांच्या समर्थनार्थ अनेक पक्ष

सेंथिल यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. तसेच भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली. बालाजी हा लढा कायदेशीर मार्गाने लढतील. ते चौकशीला संपूर्ण सहकार्य करत होते. तरीदेखील अशा प्रकारे दीर्घ चौकशी का करण्यात आली. अशा प्रकारे अमानवी पद्धतीने चौकशी करणे योग्य आहे का? असा सवाल स्टॅलिन यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : अतिश्रीमंत व्यक्ती २०२३ मध्ये भारत सोडून जाण्याचा अंदाज; अब्जाधीश देशातून स्थलांतर का करतात?

काँग्रेस तसेच आप पक्षाने ईडीच्या कारवाईला सुडाचे राजकारण म्हटले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास संस्थांचा वापर करण्यात येत आहे, असा दावाही विरोधकांनी केला आहे.

“सेंथिल बालाजी यांच्यावरील कारवाई म्हणजे मोदी सरकारला जे विरोध करतील त्यांचा छळ करणे तसेच सूड उगवणे होय. मात्र विरोधकांपैकी कोणीही याला घाबरणार नाही, ” असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

राघव चड्ढा, सुप्रिया सुळे यांची भाजपावर टीका

आप पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनीदेखील भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली. “भाजपाकडून विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांना असंवैधानिक पद्धतीने लक्ष्य करण्यात आले. आम्ही सर्व जण सेंथिल बालाजी यांच्यासोबत आहोत,” अशी प्रतिक्रिया राघव चड्ढा यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील बालाजी यांच्या अटकेवर आक्षेप व्यक्त केला. मला या अटकेचे नवल वाटले नाही. कारण आतापर्यंत ईडी, सीबीआयने कारवाई केलेल्या नेत्यांपैकी ९५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >>> ब्राह्मणी पितृसत्ताक पद्धतीचा विरोध ते शेतकरी आंदोलन; जॅक डोर्सी, ट्विटरचे विरुद्ध केंद्र सरकारचे आतापर्यंतचे वाद कोणते?

सेंथिल यांनी राजीनामा द्यावा!

दरम्यान, सेंथिल यांच्या अटकेनंतर भाजपानेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. एआयएडीएमके पक्षाने सेंथिल बालाजी यांच्यावर टीका केली आहे. बालाजी यांचे रडणे म्हणजे नक्राश्रू आहेत, असे एआयएडीएमके पक्षाचे सरचिटणीस इदाप्पडी के. पलानिस्वामी म्हणाले आहेत. “आमचे नेते आणि माजी मंत्री जयकुमार यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. ते २० दिवस तुरुंगात होते. त्यांना त्या काळात औषधं घेण्याचीही परवानगी नव्हती. सेंथिल बालाजी मात्र नाटक करत आहेत. त्यांनी नैतिकता म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी पलानिस्वामी यांनी केली आहे.