भारतीय सैन्यातील जवानाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये हा जवान त्याच्या पत्नीला मारहाण झाल्याचा दावा करत होता. तसेच माझ्या पत्नीला अर्धनग्न करत तिच्यावर साधारण १०० लोकांनी हल्ला केला आहे, असा दावा हा जवान करताना दिसत होता. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये जवान हात जोडून कुटुंबाला वाचवण्याचे आणि मदतीचे आवाहन करत होता. याच कारणामुळे हा हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले. या प्रकरणाची दखल थेट भारतीय लष्कर तसेच पोलीस प्रशासनानेदेखील घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जवानाने तसेच त्याच्या पत्नीने नेमका काय आरोप केला आहे? या आरोपात काही तथ्य आहे का? हे जाणून घेऊ या…
माझ्या पत्नीला १०० लोकांनी मारहाण केली, जवानाचा दावा
निवृत्त लष्करी अधिकारी एन. त्यागराजन यांनी भारतीय सैनिक हवालदार प्रभाकरन यांचा व्हिडीओ ट्विटरवर ट्वीट केला आहे. सध्या प्रभाकरन हे जम्मू काश्मीरमध्ये तैनात आहेत.ते मूळचे तामिळनाडूमधील पाडावेदू गावातील रहिवासी आहेत. या व्हिडीओमध्ये प्रभाकरन यांनी त्यांच्या पत्नीला अर्धनग्न करून साधारण १०० लोकांनी माझ्या पत्नीला मारहाण केली, असा दावा केला आहे. पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. सैनिक प्रभाकरन यांनी चुकीचा दावा केला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. प्रभाकरन यांनी माझ्या पत्नीला १०० लोकांनी मारहाण केली, असा दावा केला आहे. तर एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जवानाच्या पत्नीने मात्र माझ्यावर ४० जणांनी हल्ला केला, असे सांगितले आहे. तसेच या हल्लेखोरांनी माझ्या छातीवर तसेच कंबरेखाली लाथ मारली, असेही जवानाच्या पत्नीने सांगितले आहे.
नेमकं काय घडलं?
प्रभाकरन यांनी त्यांच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील दुकानाची तोडफोड केल्याचा दावा केला आहे. तसेच या हल्ल्यादरम्यान १०० पेक्षा जास्त लोकांनी माझ्या पत्नीला अर्धनग्न करून तिच्यावर हल्ला केला, असा दावा प्रभाकरन यांनी केला. याबाबत मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आयुक्तांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचेही हा जवान व्हिडीओमध्ये सांगताना दिसतोय.
प्रभाकरन नेमकं काय म्हणाले?
“माझ्या पत्नीवर साधारण १२० लोकांनी हल्ला केला. तसेच माझ्या दुकानातील सर्व गोष्टी फेकून दिल्या. मी याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांनी यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे. डीजीपी साहेबांनी कृपया माझी मदत करावी. लोकांनी माझ्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवत धमकावले आहे. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून तिला अमानुषपणे मारहाण करण्यात आली,” असे प्रभाकरन व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.
जवानाच्या व्हिडीओची लष्कराने घेतली दखल
प्रभाकरन यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल भारतीय सैन्याच्या उत्तरेकडील कमांडने घेतली आहे. भारतीय लष्कराने एक निवेदन प्रकाशित करून प्रभाकरन यांनी केलेल्या दाव्याची चौकशी केली जाईल. तसेच त्यांना पूर्ण मदत केली जाईल, असे सांगितले आहे. “भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून एका जवानाने त्याच्या कुटुंबाला धोका असल्याचे सांगितले आहे. लष्कराने स्थानिक पोलीस प्रशासनाशी चर्चा केली आहे. पोलिसांनी सर्व प्रकारची मदत तसेच प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जे सैनिक त्यांच्या कुटुंबापासून लांब राहून देशाचे रक्षण करतात त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाला लष्कर प्राधान्य देते. या प्रकरणात स्थानिक लष्कराने जवानाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. तसेच स्थानिक लष्कर तेथील प्रशासनाच्याही संपर्कात आहे. पोलिसांनी जवानाच्या कुटुंबाचे रक्षण करण्याची हमी दिली आहे,” असे लष्कराने सांगितले आहे.
आम्ही जवान तसेच जवानाच्या कुटुंबाच्या पाठीशी- भाजपा
या प्रकरणावर तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जवान तसेच त्याच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तामिळनाडूच्या भूमीत सैनिकांच्या कुटुंबीयांना अशा प्रकारची वागणूक दिली जात असल्याचे पाहून लाज वाटतेय, अशा भावना अण्णामलाई यांनी व्यक्त केल्या आहेत. “व्हायरल व्हिडीओतील जवान तसेच त्याच्या पत्नीशी फोनद्वारे संवाद साधला आहे. जवानाच्या पत्नीची कहाणी ऐकून मी हताश झालो आहे. तामिळनाडूच्या भूमीत अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे पाहून मला लाज वाटत आहे. जवानाच्या पत्नीची मदत करण्यासाठी आमच्या पक्षातील लोक धावून गेले आहेत. जवानाची पत्नी तसेच त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी राहील,” असे अण्णामलाई म्हणाले आहेत.
जवानाच्या पत्नीने काय माहिती दिली?
जवानाच्या पत्नीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. ४० पेक्षा जास्त लोकांनी माझ्यावर हल्ला करून माझा विनयभंग केला. तसेच त्यांनी मला शिवीगाळ केली, असा दावा जवानाच्या पत्नीने केला आहे. “४० पेक्षा जास्त लोकांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ते आमच्या कुटुंबाला शांततेत राहू देत नाहीयेत. ते आम्हाला धमकी देत आहेत,” असा दावा जवानाच्या पत्नीने केला आहे. तर तिरुवन्नमलाईचे पोलीस अधीक्षक कार्तिकेयन यांनी या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच जवानाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तपास करण्यात येत असून आतापर्यंत रामू आणि हरिप्रसाद या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
जवानाच्या पत्नीवर हल्ला झालाच नाही, पोलिसांचा दावा
प्रभाकरन या जवानाने त्याच्या पत्नीवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावला असून प्रभाकरन यांनी या प्रकरणाची अतिशयोक्ती केली आहे, असे सांगितले आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार रामू नावाच्या व्यक्तीच्या वडिलांनी प्रभाकरन यांच्या सासऱ्यांना दुकान भाड्याने दिले होते. वडिलांच्या निधनानंतर रामू याला दुकानाचा मालकी हक्क हवा होता, त्यामुळे तो प्रभाकरनचे सासरे जीवा आणि उदया यांना पैसे देण्यासाठी गेला होता. मात्र जीवा आणि उदया या दोघांनी रामू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर बाजूला उभे असलेले लोक रामू यांच्या संरक्षणासाठी धावले. नंतर हे भांडण वाढत गेले. यामध्ये दुकानातील सामान फेकून देण्यात आले. या वेळी प्रभाकरन यांची पत्नी कीर्ती आणि आई दुकानात उपस्थित होत्या, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस अधीक्षक कार्तिकेयन यांनी या प्रकरणाविषयी अधिक माहिती दिली आहे. “हा त्यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम आहे. निश्चितच काही गोष्टी घडलेल्या आहेत. सध्या आम्ही जे काही सांगत आहोत, ते फक्त प्राथमिक चौकशीवर आधारलेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर या वादाचे नेमके कारण समजू शकेल,” असे कार्तिकेयन म्हणाले.
पोलिसांनी केलेला दावा खोटा- जवानाची पत्नी
तर दुसरीकडे पोलिसांनी केलेला दावा प्रभाकरन यांची पत्नी कीर्ती यांनी फेटाळून लावला आहे. पोलीस त्यांची स्वत:ची कहाणी रचत आहेत, असे कीर्ती म्हणाल्या आहेत. माझा भाऊ जीवा याने माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला. माझ्या छातीवर आणि पोटाच्या खाली लाथ मारण्यात आली. परिणामी मला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच सतत लघवी येत होती, असा दावा जवानाच्या पत्नीने केला आहे.
जवानाच्या पत्नीने केली न्यायाची मागणी
दरम्यान, जवानाच्या पत्नीने न्यायाची मागणी केली आहे. तसेच काही हल्लेखोरांना ओळखले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार पालकारा सेल्वराज, सेल्वराज यांचे पुत्र हरिहरन, जयागोपी, आर. व्ही. शेखर, कीर्ती, माणी, अतुकारा शंकर, पिचंडी अशी हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत.