तामिळनाडू राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष उद्भवला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत खटके उडाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यपाल आर.एन. रवी यांनी काढलेल्या एका पत्रकामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडूचे नामकरण ‘तमिझगम’ करण्यात यावे, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे. तामिळनाडू राज्याचे नामकरण याआधी झालेले आहे. १४ जानेवारी १९६९ रोजी मद्रास हे नाव बदलून तामिळनाडू नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री सी.एन. अन्नादुराई यांनी मंजूर केला होता. नामांतराचा हा इतिहास थोडाथोडका नव्हता. अनेक दशकांपासून तामिळ अस्मिता जपणाऱ्यांनी हा लढा चालवला.
तामिळनाडू अस्मितेचा जन्म पेरियार यांच्या विचारांतून
मद्रास राज्याचे नामकरण होण्यासाठी पेरियार रामास्वामी यांची चळवळ कारणीभूत ठरली. पेरियार यांनी १९२५ मध्ये स्वतःची ओळख आणि स्वाभिमान जागविण्यासाठी चळवळ सुरु केली. त्यांनी पहिल्यांदा द्राविड लोकांचे हक्काचे घर म्हणून द्राविड नाडू (नाडू म्हणजे राष्ट्र) हा शब्द पुढे केला. पेरियार यांनी द्राविडार कझागम (Dk – Dravidar Kazhagam) नावाचा पक्ष काढून तामिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड भाषिक लोकांच्या अस्मिता जागविण्याचा प्रयत्न केला. पेरियार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच सामाजिक क्रांतीच्या कामासाठी ओळखले जातात. वंचित समाज, महिला यांना हक्कांची जाणीव करुन देत असतानाच त्यांनी हिंदी भाषेला विरोध आणि तामिळ संस्कृतीच्या संवर्धनाचा मुद्दा पुढे नेला.
स्वातंत्र्य चळवळ सुरु असताना वेगळया द्रविड राष्ट्राची मागणी पुढे आली. उत्तर भारतीयांच्या विरोधातली चळवळही चांगलीच जोर धरू लागली होती. १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पेरियार स्वामी आणि त्यांच्या पक्षाचे नेते अन्नादुराई यांच्यात निवडणूक लढविण्यावरुन वाद झाले. ज्याची परिणीती म्हणून अन्नादुराई यांनी स्वतःचा डीएमके हा वेगळा पक्ष थाटला आणि निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. अण्णादुराई यांनी द्राविड नाडूची मागणी रेटून धरली आणि पुढे १९६७ मध्ये मद्राचे नामकरण तामिळनाडू असे करण्यात आले. अण्णादुराई हे तामिळनाडू राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
तामिळनाडू शब्दाचा इतिहास
तामिळनाडूमधील त्यागु नावाच्या कार्यकर्त्यांनी एकेठिकाणी सांगितले आहे की, तामिळनाडू हा शब्द खूप प्राचीन आहे. प्राचीन ग्रंथ शिलप्पदिकारम यामध्ये कवी इलांगो आदिगल यांनी राजा चोळ यांना उद्देशून हा शब्द वापरला होता. प्राध्यापक करुणानाथ यांनी सांगितले की, ज्या समूहाची संस्कृती, परंपरा इतरांपेक्षा वेगळ्या असतात त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. तामिळ भाषा ही भारत संकल्पना अस्तित्त्वात येण्याच्या आधीपासून आहे. या भाषेची स्वतःची संस्कृती आणि इतिहास आहे.
राज्यपालांनी तमिझगम नाव का पुढे केले
तामिळनाडूच्या नामकरणाचा एक मोठा आणि विस्तृत इतिहास असताना राज्यपाल आर. एन. रवी यांनी पुन्हा नवीन नाव का दिले असेल? या प्रश्नाचे उत्तर तामिळनाडू राज्य आणि राज्यपालांच्या सतत संघर्षात दिसते. याआधी देखील तामिळनाडू राज्याला राज्यपालांबरोबर जुळवून घेण्यास अडचणी आलेल्या आहेत. वेगळी भाषा आणि संस्कृती असल्यामुळे कदाचित या गोष्टी होत असाव्यात, असे म्हटले जाते. काही दिवसांपुर्वीच आरएन रवी यांनी सभागृहात भाषण वाचत असताना काही मुद्दे वगळले. त्यामुळे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांचा निषेध केला. हा अपमान जिव्हारी लागल्यामुळे राज्यपाल एएन रवी सभागृहातून तडक निघून गेले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. आता राज्य आणि राज्यपालांचा हा संघर्ष राज्याच्या नामांतराचे स्वरुप धारण करतो का? हे पाहावे लागेल.