लाकूड किंवा कोळसा जाळून त्यावर चालणाऱ्या बेकऱ्या व उपाहारगृहातील तंदूर भट्ट्या बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने बेकरी चालकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे बेकरी उद्योगातील वातावरण तापले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अशा आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्यासाठी जुलै महिन्यापर्यंत मुदत दिली आहे. तीन महिन्यांत हा बदल होणार का, या आस्थापनासाठी हा बदल शक्य आहे का, खवय्यांची याला पसंती असेल का अशा मुद्द्यांचा आढावा…

भट्ट्या बंद करण्याची वेळ का आली?

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात प्रदूषण होऊ लागले आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील हवेचा स्तर दिल्लीपेक्षाही वाईट झाला होता. तेव्हा मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी सात सदस्यांची समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये इतर मुद्द्यांबरोबरच उपाहारगृहातील तंदूरचा मुद्दा पुढे आला होता. तंदूरमधील कोळशांमुळे मोठ्या प्रमाणावर राख उडते व प्रदूषण होते. तसेच बेकरीमध्येही अनेक ठिकाणी लाकूड जाळून त्याचा जाळ केला जातो. त्यामुळे उपाहारगृहे व बेकरी उद्योगातील या तंदूर आणि भट्ट्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याचा विचार पुढे आला होता. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारले असून जुलैपर्यंतची मुदत दिली. त्यामुळे लाकडावर किंवा कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या व तंदूर भट्ट्या चालवणारी उपाहारगृहे व हॉटेल्स यांना कोळशाची भट्टी बंद करण्याबाबत पालिकेने नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे.

वायू प्रदूषणास कारणीभूत घटक कोणते?

प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कारणांमध्ये इमारतींची बांधकामे व पाडकामे यातून उडणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर वाहनांतून निघणारा धूर, वाहतूक खोळंबा, इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारा धूर हे कारण आहे. त्याचबरोबर अन्य कारणांमध्ये कचरा जाळणे, रस्त्यावर उडणारी धूळ, सिमेंट-काँक्रीटचे मिश्रण प्रकल्प (आरएमसी), उपाहारगृहातील तसेच बेकरी उद्योगातील इंधनाच्या जळणातून निर्माण होणारा धूर, स्मशानभूमीतून निघणारा धूर आणि कबुतरांची विष्ठा अंतर्भूत आहेत. तसेच मुंबईच्या आजूबाजूच्या शहरातील प्रदूषण, फटाके हे घटकदेखील कारणीभूत ठरते.

उच्च न्यायालयाने काय आदेश दिले?

पर्यावरण संरक्षण व सार्वजनिक आरोग्‍य हिताच्‍या दृष्‍टिकोनातून उच्‍च न्‍यायालयाने प्रदूषणाच्या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आहे. ९ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्‍या आदेशात न्‍यायालयाने ६ महिन्‍यांच्‍या आत म्‍हणजेच ८ जुलै २०२५ पर्यंत लाकूड व कोळशावरील भट्ट्या असलेल्या सर्व व्‍यावसायिकांना कायमस्‍वरूपी पर्यायी स्‍वच्‍छ इंधनावर भट्ट्या चालवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, हरित व स्‍वच्‍छ इंधन न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्‍याचे आदेश महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेलादेखील दिले आहेत.

स्‍वच्‍छ व हरित इंधन म्हणजे काय?

बेकरी व उपाहारगृहातील भट्ट्यांसाठी अनेकदा व्‍यावसायिक दुय्यम दर्जाचे लाकूड किंवा मोडीत निघालेले फर्निचर यांचा इंधन म्‍हणून उपयोग करतात. त्‍यातून घातक वायू बाहेर पडतात व सार्वजनिक आरोग्‍याला बाधा पोहोचते. त्यामुळे त्यांनी वीज किंवा सीएनजी, पीएनजी इत्‍यादी इंधनाचा वापर सुरू करणे अपेक्षित आहे.

भट्ट्या व तंदूर धोकादायक का?

नोंदणीकृत बेकऱ्यांपैकी ४७ टक्के बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून प्रामुख्याने लाकडाचा वापर केला जातो. त्यातही खर्च कमी करण्यासाठी यामध्ये भंगार लाकूड, जुने फर्निचर, मोडकळीस आलेल्या इमातींचे लाकूड यांचा वापर केला जातो. काही बेकऱ्या या झाडांपासून मिळणारे लाकडी ओंडकेही वापरतात. लाकूड जाळणाऱ्या बेकऱ्यांमध्ये तयार होणारी राख क्षेपणभूमीवर टाकली जाते. परिणामी वायू प्रदूषणात भर पडते.

मुंबईतील बेकरी उद्योगाची व्याप्ती किती?

पाव, लादीपाव यांसारख्‍या पदार्थांचे उत्‍पादन करणाऱ्या भट्ट्या (बेकरी), हॉटेल्‍स, उपाहारगृहे, खुल्‍यावर अन्‍नपदार्थ तयार करून विक्री करणारे तंदूर या व तत्‍सम व्‍यवसायांची मुंबईतील संख्‍या अतिशय मोठी आहे. लाकूड वापरणाऱ्या बेकऱ्या या दिवसाला सरासरी सुमारे १३० किलो लाकूड वापरतात. तर मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करणाऱ्या बेकऱ्या या दिवसाला सुमारे २५० ते ३०० किलो लाकडाचा इंधन म्हणून वापर करतात. साधारणपणे २० किलो पीठापासून पाव तयार करण्यासाठी चार ते पाच किलो लाकूड गरजेचे असते. भंगार लाकडाची किंमत साधारण एका किलोला चार ते पाच रुपये अशी आहे, तर लॉगवूड १० ते १२ रुपये किलो आहे. अर्थात वीज अथवा गॅसचा वापर करून बेक केलेल्या उत्पादनांपेक्षा लाकूड जाळून केलेल्या पदार्थाला ग्राहकांची अधिक पसंती असते.

बेकरी चालकांचे म्हणणे काय?

मुंबईतील लाकडावर चालणाऱ्या बेकऱ्या या अनेक दशकांपासून सुरू आहेत. काही बेकऱ्या या शंभर वर्षे जुन्या आहेत. घुमटाकार आकाराच्या या भट्टया विटांपासून तयार केलेल्या असतात व त्या लाकूड जाळण्याच्या सुविधेप्रमाणेच बनवलेल्या आहेत. दीडशे चौरस फूट जागेत बनवलेल्या या भट्ट्यांमध्ये लाकूड जाळले जाते. लाकूड पूर्ण जळाले की त्याचा कोळसा होतो व त्या कोळशाच्या तापमानावर ही भट्टी गरम राहते. त्यामुळे लाकूड जाळण्याची प्रक्रिया ही केवळ अर्धा ते दोन तास एवढीच असते. ही भट्टी स्वच्छ इंधनावर रूपांतरित करायचे ठरवल्यास दिवसाला १० सिलिंडर लागू शकतात, त्यामुळे सुमारे तीन दिवस पुरेल इतका साठा करून ठेवावा लागेल, जे धोक्याचे असेल असेही मत या बेकरी मालकांनी व्यक्त केले आहे.

खर्चाचे गणित कसे बिघडणार?

भट्टी काही महिन्यात वीज किंवा दुसऱ्या इंधनावर रूपांतरित करणे सोपे नाही. त्याकरिता खर्च आणि बेकरी मालकांच्या उपजीविकेचाही विचार व्हायला हवा. विजेवर भट्टी चालवल्यास त्याचा मासिक खर्च परवडणारा नाही. पीएनजीवर भट्टी चालवायची झाल्यास अशा गॅसवाहिन्यांचे जाळे मुंबईत सर्वत्र नाही. त्यामुळे तेदेखील शक्य होणार नाही. स्वच्छ इंधनात भट्टीचे रूपांतर करण्यासाठी बेकरी मालकांना किमान १० ते १५ लाखांचा खर्च येणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या कालावधीत हे सारे शक्य होणार नाही. तसेच या खर्चासाठी सरकारने अनुदान द्यावे अशीही मागणी बेकरी मालकांनी केली आहे. बेकरी रूपांतरित केल्यास भविष्यात पावाच्या किंवा बेकरी उत्पादनांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.

indrayani.narvekar@expressindia.com

Story img Loader