ऋषिकेश बामणे
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामासाठी शनिवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी तब्बल १० खेळाडूंनी १० कोटींपेक्षा अधिक झेप घेतली. यामध्ये भारतीय खेळाडूंचे प्रामुख्याने वर्चस्व दिसून आले. एकूण ७४ खेळाडूंवर शनिवारी बोली लावण्यात आली. यापैकी २० खेळाडू परदेशातील आहेत. त्या पार्श्वभूमीवर १० कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या खेळाडूंचा घेतलेला हा वेगवान आढावा…
इशान १५ कोटींपल्याड, वैशिष्ट्ये कोणती?
भारताचा डावखुरा फलंदाज इशान किशन यंदाच्या हंगामातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. २३ वर्षीय इशानला मुंबई इंडियन्सनी १५.२५ कोटी रुपयांत करारबद्ध केले. पाच वेळच्या विजेत्या मुंबईने ‘आयपीएल’च्या इतिहासात प्रथमच एखाद्या खेळाडूवर १० कोटींपेक्षा अधिक बोली लावली. इशानच्या कारकीर्दीला मुंबईतूनच दिशा लाभली. आक्रमक सलामीव्यतिरिक्त यष्टिरक्षणाची भूमिकाही तो बजावू शकतो. त्यामुळे मुंबईने भविष्याचा विचार करता इशानला संघात पुन्हा सहभागी केले आहे.
चेन्नईच्या चहरला लॉटरी लागली का?
अष्टपैलू दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्जने १४ कोटी रुपये देत संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला. भारताच्या वेगवान गोलंदाजांचा प्रथमच इतकी बोली लावण्यात आली. चहर गेल्या काही महिन्यांत फलंदाजीतही सातत्याने योगदान देत असून ‘पाॅवरप्ले’च्या षटकात बळी पटकावण्यात तो पटाईत आहे, त्यामुळे चहर यंदा गतविजेत्या चेन्नईसाठी सर्वाधिक मौल्यवान खेळाडू ठरू शकतो.
मुंबईकर श्रेयस कोणत्या संघाशी करारबद्ध झाला?
मुंबईचा प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना गतउपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सनी करारबद्ध केले आहे. श्रेयसला कर्णधारपद भूषवायचे असल्याने त्याने दिल्ली कॅपिटल्स संघ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता त्याच्याकडे कोलकाताच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येईल, असे दिसते. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीने २०२०मध्ये प्रथमच ‘आयपीएल’ची अंतिम फेरी गाठली होती. त्याशिवाय सध्या श्रेयस भारतीय संघातही स्थिरस्थावर झाल्याने याचा सकारात्मक परिणाम त्याच्या ‘आयपीएल’मधील कामगिरीवर दिसून येईल.
IPL Auction 2022 : बेबी एबीपासून ते शाहरूख खानपर्यंत..पाहा आयपीएल लिलावात कुणाला मिळाली कितीची बोली!
हर्षल, शार्दूलचा भाव वधारला का?
यंदाच्या हंगामासाठी १०.७५ कोटींवर बोली लावण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये चौघांचा समावेश आहे. गतवर्षी सर्वाधिक बळी मिळवणारा हर्षल पटेल (राॅयल चॅलेंजर्स बंगळूरु), वानिंदू हसरंगा (राॅयल चॅलेंजर्स बंगळूरु), मुंबईकर शार्दूल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स) आणि निकोलस पूरन (सनरायजर्स हैदराबाद) हे ते चार खेळाडू. हर्षल, शार्दूल यांच्या रूपात भारतीय गोलंदाजांचे लिलावातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित होते.
१० कोटींचे मानकरी कोण?
शनिवारी एकूण तीन वेगवान गोलंदाजांना प्रत्येकी १० कोटींची बोली लावण्यात आली. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकताच झालेल्या एकदिवसीय मालिकेत मालिकावीर ठरणाऱ्या प्रसिध कृष्णाला राजस्थान राॅयल्सनी करारबद्ध केले. याव्यतिरिक्त आवेश खान आणि लाॅकी फर्ग्युसन यांच्यासाठीही अनुक्रमे लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स संघांनी प्रत्येकी १० कोटी रुपये मोजले. आवेश खान आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेला (अनकॅप्ड) आतापर्यंतचा सर्वांत महागडा भारतीय क्रिकेटपटू ठरला. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांत तुरळक क्रिकेट खेळले गेले, त्यामुळे भारतीय परिस्थितीत खेळण्याचा अनुभव असलेल्या देशी क्रिकेटपटूंना यंदा अपेक्षेप्रमाणे जास्त बोली लागल्या. पुढील खेपेला कदाचित हे चित्र बदलू शकते.