इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनीची मॉडेल थ्री ही इलेक्ट्रिक कार भारतात येऊ घातली आहे. टेस्ला कंपनीची ही सर्वात किफायतशीर कार म्हणून ओळखली जाते. मात्र, त्याच वेळी टाटा मोटर्सनी २०२२मध्ये प्रदर्शनात आणलेली अविन्या ही कार नव्या रूपात आणि परवडण्याजोग्या किमतीत आणण्याचा मानस जाहीर केला आहे. टाटा संपूर्ण इलेक्ट्रिक आणि सुखसाधनयुक्त एसयूव्ही अविन्या बाजारात आणण्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. या कारची किंमत साधारण २५ लाखांच्या आसपास असेल, असे समजते.
टेस्लाच्या मॉडेल ३-शी टक्कर?
अविन्या मालिकेतील पहिली कार साधारण २०२७ या आर्थिक वर्षात बाजारात दाखल होईल, याविषयी आम्ही काहीएक संकेत देऊ शकतो. मात्र, तिची किंमत काय असेल, हे आम्ही या घडीला सांगू शकणार नाही. ज्या क्षणी ती बाजारात दाखल होईल तेव्हाच तिच्या किमतीबाबत बोलणे योग्य ठरेल, असे टाटा कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहननिर्मिती करणारी टाटा ही भारतातील एकमेव कंपनी आहे. अविन्या ही टेस्लाच्या मॉडेल ३शी टक्कर देऊ शकेल, अशा वैशिष्ट्यांनी युक्त असेल, असे बोलले जात आहे. टेस्लाच्या मॉडेल ३ची भारतातील किंमत ३० लाखांहून अधिक असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या टेस्ला कंपनीने तयार केलेली मॉडेल ३ ही कार भारतीयांसाठी सर्वाधिक किफायतशीर ठरेल, असे मानले जात आहे. वर्षी टेस्लाने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठीची तयारी सुरू ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या एप्रिलपर्यंत टेस्ला कारविक्रीस आरंभ करेल, अशी अपेक्षा आहे. बर्लिन-ब्रॅन्डेनबर्ग येथील गिगाफॅक्टरीत तयारी झालेली वाहने थेट भारतात आयात करेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने टेस्लासाठी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा धोरणात्मक बदल मानला जात आहे. भारताबाहेर तयार करण्यात आलेल्या वाहनांवर सर्वाधिक आयात शुल्क आकारण्याचे केंद्र सरकारने आधीच जाहीर केले होते. त्याऐवजी टेस्लाने भारतात वाहननिर्मिती प्रकल्प उभारण्याचा पर्याय केंद्र सरकारने सूचवला होता. इतर देशातील कारखान्यांमध्ये निर्मिती केलेली वाहने भारतात आयात करण्यासाठी अमेरिकेला आयात शुल्कात प्रमुख सवलती देण्याची तयारी केंद्र सरकार दाखवेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू आहेत.
अर्धा तासात ५०० किलोमीटरचे चार्जिंग?
जगभरातील ग्राहकांसाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या अविन्याची बांधणी अर्थात कारच्या स्पर्धात्मक रचनेला कंपनीने सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे टाटा मोटर्सनी स्पष्ट केले. प्रगत सुरक्षा साधनांसह अत्याधुनिक जल आणि गंजरोधक संरक्षक प्रणाली या कारसाठी उपयोगात आणली गेली आहे. काही प्रतिकूल स्थितीत अर्थात आव्हानात्मक रस्त्यांवरही क्षमता सिद्ध करणारी अविन्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे. विशेष करून भारतातील रस्त्यांवर तिचा कस लागेल, अशी तिची रचना असेल.
टाटा मोटर्सच्या मते, अतिवेगवान बॅटरी चार्जिंगसाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा समावेश त्यात असेल. अर्थात अवघ्या अर्धा तासात ५०० किलोमीटर अंतर पार करू शकेल इतकी क्षमता असलेली बॅटरी हे या अविन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असेल. अविन्यामध्ये उच्च क्षमतेच्या साहित्याचा समावेश करण्यात आलेला असेल. सक्षम इलेक्ट्रॉनिक अवयवभूत साधने, यथायोग्य ऊर्जा व्यवस्थापन धोरण ते क्षमतेचा योग्य वापर करण्यावर टाटा मोटर्सचा भर असेल. अविन्याला पाच दरवाजे असतील. तिची जमिनीपासूनची उंचीही कमी असेल म्हणूनच ती अधिक वेगवान असेल. अर्थात अविन्या ही स्पोर्टबॅक असेल.
इलेक्ट्रिक-पॅसेंजर वाहन विलिनीकरण?
टाटा मोटर्स लिमिटेडनी गेल्या वर्षी व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहन उद्योग वेगवेगळा करण्यास सुरुवात केली. आता इलेक्ट्रिक वाहन उद्योगही प्रवासी वाहन उद्योगास जोडण्याचा विचार करीत आहे. एकदा का व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहन उद्योग अलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली की इलेक्ट्रिक वाहन आणि पॅसेंजर वाहन उद्योगांचे विलिनीकरण केले जाण्याची शक्यता आहे.
२०३०पर्यंत ८ कोटी इलेक्ट्रिक वाहने?
२०३० पर्यंत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन धोरण लक्ष्याचा भाग पाहिल्यास खासगी कार विक्री ३० टक्के राहील. ७० टक्के वाटा व्यावसायिक वाहनविक्रीचा आणि दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा ८० टक्के इतका विक्रीवाटा असेल. याचा अर्थ या दशकानंतर देशातील रस्त्यांवर ८ कोटी वाहने उतरलेली असतील. शिवाय, मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संपूर्ण देशी बनावटीच्या ईलेक्ट्रिक वाहननिर्मितीचे केंद्र सरकारचे ध्येय असेल.