गौरव मुठे
टाटा समूहातील भांडवली बाजारात सूचिबद्ध नसलेल्या ‘रत्नां’पैकी एक असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने गेल्या महिन्यात १० मार्च रोजी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे प्रारंभिक समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’साठी मसुदा प्रस्ताव (डीआरएचपी) दाखल केला. १८ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर टाटा समूहातील कंपनी खुल्या बाजारात गुंतवणूकदारांचा कल यानिमित्ताने अजमावणार आहे.
हा प्रस्तावित ‘आयपीओ’च का महत्त्वाचा?
टाटा समूहातील सध्या ध्वजाधारी असलेली कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसचा समभाग २००४ मध्ये बाजारात सूचिबद्ध झाला. त्यानंतर आता १८ वर्षांनंतर बाजारात सूचिबद्ध होणारी ही टाटा नाममुद्रेची कंपनी! ‘टाटा’ हे नाव जोडले गेल्यामुळे गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे, पण टाटा टेक्नॉलॉजीज ही फॉच्र्युन इंडिया इन्फोटेक इंडस्ट्री रँकिंगमध्ये १५ वी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. टाटा टेक्नॉलॉजीजने अलीकडेच समभाग १:५ गुणोत्तरामध्ये विभाजित केले आहेत. म्हणजेच टाटा टेक्नॉलॉजीजच्या एका समभागाचे पाच भाग केल्याने दर्शनी मूल्य आता १० रुपयांवरून प्रत्येकी २ रुपये झाले आहे. त्यानंतर कंपनीने १:१ या प्रमाणात बक्षीस (बोनस) समभाग देण्याची घोषणा केली. म्हणजेच कंपनीच्या प्रत्येक समभागाच्या बदल्यात १० अतिरिक्त समभाग विद्यमान गुंतवणूकदारांना देण्यात आले आहेत.
याचा लाभ ‘टाटा मोटर्स’ला कसा?
टाटा टेक्नॉलॉजीजमधील बहुतांश हिस्सा पालक कंपनी टाटा मोटर्सकडे आहे. टाटा समूहातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने प्रति समभाग ७.४० रुपयांना टाटा टेक्नॉलॉजीजचे समभाग (मसुदा प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसार) खरेदी केले होते. टाटा मोटर्सने ज्या दराने भागभांडवल गुंतविले त्याच्या किमान ४ ते ५ पटीने अधिक परतावा ते या प्रक्रियेतून मिळवतील असा अंदाज आहे. मुळातच टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ शेअर बाजारात आणण्याचे मुख्य कारण म्हणजे भांडवली बाजारातील समभाग सूचिबद्धतेचा फायदा पदरी पाडून घेणे, तसेच विद्यमान भागधारकांकडील सुमारे ९.५७ कोटी समभागांची बाजारात विक्री करणे असा आहे. टाटा मोटर्सकडून टाटा टेक ८.११ कोटी समभाग म्हणजेच सुमारे २० टक्के हिस्सेदारी विकली जाईल. तसेच इतर भागधारकांपैकी, अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीई ९७.१६ लाख समभाग (२.४० टक्के हिस्सा) आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ सुमारे ४८.५८ लाख समभागांची (१.२० टक्के हिस्सा) विक्री करेल. टाटा मोटर्सची सध्या या कंपनीत ७४.७९ टक्के हिस्सेदारी आहे, तर अन्य दोघांकडे अनुक्रमे ७.२६ टक्के आणि ३.६३ टक्के हिस्सा आहे. विक्रीपश्चात कंपनीचे समभाग हे राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
टाटा टेक्नॉलॉजीज नेमके काय करते?
ही डिजिटल धाटणीच्या अभियांत्रिकी सेवा पुरवणारी जागतिक कंपनी आहे. उपकरण उत्पादकांना विशेषत: विमान आणि वाहन निर्माण क्षेत्रातील उद्योगांना ती नवीन उत्पादनांचे संकल्पचित्र, विकसन आणि उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन या क्षेत्रात सेवा प्रदान करते. डिसेंबर २०२२ ला संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने ३,०११.७९ कोटींचा महसूल मिळविला होता. तर त्याआधीच्या वर्षांतील याच कालावधीत (डिसेंबर २०२१ मध्ये) २,६०७.३० कोटींचा महसूल तिने नोंदविला आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजचे आयपीओ मूल्यांकन?
टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओ प्रस्तावाला ‘सेबी’कडून मंजुरी मिळणे बाकी आहे. मात्र ती मिळाल्यास येत्या दोन महिन्यांत समभाग भांडवली बाजारात पदार्पण करण्याची अपेक्षा आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजीजचे बाजार भांडवल १८ हजार कोटी ते २० हजार कोटी रु. राहण्याची शक्यता आहे. त्या आधारावर टाटा टेक्नॉलॉजीजचा किंमतपट्टा सुमारे ४५० रुपये ते ५०० रुपये प्रति समभाग राहण्याची शक्यता आहे.
टाटा टेक आणि टीसीएस यांत फरक काय?
वाहन उद्योगातील मूळ उपकरण निर्मात्यांसाठी (ओईएम) अभियांत्रिकी सेवा टाटा टेक प्रदान करते. तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांनी या क्षेत्रातील प्रचंड व्यवसाय संधी लक्षात घेऊन, टाटा मोटर्सअंतर्गत १९८९ मध्ये टाटा टेकची स्थापना केली. तर टीसीएस ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय व भारतातील सध्याची क्रमांक एकची कंपनी १९६८ पासूनची. टाटा सन्स लिमिटेडच्या छत्राखालील या कंपन्या तंत्रज्ञानाशी संलग्न सेवा देत असल्या तरी त्यांचे कार्यक्षेत्र खूपच वेगवेगळे आहे. टीसीएसचा व्यवसाय जगभरात सुमारे ६० देशांमध्ये आणि कर्मचारी सहा लाखांहून अधिक आहेत, तर टाटा टेकचे मनुष्यबळ २०२२ अखेर जेमतेम ११ हजार होते.