गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा समूहातील एक कंपनी तब्बल १८ वर्षांनंतर भांडवली बाजारात उतरून गुंतवणूकदारांना अजमावणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे प्रारंभिक समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’साठी मसुदा प्रस्ताव (डीआरएचपी) दाखल केला आहे. या ‘आयपीओ’चे टाटा समूह, विशेषत: टाटा मोटर्स या कंपनीसाठी खास औचित्य आहे, ते कसे.. 

टाटा टेक्नॉलॉजीज नेमकी काय करते?

टाटा समूहातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीज (टाटा टेक) ही डिजिटल धाटणीच्या अभियांत्रिकी सेवा पुरवणारी जागतिक कंपनी आहे. उपकरण उत्पादकांना विशेषत: विमान आणि वाहन निर्माण क्षेत्रातील उद्योगांना ती नवीन उत्पादनांचे संकल्पचित्र, विकसन आणि उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन या क्षेत्रात सेवा प्रदान करते. डिसेंबर २०२२ ला संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने ३,०११.७९ कोटींचा महसूल मिळविला होता. तर त्याआधीच्या वर्षांतील याच कालावधीत म्हणजेच डिसेंबर २०२१ मध्ये २,६०७.३० कोटींचा महसूल तिने नोंदविला आहे.

टाटा टेक आणि टीसीएस यांत फरक काय?

वाहन उद्योगातील मूळ उपकरण निर्मात्यांसाठी (ओईएम) अभियांत्रिकी सेवा टाटा टेक प्रदान करते. तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांनी या क्षेत्रातील प्रचंड व्यवसाय संधी लक्षात घेऊन, टाटा मोटर्सची उपकंपनी म्हणून १९८९ मध्ये टाटा टेकची स्थापना केली. तर टीसीएस ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय आणि भारतातील सध्याची क्रमांक एकची कंपनी १९६८ पासून कार्यरत आहे. टाटा सन्स लिमिटेडच्या छत्राखालील या दोन्ही कंपन्या तंत्रज्ञानाशी संलग्न सेवा देत असल्या तरी त्यांचे कार्यक्षेत्र खूपच वेगवेगळे आहे. टीसीएसचा व्यवसाय जगभरात सुमारे ६० देशांमध्ये आणि कर्मचारी सहा लाखांहून अधिक आहेत, तर टाटा टेकचे मनुष्यबळ २०२२ अखेर जेमतेम ११,००० इतके होते.

टाटा टेकच्या प्रस्तावित आयपीओची योजना काय?

‘सेबी’कडे दाखल मसुदा प्रस्तावानुसार, कंपनी आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून (ओएफएस) ९.५७ कोटी समभागांची विक्री करणार आहे. जे भरणा झालेल्या भांडवलाच्या सुमारे २३.६० टक्के आहे. ओएफएसअंतर्गत, टाटा टेकची पालक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सकडून ८.११ कोटी समभाग म्हणजेच सुमारे २० टक्के हिस्सेदारी विकली जाईल. तसेच इतर भागधारकांपैकी, अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीई ९७.१६ लाख समभाग (२.४० टक्के हिस्सा) आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ सुमारे ४८.५८ लाख समभागांची (१.२० टक्के हिस्सा) विक्री करेल. टाटा मोटर्सची सध्या या कंपनीत ७४.७९ टक्के हिस्सेदारी आहे, तर अन्य दोघांकडे अनुक्रमे ७.२६ टक्के आणि ३.६३ टक्के हिस्सा आहे. विक्रीपश्चात कंपनीचे समभाग हे राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

टाटा मोटर्सला काय फायदा होणार?

टाटा टेकच्या या प्रस्तावित भागविक्रीशी ‘टाटा’ हे मोठे नाव जोडले गेल्यामुळे गुंतवणूकदारांकडून तिच्या समभागांना चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. हा प्रस्तावित आयपीओद्वारे आंशिक हिस्सा विकून टाटा मोटर्स अत्यावश्यक रोख प्रवाह निर्माण करेल, जे तिच्या विद्युत शक्तीवरील वाहनांच्या क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजनांना हातभार लावणारे ठरेल, असे प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधनप्रमुख अविनाश गोरक्षकर म्हणाले. टाटा मोटर्सने पुढील पाच वर्षांत विद्युत वाहन व्यवसायात सुमारे १६,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आखले आहे. टाटा टेकने अद्याप आयपीओसाठी किंमतपट्टा निश्चित केलेला नाही. मात्र टाटा मोटर्सने ज्या दराने भागभांडवल गुंतविले त्याच्या किमान ४ ते ५ पटीने अधिक परतावा ते या प्रक्रियेतून मिळवतील असा अंदाज आहे.

टाटा मोटर्सचा समभाग वधारणार का?

सरलेल्या गुरुवार-शुक्रवारच्या सत्रात बाजारात मंदीवाल्यांचा जोर असूनही टाटा मोटर्स समभाग तेजीत होता. मागील पाच सत्रांत टाटा मोटर्सचा समभाग ३ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. पुढेही समभागात तेजीची अपेक्षा व्यक्त करताना, आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले की, टाटा मोटर्सच्या समभागाला ४२० रुपयांच्या पातळीवर मजबूत आधार आहे आणि सध्या ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा समभाग आहे ते ४२० रुपयांच्या पातळीवर नुकसान प्रतिबंध (स्टॉप लॉस) लावून ठेवू शकतात. ज्यांना टाटा मोटर्सचे समभाग खरेदी करायचे आहेत ते हा समभाग सध्याच्या पातळीवर ४९० ते ५०० रुपये प्रति समभाग या अल्प ते मध्यम मुदतीच्या लक्ष्यासाठी खरेदी करू शकतात.

gaurav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata technologies ipo beneficial tata motors shareholders print exp 2303 zws
Show comments