प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टचा संपूर्ण जगात बोलबाला आहे. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. मात्र, सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती ज्या महागड्या खासगी विमानाने फिरते, ते विमान संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरतेय. तसा दावा एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने केला आहे. विशेष म्हणजे टेलर स्विफ्टची कायदेशीर बाजू सांभाळणाऱ्या टीमने या विद्यार्थ्याला थेट नोटीस जारी केली असून, आम्ही तुला कोर्टात खेचू, असा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर टेलर स्विफ्टवर नेमका आरोप काय? तिचे खासगी विमान जगभरासाठी डोकेदुखी का ठरतेय? २१ वर्षीय विद्यार्थ्याने नेमका काय आरोप केला आहे? हे जाणून घेऊ…
टेलर स्विफ्टवर नेमका आरोप काय?
सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठाचा २१ वर्षीय विद्यार्थी जॅक स्विनी याने टेरल स्विफ्टवर गंभीर आरोप केले आहेत. टेलर स्विफ्ट प्रवासातील वेळ वाचावा म्हणून आपल्या खासगी विमानाने प्रवास करते. मात्र, याच विमान प्रवासामुळे प्रदूषणात चांगलीच वाढ होत आहे, असे या जॅक स्विनी नावाच्या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. त्याने याबाबत काही दिवसांपूर्वी त्याच्या समाजमाध्यमाच्या खात्यावर याबाबत माहिती दिली होती. स्विनी याच्या या आरोपांची दखल टेलर स्विफ्टने घेतली असून, तिच्या कायदेशीर बाजू सांभाळणाऱ्या टीमने स्विनीला नोटीस पाठवली आहे. तुमची ही पोस्ट आमच्या अशिलाच्या मानसिक व शारीरिक त्रासाला जबाबदार आहे. त्यामुळे तुम्ही टेलर स्विफ्ट यांच्यावर पाळत ठेवणे, तसेच त्रास देणे थांबवले नाही, तर आम्ही तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू, असा इशाराच टेलर स्विफ्टच्या वकिलांनी दिला आहे.
नोटिशीवर स्विनी या विद्यार्थ्याचे उत्तर काय?
स्विफ्टच्या वकिलांची ही नोटीस मिळाल्यानंतर स्विनी या विद्यार्थ्याने प्रतिक्रिया दिली आहे. टेलर स्विफ्ट यांच्या खासगी विमानातून मोठ्या प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होते. त्यावर होणाऱ्या टीकेला दाबण्यासाठी असा प्रयत्न केला जातोय. टेलर स्विफ्टवर प्रदूषणासाठी कारणीभूत असल्याचा आरोप होत असताना अशा प्रकारची नोटीस पाठविण्यात आली आहे. आम्ही संपूर्ण जगाला नियंत्रित ठेवू शकतो, असे टेलर स्विफ्टच्या टीमला वाटत आहे, असे मत स्विनी या विद्यार्थ्याने व्यक्त केले.
खासगी विमानांची नेमकी अडचण काय?
खासगी विमानांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. युरोपमधील ट्रान्स्पोर्ट अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट या संस्थेकडून हवामानविषयक अभ्यास केला जातो. तसेच प्रदूषणविरोधी लढ्यातही ही संस्था भाग घेते. या संस्थेने २०२३ साली एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार व्यावसायिक विमानाच्या तुलनेत खासगी विमानाकडून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण हे पाच ते १३ पटींनी अधिक आहे. तर, व्यावसायिक विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या तुलनेत वैयक्तिक विमानातून प्रवास करणारी व्यक्तीही ५० टक्के अधिक प्रदूषणास कारणीभूत ठरते.
खासगी विमानामुळे काय हानी होते?
एक खासगी विमान प्रत्येक तासाला साधारण दोन टन कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन करून शकते. तुलनाच करायची झाल्यास युरोपियन लोकांकडून कार्बन डायऑक्साईडचे जेवढे उत्सर्जन होते, त्याच्या तुलनेत खासगी विमानांमुळे होणारे उत्सर्जन हे एक-चतुर्थांश आहे. ब्रिटिश मीडिया आउटलेट यार्डच्या अहवालानुसार वेगवेगळ्या सेलिब्रिटी आणि अब्जाधीशांच्या खासगी विमानांमुळे २०२२ साली प्रत्येकी सरासरी ३,३७६.६४ टन कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन झाले असावे.
खासगी विमानांचे प्रमाणात ६४ टक्क्यांनी वाढ
एकीकडे खासगी विमानांमुळे कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन वाढत असताना दुसरीकडे खासगी विमानांच्या संख्येत आणि वापरातही वाढ होत आहे. रॉयटर्सच्या मे २०२३ च्या रिपोर्टनुसार २०२२ मध्ये युरोपमध्ये खासगी विमानांचे प्रमाण ६४ टक्के वाढले आहे. या खासगी विमानांमुळे ५.३ दशलक्ष टनांपेक्षा अधिक कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन झाले असावे.
टेलर स्विफ्टचे खासगी विमानाने प्रवास करण्याचे प्रमाण अधिक
टेलर स्विफ्टकडून खासगी विमानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जो प्रवास वाहनाद्वारेही करता येईल अशा प्रवासालादेखील ती खासगी विमानाचा वापर करते. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास टेलर स्विफ्टने ३० जानेवारी रोजी इलिनोइसमधील सेंट लुईस डाउनटाउन विमानतळावरून उड्डाण केले आणि १३ मिनिटांनंतर ती मिसुरी येथील स्पिरिट ऑफ सेंट लुईस या विमानतळावर उतरली. हा प्रवास एकूण १३ मिनिटांचा होता. या प्रवासामुळे एकूण दोन टन कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन झाले. तुलना करायची झाल्यास भारतातील प्रत्येक व्यक्तीमुळे होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साईडच्या उत्सर्जनापेक्षाही हे प्रमाण अधिक आहे.
टेलर स्विफ्टमुळे ८,२९३.५४ टन कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन
यार्डने २०२२ मध्ये एक प्रभावी अभ्यास केला होता. या अभ्यासात वेगवेगळे सेलिब्रिटी आणि त्यांच्या खासगी विमानामुळे होणारे कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन यांची माहिती देण्यात आली होती. या यादीमध्ये टेलर स्विफ्ट प्रथम क्रमांकावर होती. टेलर स्विफ्टने साधारण २२ हजार ९२३ मिनिटे म्हणजेच १५.९ दिवस आपल्या खासगी विमानाने प्रवास केला होता. या प्रवासामुळे साधारण ८२९३.५४ टन कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन झाले होते. एखाद्या व्यक्तीमुळे वर्षाला जेवढे कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन होते, त्याच्या तुलनेत टेलर स्विफ्टच्या जेटमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साईडचे प्रमाण हे ११८४.८ टक्क्यांनी जास्त होते.
अनेक सेलिब्रिटींचा यादीत समावेश
या यादीत सुपरस्टार फ्लॉयड मायवेदर, हिप-हॉप स्टार जय-झेड, बेसबॉल स्टार ॲलेक्स रॉड्रिग्ज, गायक ब्लेक शेल्टन, दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग, किम कार्दाशियन, अभिनेता मार्क वाहलबर्ग, माध्यम क्षेत्रातील ओप्रा विन्फ्रे व रॅपर ट्रॅव्हिस स्कॉट यांचाही समावेश होता.
श्रीमंत देश उत्सर्जनास अधिक जबाबदार
गरीब आणि श्रीमंत देशांचे कार्बन डाय-ऑक्साईडच्या उत्सर्जनातील योगदान हे असमान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळानुसार आपल्या राहणीमानामुळे पृथ्वीचे मोठे नुकसान होत आहे. श्रीमंत लोकांमुळे पर्यावरणाची अधिक हानी होत आहे. जगातील एक टक्का श्रीमंत लोक हे जगातील ५० टक्के गरीब लोकांपेक्षा अधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करण्यास कारणीभूत ठरत आहेत. श्रीमंत, विकसित राष्ट्रांमध्येही गरीब राष्ट्रांच्या तुलनेत अधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेले २३ देश जगातील ५० टक्के कार्बन डाय-ऑक्साईडच्या उत्सर्जनास कारणीभूत आहेत. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास अमेरिकेतील प्रत्येक नागरिक दरवर्षी साधारण १५.३२ मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन करण्यास कारणीभूत ठरतो. ग्लोबल कार्बन अॅटल, २०२१ नुसार- हेच प्रमाण भारतात अवघे १.८९ मेट्रिक टन आहे.