देशातल्या सर्वात रूंद GMLR बोगद्याच्या कामाचा श्रीगणेशा अखेर येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या ६.६५ किलोमीटर इतक्या लांबीचा दुहेरी बोगदा तयार केला जाणार आहे. आतापर्यंत देशात सर्व रस्त्यांच्या बांधकामासाठी वापरलेल्या की मशीन्सपैकी टीबीएम ही सर्वात मोठी मशीन असणार आहे. टीबीएम म्हणजे टनेल बोरिंग मशीन. या मशीन्स खास GMLR च्या कामासाठी चीनमधून मागवल्या आहेत. तसंच हाँगकाँगस्थित टेराटेका या कंपनीकडून या कामासाठीची सर्व यंत्रसामुग्री पुरवली जाणार आहे.

GMLR च्या या दुहेरी बोगद्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी या दोन्ही टीबीएम मशीन्स आणल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील गोरेगाव इथे कामाला सुरुवात केली आहे, इथेच टीबीएम लाँच केल्या जाणार आहेत. पालिकेने फिल्म सिटीमध्ये या बांधकामाचा पाया रचला आहे, जेणेकरून पुढे टीबीएम मशीन्सचे काम सुरू होईल. फिल्म सिटीजवळील व्हिसलिंग वूड्स इथे या कामाचा लाँचिंग स्पॉट असणार आहे.
लिंक रोडचा पाया रचण्यासाठी एकूण ७०० ठिकाणी पायलिंगचं काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे, त्यापैकी ३०० ठिकाणचं काम तर पूर्णही झालं आहे. पायलिंगचं हे काम झाल्यावर लाँचिंग स्पॉटच्या खोदकामाचे काम पूर्ण होईल. या स्पॉटचे काम साधारण १२ महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टीबीएम मशीन्सने बोगद्याच्या कामाला सुरुवात होईल.

दरम्यान, महापालिकेने मनोर इथे कास्टिंग यार्डच्या कामालाही सुरुवात केली आहे. इथे बोगद्याच्या आरसीसी भागांसाठी कास्टिंग केलं जाईल. आरसीसी रिंगसाठी लागणारे साचे कोरियाहून मागवण्यात आले आहेत.
GMLR प्रकल्पाअंतर्गत दुहेरी बोगदा प्रस्तावित असल्याने दोन टीबीएम मशीन्स येणे अपेक्षित आहे. यापैकी पहिले मशीन मार्चमध्ये चीनहून पाठवले जाणार आहे. साधारण एप्रिलमध्ये ही यंत्रसामुग्री शहरात दाखल होईल.

संजय गांधी उद्यानाच्या खालून टीबीएम जवळपास ५.३ किलोमीटर इतकं खोदकाम करेल, म्हणजे दोन्ही बाजूला साधारण १०.६ किलोमीटर इतकं खोदून शेवटी मुलुंडमधील अमर नगर जंक्शन इथे बोगद्याचं दुसरं टोक प्रस्तावित केलेलं आहे. साधारणपणे टीबीएम मशीनच्या पुढे एक कटर हेड असते, जे त्याच्या तीक्ष्ण कटरने गोल फिरत खोदकाम करते.

GMLR दुहेरी बोगद्याची वैशिष्ट्ये
या प्रकल्पाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्व-पश्चिम कॉरिडॉरवरील गर्दी कमी होईल. संजय गांधी उद्यानाजवळील भागापासून सुरुवात करत त्याच्या एकूण लांबीपैकी १.३५ किलोमीटरमध्ये उद्यानातील रस्त्याचा वापर केला जाईल.बोगद्यात सुरूवातीला उतरण्यासाठी एक चौकोनी बोगदा तयार केला जाईल. जवळपास ५.३० किलोमीटर एवढा भाग हा टीबीएम मशीनने खोदला जाईल.

पश्चिम उपनगरातल्या फिल्म सिटीपासून सुरू होऊन मुलुंडच्या अमर नगर जंक्शनपर्यंत हा बोगदा असणार आहे.त्यामुळे GMLR प्रकल्प पूर्ण झाल्यावर JVLR (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड)वरील जवळपास ४० टक्के वाहतुकीचा भार कमी होणार आहे.हा दुहेरी बोगदा १५ मीटरच्या अंतराने तयार केला जाईल. कोस्टल रोडच्या दुहेरी बोगद्याप्रमाणे या बोगद्यातही आपत्कालीन परिस्थितीसाठी ३०० मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज असतील.

दरम्यान, मुंबई महापालिकेने १८०० मिलीमीटर इतक्या पाण्याच्या पाईपलाइन उभारण्याचा प्रस्तावही ठेवला आहे, जी बोगद्यामार्गे जाईल. ही पाईपलाइन भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पातून थेट गोरेगावला पाणीपुरवठा करेल.

दुहेरी बोगद्याचे आताचे स्टेटस काय
GMLR च्या प्रकल्पाला आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्या तरी वनविभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील परवानगी अजूनही प्रलंबित आहे. ही परवानगी मिळाल्यावर या प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या वनक्षेत्रातही काम सुरू केले जाईल.

हा बोगदा तुळशी आणि विहार तलावांना जोडलेला असल्याने त्यासाठी जलविज्ञानाचाही अभ्यास करण्यात आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अडचणीत सापडलेल्या या प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्याकडून पर्यावरण आणि जैविकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला आहे. शिवाय अभियांत्रिकी आणि भूतांत्रिकी अभ्यासही केलेला आहे.

जुलै २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. साधारण सहा हजार पाचशे कोटींचा हा प्रकल्प ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Story img Loader