Benefits of Drinking tea everyday : चहा असं नावही ऐकलं तरी अनेकांच्या अंगात आपोआप तरतरी येते. उन्हाळा असो वा पावसाळा; अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात गरमागरम चहाने करतात. तसं पाहता, भारतात चहाप्रेमींची कमी नाही. काही जण दिवसातून चार-पाच कप चहा सहज पचवतात. जर तुम्हीही चहाचे शौकिन असाल, तर तुमचा आनंद द्विगुणीत करणारी माहिती समोर आली आहे. एका नवीन संशोधनानुसार, योग्य प्रकारे तयार केलेला चहा मनोबल तर वाढवितोच; पण शरीरातून शिसे आणि कॅडमियम यांसारख्या जड धातूंना प्रभावीपणे काढून टाकण्यासही मदत करतो. दरम्यान, संशोधनात आणखी कोणकोणते दावे करण्यात आले, ते जाणून घेऊ.
गेल्या आठवड्यात सायन्स अँड टेक्नॉलॉजी या जर्नलमध्ये ‘Brewing Clean Water : The Metal-Remediating Benefits of Tea Preparation’ या शीर्षकाखाली एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधक व या संशोधनाचे वरिष्ठ लेखक विनायक पी. द्रविड यांनी एका वृत्तपत्र प्रकाशनात म्हटले, “आम्ही हे सुचवत नाही की, प्रत्येकाने चहाच्या पानांचा वापर पाणी फिल्टर म्हणून करावा. खरं तर, आम्ही मॉडेल प्रयोगांचा वापर करतो आणि विविध परिमाणांमध्ये बदल करून प्रदूषकांच्या कॅप्चर/रिलीज चक्रांमध्ये समाविष्ट वैज्ञानिक तत्त्वे, तसेच घटनांचे परीक्षण समजून घेण्याचे काम करतो.”
संशोधनानुसार, चहा उकळताना पाण्यातील जड धातू शोषले जातात. त्यातील आयन किंवा रेणू दुसऱ्या रेणूच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात, ज्यामुळे त्या पृष्ठभागावर एक थर तयार होतो. अशा प्रकारे, चहाच्या पानांच्या पृष्ठभागावर जड धातूंचे आयन चिकटून राहतात, ज्यामुळे पाण्यातील जड धातूंचे प्रमाण कमी होते. डॉ. विनायक पी. द्रविड म्हणाले, “या संशोधनाचा उद्देश चहाची जड धातू शोषण्याची क्षमता मोजणे, असा होता. तसेच, या परिणामाचे मूल्यमापन करून जगभरातील लोकांच्या शरीरातील जड धातूचे प्रमाण कमी करण्यास चहा कसा हातभार लावू शकतो, हे अधोरेखित करणे हा होता.
आणखी वाचा : Chatgpt Health Advice : चॅट-जीपीटीवरील वैद्यकीय माहिती अचूक असते का? सर्वेक्षणातून काय समोर आलं?
अभ्यास कसा केला गेला?
नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या संशोधकांनी विविध प्रकारच्या चहांच्या पानांचा वापर केला. त्याशिवाय चहा उकळण्याच्या विविध पद्धती वापरून जड धातूंचे शोषण किती प्रमाणात होते याची चाचणी केली. त्यांनी काळा, पांढरा, हिरवा चहा तसेच कॅमोमाइल आणि रायबोस यांसारख्या हर्बल चहाचे परीक्षण केले. संशोधकांनी कापूस, नायलॉन व सेल्युलोजच्या पिशव्यांमधील चहाचीदेखील चाचणी केली आणि त्यातील फरक तपासला.
संशोधकांनी सुरुवातीला पितळ, क्रोमियम, तांबा, झिंक, तसेच कॅडमियम यांसारख्या धातूच्या भांड्यांमध्ये गरम पाणी उकळले आणि त्यामध्ये चहाची पाने टाकली. प्रत्येक प्रकारच्या चहाची पाने वेगवेगळ्या कालावधीमध्ये सेकंदांपासून ते २४ तासांपर्यंत उकळण्यात आली. त्यानंतर पाण्यातील धातूंच्या प्रमाणाची मोजणी करून, चहाच्या पानांनी किती धातू शोषले याचे मूल्यांकन करण्यात आले.
अभ्यासातून काय समोर आले?
नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्यातील शिशांचे प्रमाण प्रति दशलक्ष १० भागांपेक्षा जास्त असले तरीही चहा उकळण्याच्या प्रक्रियेद्वारे त्यातून सुमारे १५ टक्के शिसे काढून टाकता येते. संशोधकांनी एक कप चहाच्या आधारावर हे परिणाम मोजले. त्यामध्ये एक मग पाणी आणि तीन ते पाच मिनिटे उकळलेल्या चहाचा पानांचा समावेश होता. दुसरी बाब म्हणजे चहाच्या उकळण्याच्या कालावधीचा पाण्यातील धातूंच्या शोषणावर थेट परिणाम दिसून आला. जास्त वेळ उकळवलेला चहा पाण्यातील धातूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करू शकतो, असं अभ्यासातून दिसून आलं. मात्र, २४ तास उकळवलेला चहा पिण्यासाठी योग्य राहत नाही आणि त्यामुळे उकळण्याचा कालावधी आणि चहाच्या पिण्यायोग्यतेचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.
सेल्युलोज पिशव्या इतरांपेक्षा चांगल्या
चहाशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्यांची चाचणी केल्यानंतर संशोधकांना असे आढळून आले की, सेल्युलोजच्या चहाच्या पिशव्या कापूस आणि नायलॉन पिशव्यांपेक्षा जड धातू शोषून घेण्याचे चांगले काम करतात. चहाच्या पिशव्यांचा धातूंच्या शोषण क्षमतेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. अभ्यासानुसार, सेल्युलोजच्या चहाच्या पिशव्यांनी कापूस आणि नायलॉनच्या पिशव्यांच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे धातूंचे शोषण केले. पहिले लेखक बेंजामिन शिंदेल यांनी असा सिद्धांत मांडला की, सेल्युलोज हा लाकडाच्या लगद्यापासून तयार झालेला एक जैवविघटनशील नैसर्गिक पदार्थ आहे, ज्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जास्त असते आणि त्यामुळे शोषण प्रक्रिया चांगले काम करते. परिणामत: धातूच्या आयनांना चिकटून राहण्यासाठी मोठे क्षेत्र मिळते. त्यामुळे ते चिकट कृत्रिम पदार्थांपेक्षा अधिक प्रभावी होते.
हेही वाचा : America Official Language : अमेरिकेची अधिकृत भाषा इंग्रजी का नाही? यामागचं नेमकं कारण काय?
मायक्रोप्लास्टिक्सचे उत्सर्जन आरोग्यास हानिकारक
“कापूस आणि नायलॉनच्या पिशव्या पाण्यातून जवळजवळ कोणतेही जड धातू काढून टाकत नाहीत,” असे बेंजामिन यांनी सांगितले. नायलॉनच्या चहाच्या पिशव्यांमुळे मायक्रोप्लास्टिक्सचे उत्सर्जन होते, जे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आजकालच्या बहुतेक चहाच्या पिशव्यांमध्ये सेल्युलोजसारखी नैसर्गिक सामग्री वापरली जाते, जी मायक्रोपार्टिकल्स सोडते. त्याचा शरीरावर काहीही परिणाम होत नाही, असेही बेंजामिन म्हणाले. अभ्यासातून असेही समोर आले की, चहाची बारीक पाने धातूंच्या शोषणात किरकोळ भूमिका बजावतात. कारण, संपूर्ण पानांच्या तुलनेत बारीक पानांनी कमी धातू शोषले जातात.
अभ्यासकांनी काय दावा केला?
“जेव्हा चहाच्या पानांवर प्रक्रिया करून काळा चहा तयार केला जातो, तेव्हा त्यावर सुरकुत्या आणि छिद्रे पडतात,” असे बेंजामिन यांनी स्पष्ट केले. चहा हे जगातील सर्वांत जास्त सेवन केले जाणारे पेय आहे. त्यातच चहाच्या पानांमध्ये पाण्यातील धातू काढून टाकण्याचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यासाठी त्याचे महत्त्व अधिकच वाढते. अधिक वेळ उकळलेल्या चहामुळे पाण्यातील धातूंचे प्रमाण खूपच कमी होऊ शकते. मात्र, पाण्याच्या शुद्धतेसाठी फक्त चहाच्या पानांवरच अवलंबून राहणे पुरेसे नाही. त्यासाठी अधिकृत पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे.