अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्यानंतरच होते. घर असो वा ऑफिस; सर्वच ठिकाणी चहा हवा असतोच. परंतु, आता सर्वसामान्यांचा हाच चहा महागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशावर ताण पडणार आहे. चहाचे उत्पादन आणि वापर या दोन्हींमध्ये भारत आघाडीच्या देशांपैकी एक आहे. चहा उत्पादनात चीननंतर दुसर्‍या क्रमांकावर भारत आहे. भारतात चहाचे सर्वांत जास्त उत्पादन आसाममध्ये होते. मात्र, हवामानातील बदल आणि पूर परिस्थितीमुळे देशातील चहाच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चहा बोर्डाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात चहाचे दर सरासरी २१७.५३ रुपये प्रतिकिलो होते. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत या दरामध्ये जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मे महिन्याच्या कडाक्याच्या उष्णतेपासून ते जुलैमध्ये आलेल्या पुरापर्यंत सततच्या हवामानातील बदलांच्या घटनांनी आसामच्या चहा उद्योगाला अडचणीत आणले आहे. ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, मे महिन्यात भारतातील चहाचे उत्पादन एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक घसरून, ९०.९२ दशलक्ष किलोग्रॅमवर ​​आले आहे. हवामान बदलामुळे चहाचे उत्पादन कसे धोक्यात येत आहे? सर्वसामान्यांच्या खिशावर याचा काय परिणाम होणार? चहाच्या किमती किती वाढणार? याविषयी जाणून घेऊ.

पूर परिस्थितीमुळे देशातील चहाच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. (छायाचित्र-एएनआय)

हेही वाचा : कठुआत लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा उलगडा कसा झाला? जम्मू-काश्मीरमधील सततच्या दहशतवादी हल्ल्यामागे कोणाचा हात?

उत्पादनात घसरण

सुमारे दोन शतकांचा इतिहास असलेला आसामचा चहा, त्याचे फायदे व चव यांमुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. भारतात सर्वसामान्यांच्या घरात चहानेच दिवसाची सुरुवात होते. आसाममध्ये चहा कापणीचा विशिष्ट कालावधी असतो; ज्याला पहिला फ्लश, दुसरा फ्लश, मान्सून फ्लश व शरद ऋतूतील फ्लश, असे म्हटले जाते. यंदा जूनच्या पावसाने पूर्वीच्या उष्णतेच्या लाटेपासून दिलासा दिला. परंतु, आसामच्या नद्यांच्या काठावरील नयनरम्य चहाच्या मळ्यांना जुलैमध्ये विनाशकारी पुराचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील कापणीवर परिणाम झाला, असे जोरहाट येथील चहा बागायतदाराने ‘रॉयटर्स’शी बोलताना सांगितले. “जुलै हा सामान्यतः उत्पादनासाठीचा सर्वांत महत्त्वाचा महिना असतो; परंतु या वर्षी उत्पादनात तूट निर्माण होईल,” असे त्यांनी सांगितले.

कीटकनाशकांवरील सरकारच्या निर्णयाचा उद्योगावर परिणाम

भारताच्या चहा उत्पादनापैकी अर्ध्याहून अधिक आणि जागतिक उत्पादनात अंदाजे १३ टक्के योगदान आसामचे असते. साधारणपणे दरवर्षी ६५० दशलक्ष किलोग्रॅमपेक्षा जास्त चहाचे उत्पादन आसाममध्ये होते. आसाममध्ये नुकत्याच आलेल्या पुराचा दोन दशलक्ष लोकांवर दुष्परिणाम झाला. त्यामुळे या वर्षीच्या उत्पादनात तूट वाढण्याची शक्यता आहे. “सततच्या हवामान बदलाच्या घटनांमुळे चहाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. मे महिन्यातील अतिउष्णतेनंतर आसाममध्ये सततच्या पूरसदृश परिस्थितीमुळे आमचे उत्पादन आणखी कमी होत आहे,” असे चहाचे बागायतदार व भारताच्या चहा मंडळाचे माजी अध्यक्ष प्रभात बेझबोरुआ यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले. हवामानाच्या आव्हानांव्यतिरिक्त २० कीटकनाशकांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे उद्योगावर परिणाम झाला आहे, असेही बेझबोरुआ यांनी सांगितले.

भारताच्या चहा उत्पादनापैकी अर्ध्याहून अधिक आणि जागतिक उत्पादनात अंदाजे १३ टक्के योगदान आसामचे असते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हवामान बदलाचा आसामच्या चहाच्या बागांवर गंभीर परिणाम

१८२० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन सुरू केले. आसामधील सूर्यप्रकाश आणि पावसाचे अनुकूल वातावरण यांमुळे येथील चहाला एक विशिष्ट चव असते. परंतु, आपण २१ व्या शतकात प्रवेश करत असताना, हवामानातील बदल या उत्पादनासाठी धोका निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. आयआयटी गुवाहाटीने केलेल्या अभ्यासातून हवामान बदलाचा आसाममधील चहाच्या बागांवर होणारा गंभीर परिणाम अधोरेखित करण्यात आला आहे. हवामानाच्या अनियमिततेमुळे संपूर्ण प्रदेशातील चहाचे उत्पादन कमालीचे घटले आहे आणि त्यामुळे चहाच्या उत्पादनासाठी आसाम हे भारतातील सर्वांत असुरक्षित राज्यांमध्ये गणले जाऊ लागले आहे.

“हवामानातील बदलामुळे आम्हाला कधी पाऊसच दिसत नाही; तर कधी एकसारखा आणि जोरदार पाऊस कोसळताना दिसतो. त्यामुळे पाणी साठून मातीची धूप होते. तसेच, दिवसाचे तापमान चहाच्या झुडपांसाठी खूप जास्त असते. त्याशिवाय चहा कामगार अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत काम करू शकत नाहीत,” असे ईशान्य टी असोसिएशनचे सल्लागार व टी बोर्ड इंडियाचे माजी उपाध्यक्ष विद्यानंद बरकाकोटी यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.

हेही वाचा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ‘कॉग्निटिव्ह टेस्ट’ करण्याचा सल्ला का दिला जातोय? ही चाचणी नेमकी काय आहे?

आयआयटी गुवाहाटीने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, २६.६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानामुळे आसाममधील ८२ चहाच्या बागांमधील चहाचे उत्पादन घटले आहे. तसेच, वाढत्या तापमानामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पीक उत्पादनास धोका निर्माण झाला आहे. “हवामान बदल हे वास्तव आहे. आसाममध्ये आम्ही त्याचा फटका सहन करीत आहोत”, असे बरकाकोटी यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tea might get costlier reason rac